1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 10 डिसेंबर 2022 (17:01 IST)

ज्येष्ठ लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांचं निधन

ज्येष्ठ लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. त्या 89 वर्षांच्या होत्या.
सुलोचना चव्हाण या आपल्या ठसकेबाज आवाजासाठी ओळखल्या जायच्या. त्यांनी 60 पेक्षा अधिक वर्षे आपल्या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. 'तुझ्या उसाला लागंल कोल्हा', 'पाडाला पिकलंय आंबा', 'खेळताना रंग बाई होळीचा' आणि 'सोळावं वरीस धोक्याचं गं' अशा सुलोचना चव्हाण यांच्या आवाजातील अनेक गाण्यांना प्रेक्षकांची पसंती लाभली.
 
त्यांची गाणी लावणी क्षेत्रात आजही सदाबहार म्हणून ओळखली जातात. आजही त्यांच्या गाण्याची जादू प्रेक्षकांवर कायम आहे.
 
कला क्षेत्रातील योगदानासाठी सुलोचना चव्हाण यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. त्यामध्ये भारत सरकारकडून दिला जाणाऱ्या पद्मश्री पुरस्कार त्यांना 2022 साली प्रदान करण्यात आला होता.
 
ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी सुलोचना चव्हाण यांना एबीपी माझाशी बोलताना श्रद्धांजली अर्पण केली.
 
"सुलोचना मावशी इतक्या श्रेष्ठ होत्या की, तमाशा क्षेत्राला त्यांचं वरदान होतं. सामन्याला दोन नर्तकींना सुलोचना मावशी वेगवेगळा आवाज द्यायचा. तमाशासृष्टीला दु:खदायक आहे. तमाशासृष्टीतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो," असं रघुवीर खेडकर म्हणाले.
 
लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या निधनाबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे.
 
सुलोचनाताईंवर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत.
 
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही सुलोचना चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण केलीय.
सुलोचना चव्हाण यांचा अल्पपरिचय
13 मार्च 1933 रोजी मुंबईतील गिरगावात सुलोचना चव्हाण यांचा जन्म झाला. विवाहापूर्वी त्यांचं नाव सुलोचना महादेव कदम असे होते. जेमतेम चौथीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांनी श्रीकृष्ण बालमेळ्यात काम केलं.
 
हिंदी, उर्दू, गुजराती, मराठी नाटकात बालभूमिका केल्या. सुलोचना यांच्या मोठ्या भगिनीने त्यांना कलाक्षेत्रासाठी प्रोत्साहन दिले. श्रीकृष्ण बालमेळ्याचे रंगभूषाकार दांडेकर चित्रपट सृष्टीशी संबंधित होते. दांडेकर यांच्या ओळखीतून संगीत दिग्दर्शक शाम बाबू पाठक यांच्याकडे सुलोचनाबाईंनी पहिले चित्रपट गीत गायिले. वयाच्या दहाव्या वर्षांपासून त्यांनी गायनाला प्रारंभ केला.
 
मराठी विश्वकोशावरील माहितीनुसार, सुलोचना चव्हाण यांनी लग्नापूर्वी सुमारे 70 हिंदी चित्रपटांतून पार्श्वगायन केले. हिंदी चित्रपटसृष्टीत त्या सुलोचना कदम अथवा के. सुलोचना नावाने ओळखल्या जायच्या.
 
मास्टर भगवान यांच्या चित्रपटात त्यांनी पार्श्वगायन केले तेव्हा त्यांच्या सोबत सहगायक सी . रामचंद्र होते. मोहम्मद रफी, मन्ना डे, शमशाद बेगम, गीता दत्त, शामसुंदर अशा कलावंतांबरोबर सहगायनाची संधी त्यांना लाभली. वयाच्या सोळाव्या वर्षी मन्ना डे यांच्यासोबत त्यांनी भोजपुरी रामायण गायिले. भोजपुरी, हिंदी, गुजराती, तामिळ, पंजाबी आदी भाषांतील गीते त्यांनी गायिली.
 
Published By- Priya Dixit