शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: अहमदाबाद , गुरूवार, 18 मार्च 2021 (09:16 IST)

आजचा सामना भारतासाठी करो या मरो

भारतीय क्रिकेट संघ आज इंग्लंडविरुद्ध चौथी टी-20 सामना खेळणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी आजची लढत ‘करो या मरो’ अशी असेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार्‍या चौथ्या लढतीत भारताला विजय मिळवावाच लागेल.
 
मालिकेतील तीन पैकी दोन सामन्यात भारतीय संघाला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. आता इंग्लंडविरुद्ध भारताला सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे.  आतापर्यंत ज्या संघाने नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग केला आहे त्यांना विजय मिळवता आला. भारताचा कर्णधार विराट कोहली चांगली कामगिरी करण्यावर भर देत असतो. पण आगामी टी-20 विश्‍वचषकाचा विचार करता लक्ष्याचा पाठलाग असो वा प्रथम फलंदाजी दोन्ही वेळा चांगली कामगिरी करून विजय मिळवणे गरजेचे आहे.
भारतीय संघाचा ज्या दोन लढतीत पराभव झाला त्या दोन्ही लढतीत संघाला पॉवर प्लेमध्ये धावा करता आल्या नाहीत. ज्याचा परिणाम अंतिम धावसंख्येवर झाला. या दोन्ही लढतीत अनुक्रमे श्रेयस अय्यर व विराट कोहली यांच्या फलंदाजीमुळे भारत धावा करू शकला. के. एल. राहुलच्या खराब फलंदाजीचा तोटा भारतीय संघाला झाला. पण विराट कोहलीने तोच सलामीचा फलंदाज असेल, असे स्पष्ट केले आहे. 
 
तिसर्‍या सामन्यातील पराभवानंतर आता टीम इंडियामध्ये चौथ्या सामन्यात आणखी एका अष्टपैलूला स्थान दिले जाऊ शकते. हार्दिक पंड्या व वॉशिंग्टन सुंदर यांच्यासोबत पदार्पणाची प्रतीक्षा करणारे राहुल तेवतीया किंवा अक्षर पटेल यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे.