शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 14 नोव्हेंबर 2022 (17:13 IST)

ICCची मोस्ट व्हॅल्यूएबल टीम जाहीर, भारताच्या ‘या’ तीन खेळाडूंना स्थान

ट्वेन्टी20 वर्ल्डकप आटोपल्यानंतर आयसीसीने मोस्ट व्हॅल्यूएबल टीम जाहीर केली असून, भारताच्या विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांना या संघात स्थान मिळाले आहे.वर्ल्डकप स्पर्धा संपल्यानंतर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या संघाची घोषणा आयसीसीतर्फे केली जाते. यंदा भारत, पाकिस्तान, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे संघाच्या खेळाडूंनी या संघात स्थान पटकावलं आहे.
 
या संघाची निवड इयन बिशप (समन्वयक) , मेल जोन्स (कॉमेंटेटर), शिवनारायण चंद्रपॉल (आयसीसी हॉल ऑफ फेम), पार्था भादुरी (पत्रकार), वासिम खान (आयसीसी जनरल मॅनेजर ऑफ क्रिकेट) या सदस्यांनी मिळून व्हॅल्यूएबल संघाची निवड केली.
 
कोहलीने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये 98.66च्या सरासरीने 296 रन्स काढल्या. पाकिस्तानविरुद्ध कोहलीने साकारलेली 82 रन्सची खेळी ट्वेन्टी20 क्रिकेटमधल्या सार्वकालीन महान खेळींमध्ये गणली जाऊ लागली आहे.
 
कोहलीने बांगलादेशविरुद्ध 62 तर नेदरलँड्सविरुद्ध 62 रन्सची खेळी केली. इंग्लंडविरुद्ध कोहलीने 50 रन्स केल्या.
 
यंदाच्या वर्ल्डकपमधला सगळ्यांत चर्चित खेळाडू सूर्यकुमार यादवने 239 रन्सच केल्या. सूर्यकुमारने नेदरलँड्सविरुद्ध 51 तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पर्थच्या कठीण खेळपट्टीवर 68 रन्सची सुरेख खेळी साकारली होती.
 
झिम्बाब्वेविरुद्ध तर सूर्यकुमारने 25 बॉलमध्येच 61 धावा चोपून काढल्या. मैदानात कुठेही फोर सिक्सची लयलूट करणाऱ्या सूर्यकुमारला नवा 360 असं टोपणनाव मिळालं. दक्षिण आफ्रिकेच्या एबी डीव्हिलियर्सला 360 असं संबोधलं जातं.
 
भारतीय संघाचा ऑलराऊंडर हार्दिक पंड्याला राखीव खेळाडू म्हणून स्थान मिळालं आहे. वर्ल्डकपविजेत्या इंग्लंडच्या संघातील जोस बटलर, अलेक्स हेल्स आणि सॅम करन यांना यांनी या संघात स्थान पटकावलं आहे.
 
स्पर्धेतील शतकवीर ग्लेन फिलीप्स आणि संपूर्ण स्पर्धेत अष्टपैलू खेळाने छाप उमटवणाऱ्या सिकंदर रझा यांना संघात समाविष्ट करण्यात आलं आहे. रझाने 219 रन्स केल्या तर 10 विकेट्सही घेतल्या. फिलीप्सने श्रीलंकेविरुद्ध शतकी खेळी साकारली होती.
 
पाकिस्तानचा अष्टपैलू शदाब खान या संघाचा अविभाज्य घटक आहे. शदाबने स्पर्धेत 11 विकेट्स घेतल्या. त्याने 92 रन्स करत पाकिस्तानच्या फायनलपर्यंतच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
24वर्षीय सॅम करनने फायनलमध्ये 3 विकेट्स घेत मॅन ऑफ द मॅचसह मॅन ऑफ द सीरिज पुरस्कारही पटकावला. सॅमचा या संघात समावेश स्वाभाविक आहे. त्याने स्पर्धेत 13 विकेट्स घेतल्या आहेत.
 
भन्नाट वेग आणि अचूकतेसह बॉलिंग करणाऱ्या अँनरिक नॉर्कियालाही स्थान मिळालं आहे. त्याने 11 विकेट्स घेतल्या.
 
मार्क वूड आणि शाहीन शहा आफ्रिदी हे या संघाचं प्रमुख आक्रमण असेल. दुखापतीमुळे सेमी फायनल आणि फायनलमथ्ये मार्क वूड खेळू शकला नाही पण प्राथमिक फेऱ्यांमध्ये वूडचा सामना करणं प्रतिस्पर्धी संघातील बॅट्समनसाठी डोकेदुखी ठरलं. वूडने 9 विकेट्स घेतल्या.
 
शाहीन शहा आफ्रिदीने 11 विकेट्स घेत पाकिस्तानच्या वाटचालीत मोलाची भूमिका बजावली. फायनलमध्ये त्याला झालेली दुखापत पाकिस्तानच्या पराभवाचं मुख्य कारण ठरलं.
 
ट्वेन्टी20 वर्ल्डकप फायनलमध्ये इंग्लंडने पाकिस्तानला 5 विकेट्सनी नमवलं. पाकिस्तानने पहिल्यांदा बॅटिंग करताना 137 रन्स केल्या. बेन स्टोक्सच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर इंग्लंडने हे लक्ष्य गाठलं.
 
इंग्लंडने याआधी 2010 मध्ये जेतेपदावर नाव कोरलं होतं. 2019 मध्ये इंग्लंडने 50 ओव्हर्सच्या वर्ल्डकप जेतेपदाची कमाई केली होती.
 
सॅम करनला मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आलं.
 
आयसीसीने मोस्ट व्हॅल्यूएबल टीम - 2022
* जोस बटलर - इंग्लंड
* अलेक्स हेल्स - इंग्लंड
* विराट कोहली - भारत
* सूर्यकुमार यादव - भारत
* ग्लेन फिलीप्स - न्यूझीलंड
* सिकंदर रझा - झिम्बाब्वे
* शदाब खान - पाकिस्तान
* सॅम करन - इंग्लंड
* अँनरिक नॉर्किया - दक्षिण आफ्रिका
* शाहीन शहा आफ्रिद - पाकिस्तान
* मार्क वूड - इंग्लंड
* हार्दिक पंड्या- भारत (राखीव)
 
Published By - Priya Dixit