शनिवार, 18 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 29 नोव्हेंबर 2023 (14:55 IST)

BCCI : भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच राहणार, बीसीसीआयची घोषणा

Rahul dravid
सर्व चर्चांना पूर्णविराम देत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) राहुल द्रविड टीम इंडियाचा प्रशिक्षक होणार असल्याची घोषणा केली आहे. बीसीसीआयने त्यांचा कार्यकाळ वाढवला आहे. त्याचबरोबर कोचिंग स्टाफमध्ये कोणताही बदल झालेला नाही. याचा अर्थ राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षकच राहणार आहे. विक्रम राठोड हे फलंदाजी प्रशिक्षक, पारस म्हांबरे गोलंदाजी प्रशिक्षक आणि टी दिलीप क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून कायम राहतील.
 
 विश्वचषकानंतर कराराचा कालावधी संपल्यानंतर बीसीसीआयने राहुल द्रविडशी फलदायी चर्चा केली आणि कार्यकाळ वाढवण्यास सर्वानुमते सहमती दर्शवली, असे बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रक जारी केले. भारतीय संघाच्या उभारणीत द्रविडच्या महत्त्वाच्या भूमिकेची बोर्डाने कबुली दिली आणि त्याच्या अपवादात्मक व्यावसायिकतेची प्रशंसा केली.  द्रविड आणि लक्ष्मण यांनी भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी एकत्र काम केले आहे.
 
द्रविडचा कार्यकाळ वाढवल्याबद्दल बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी म्हणाले, “राहुल द्रविडची दूरदृष्टी, व्यावसायिकता आणि दृढनिश्चय हे टीम इंडियाच्या यशाचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक या नात्याने तुमची नेहमीच कठोर तपासणी केली जाते. त्याने मुख्य प्रशिक्षकपदाची ऑफर स्वीकारली याचा मला आनंद आहे. हा परस्पर आदराचा विषय आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघ यशाच्या शिखरावर पोहोचेल यात मला शंका नाही.''
 
बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले, "मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळण्यासाठी राहुल द्रविडपेक्षा चांगले कोणी नाही, असे मी त्यांच्या  नियुक्तीच्या वेळी नमूद केले होते आणि त्यांनी आपल्या कामगिरीने स्वत:ला पुन्हा सिद्ध केले आहे. टीम इंडिया आता एक मजबूत संघ  आहे. संघाच्या वाढीसाठी योग्य व्यासपीठ तयार केल्याबद्दल मुख्य प्रशिक्षक कौतुकास पात्र आहेत. मुख्य प्रशिक्षकाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.
 
Edited by - Priya Dixit