रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नागपूर , सोमवार, 2 ऑक्टोबर 2017 (10:01 IST)

भारताने आस्ट्रेलियाचा 4-1ने पराभव करून मालिका जिंकली

अक्षर पटेलने केलेल्या भेदक गोलंदाजीनंतर सलामीवीर रोहित शर्माने ठोकलेल्या दमदार शतकाच्या जोरावर भारताने 42.5 षटकांत 3 बाद 243 धावा करत आस्ट्रेलियावर 7 गड्यांनी मात केली. या विजयासह पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने 4-1 अशी जिंकली.
 
सध्या फॉर्मात असलेल्या सलामीवर अजिंक्‍य रहाणे आणि रोहित शर्मा यांनी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला ठोस सुरूवात करून दिली. रोहित शर्माने सावध सुरूवातीनंतर 52 चेंडूत अर्धशतक पूर्ण केल. रहाणेने फॅकनरच्या गोलंदाजीवर चौकार लगावित मालिकेतील सलग चौथे अर्धशतक पूर्ण केले. नाईलने अजिंक्‍य रहाणेला पायचित बाद करत ऑस्ट्रेलियाला पहिले यश मिळवून दिले. रहाणेने (74 चेंडूत 61) रोहित शर्मा सोबत पहिल्या विकेटसाठी 124 धावांची भागिदारी केली.
 
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने दमदार सुरूवात केली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (53) आणि ऍरॉन फिंच (32) यांनी पहिल्या विकेटसाठी 66 धावांची भागिदारी केली. हार्दिक पांड्याने ऍरॉन फिंचला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर मधळ्या फळीतील काही फलंदाजांचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी निराशा केली.
 
कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि वॉर्नरने 32 धावांची भागिदारी करत पुन्हा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, केदार जाधवने स्मिथला पायचित बाद करत ही जोडी फोडली. स्मिथ पाठोपाठ डेव्हिड वॉर्नरही 53 धावांवर बाद झाला. त्यानंतर अक्षर पटेलने त्याच्या पुढील षटकात हॅन्ड्‌सकॉम्बला रहाणेकरवी झेलबाद केले. तेव्हा 24 षटकांत 4 बाद 118 अशी अवस्था झाल्याने ऑस्ट्रेलियाचा संघ संकटात सापडला.
 
ट्रेव्हिस हेड (42) आणि मार्कस स्टॉइनिस (46) यांनी सावध खेळी करत पुन्हा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी पाचव्या विकेटसाठी 87 धावांची निर्णायक भागेदारी केली. स्टॉइनिस आणि हेड बाद झाल्यानंतर फक्त 32 धावांची भर घालत ऑस्ट्रेलियाने निर्धारीत 50 षटकांत 9 बाद 242 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 3, तर जसप्रित बुमराहने 2 विकेट घेत त्याला चांगली साथ दिली. भुवनेश्‍वर कुमार, हार्दिक पांड्या आणि केदार जाधव यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
 
पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने एकमेव बदल करत केन रिचर्डसनच्या जागी जेम्स फॅकनरला संघात स्थान दिले. भारतीय संघाने पुन्हा तीन बदल करत उमेश यादव, मोहम्मद शमी आणि युजवेंद्र चाहलच्या जागी भुवनेश्‍वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांचा समावेश केला.