शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 5 मार्च 2018 (11:02 IST)

मोरपिसे मनातली...

तिन्ही सांज झाली.  देवापुढे दिवा लावायला उठले. आणि नेहमी प्रमाणे समई च्या प्रकाशात आई चा चेहरा देवीच्या जागी दिसला. रोज संध्याकाळी देवा पुढे दिवा लावून माझी  वाट पहात बसायची . नेहमी म्हणायची माझे हे वाट पाहणे कधी संपणार काय माहीत.
उशीर झाल्यावर आपली पण वाट पाहणारे कोणीतरी असते याची किंमत मला मी 'आई' झाल्यावर कळली.
आज का कोण जाणे आईची खूप आठवण आली दिवा लावताना...
 ये ग जरा वेळ काढून. अधूनमधून यावं मुली ने माहेर पणाला . मी गेल्यावर किंमत कळेल बघ माहेरपणाची. असे नेहमी म्हणायची. कसे तरीच वाटायचे मनाला . आज आई नाही, तिची मायेची हाक नाही. आज माझ्या 'सासरी' गेलेल्या मुलीची  वाट पाहताना जाणवते माझ्या आईचे लेकीच्या भेटीसाठी तळमळणारे हृदय.  
तीच आठवली दिवेलगणी ला. तिचे चेहऱ्यावरचे  करुण पण स्निग्ध भाव. तेच भाव अजूनही एखाद्या मोरपिसासारखे मनाच्या कप्प्यात जपून ठेवले आहेत मी. माझी देवावर श्रद्धा होती पण आई इतकी नव्हती. कधीतरी असे घडले की  मी मनापासून देवापुढे हात जोडले माझ्या मुलींसाठी.
मग कळले आई होणे म्हणजे काय असते..
आपसूकच तिन्हीसांजेला दिवा लावू लागले न विसरता .पण आज ही दिवा लावताना आठवते माझे माहेर. आई चे मनाचे श्लोक , तिची कारुण्याने भरलेल्या स्वरातली करुणाष्टके ,   त्यातच मिसळलेला कुकर च्या शिट्टी चा आवाज , उदबत्ती च्या घमघामाटा बरोबरच  आंबेमोहोर तांदळा चा भात आणि हळद हिंग घालून शिजवलेल्या वरणाचा तोंडाला पाणी सुटणारा वास,
गरम गरम पोळ्यां आणि टॉमेटो च्या कोशिंबीरी चा थाट . तिन्ही सांज म्हणजे डोक्यात पक्का बसलेला हा त्रिवेणी संगम
माझी साधी सोपी 'माहेरा' ची व्याख्या.
खरंच माहेरवाशिणी ...जर माझे मनोगत वाचत असतील तर नक्की भेटून या आपल्या आई ला. एखादा फोन तरी कराच. आई मला म्हणायची तू पक्की आई झालीयस . मुलींशिवाय दुसरे काही तुला सुचतच नाही.मुली ची आई होणं सोपं नाही ग बाई!!  आधी तिची मैत्रीण हो मग तुझी लेक तुझं 'आईपण' सहज स्वीकारेल. 
हो आई .. मी प्रयत्न करतेय. पण अजून ही दिवा लावताना देवी च्या जागी तूच दिसतेस ज्या दिवशी माझ्या मुलींना 'देवीच्या' जागी 'मी' दिसेन ना आई , त्या दिवशी मी समजेन की मीही  तुझ्यासारखे मातृत्व निभावले. 
मंजू काणे