गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 24 सप्टेंबर 2019 (14:52 IST)

मराठी सिनेसृष्टीतील दहा रत्नांचा होणार सन्मान

कृष्णधवल चित्रपटांपासून ते आताच्या डिजिटल युगापर्यंतचे अनेक टप्पे यशस्वीरित्या पार करत आज मराठी चित्रपटांनी थेट अटकेपार झेंडा फडकावला आहे. या यशात अनेकांचे सहकार्य लाभले, आजही लाभत आहे. ज्यांच्यामुळे मराठी सिनेसृष्टीला आज हे सुगीचे दिवस अनुभवण्यास मिळत आहेत. आज आंतराष्ट्रीय स्तरावर मराठी चित्रपटांना एक वेगळी ओळख प्राप्त झाली आहे. ही ओळख प्राप्त करून देणाऱ्या पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्या कलाकारांचा सन्मान करण्यासाठी संपूर्ण देशासोबतच महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तपत्र समूह असणाऱ्या 'टाईम्स'ने एका विशेष सन्मानाची घोषणा केली आहे. या क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या दहा रत्नांना 'टाईम्स मराठी फिल्म्स आयकॉन्स २०१९' या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
 
मराठी सिनेसृष्टीत नाविन्यपूर्ण, आशय संपन्न चित्रपट बनत आहेत. याचेच पडसाद म्हणजे आज मराठी चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवण्यासोबतच अगदी ऑस्करच्या पुरस्कारापर्यंतही मजल मारत आहेत. अशा या मराठी सिनेसृष्टीची भुरळ आता बॉलिवूडला पडली आहे. आज अनेक कलाकार, दिग्दर्शक, निर्माता मराठी चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी उत्सुक आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांनाही मराठी चित्रपटांनी आकर्षित केले आहे. इतकेच नाही तर मराठी सिनेसृष्टीनेही काही दमदार कलाकार अवघ्या मनोरंजनसृष्टीला दिले आहेत. अशा सर्वच बाबतीत संपन्न असणाऱ्या या मराठी सिनेसृष्टीचे अनेक स्तरातून कौतुक होत आहे. यात पडद्यावरील कलाकारांसोबतच पडद्यामागील कलाकार अर्थात  लेखक, गीतकार, संगीत दिग्दर्शक, दिग्दर्शक,पोस्ट प्रॉडक्शन स्टाफ, साऊंड रेकॉर्डिस्ट, वेशभूषा, रंगभूषा, लाईटबॉय,आर्ट डायरेक्टर, स्पॉटबॉय अशा सगळ्यांचीच मेहनत आहे. याच मेहनतीचे कौतुक करण्याकरता या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा पुरस्कार सोहळा ३० सप्टेंबर रोजी मुंबईत संपन्न होणार आहे.
 
या सोहळ्याला टायटल स्पॉन्सर म्हणून 'टॉप स्कॉलर'चे संजय साळुंखे, पॉवरर्ड बाय श्रीमती शालिनी ठाकरे, को-पॉवरर्ड बाय 'गणराज असोसिएट्स'चे पुरुषोत्तम जाधव, डिजिटल पार्टनर प्लॅनेट मराठीचे अक्षय बद्रापूरकर, व्हेन्यू पार्टनर हयात रिजेंसी, बेव्हरेज पार्टनर युनाइटेड बेव्हरेज लिमिटेड आणि फोटोग्राफर नंदू धुरंधर यांची साथ लाभली आहे.