शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : शनिवार, 11 मे 2019 (13:50 IST)

आई आणि मुलीची भावनिक 'सोबत’

ज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शंस निर्मित 'जजमेंट' हा चित्रपट येत्या २४ मे ला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील 'तुझ्या सोबतीला' हे गाणं नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. मुलीचा जन्म हा तिच्या आईसाठी खूप महत्त्वाचा असतो. कारण संपूर्ण आयुष्य बदलून टाकणारा हा क्षण अतिशय सुंदर आणि अविस्मरणीय असतो. हेच आई आणि मुलीचे हळुवार नाते एका अदृश्य धाग्याने बांधलेले असते. या अनमोल नात्यावर भाष्य करणारे 'तुझ्या सोबतीला' हे गाणं आंतराष्ट्रीय मातृ दिनाच्या निमित्ताने प्रदर्शित करण्यात आले असून आई तिच्या पिल्लांना जीवनाकडे आशावादी नजरेतून पाहण्याची शिकवण देताना दिसत आहे. कितीही दाट अंधार असला तरी आशेचा किरण उगवणारच, असा सकारात्मक संदेश गाण्यातून मिळत आहे. तर गाण्याच्या उत्तरार्धात मुलगी आईला हळवी साद घालून, तिचे प्रेम हे किती अमूल्य आणि न विसरता येणारे आहे हे सांगत आहे. या भावनिक गाण्याला आनंदी जोशी हिने स्वरबद्ध केले असून, नवल शास्त्री यांनी संगीतबद्ध केले आहे तर मंदार चोळकर यांनी अगदी समर्पक शब्दांत आई आणि मुलीचे नाते मांडले आहे.
या चित्रपटात 'श्री पार्टनर' फेम श्वेता पगार हिचीसुद्धा महत्वाची भूमिका आहे. सोबत सतीश सलागरे, किशोरी अंबिये, महेंद्र तेरेदेसाई, शलाका आपटे, विजय भानू, शिल्पा गांधी, प्रतीक देशमुख, निलेश देशपांडे, बाल कलाकार चैत्रा भुजबळ आणि नुमायारा खान आदी कलाकार आहेत. निवृत्त सनदी अधिकारी आणि पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या "ऋण" कादंबरीवर आधारित आहे. समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित, डॉ. प्रल्हाद खंदारे निर्मित आणि हर्षमोहन कृष्णात्रेय सहनिर्मित 'जजमेंट' या चित्रपटात प्रेक्षकांना भरभरून थरार अनुभवायला मिळेल.