मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

भारत - न्यूझीलंडविरुद्ध आज पहिली टी-20 लढत

न्यूझीलंडविरुद्धच्या अत्यंत रंगतदार अशा एकदिवसीय मालिकेनंतर आज (बुधवार) सुरू होत असलेल्या टी-20 मालिकेत वर्चस्व गाजविण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. परंतु झटपट क्रिकेटमधील भारतीय संघाची न्यूझीलंडविरुद्धची अत्यंत निराशाजनक कामगिरी पाहता टीम इंडियाला या वेळी नवा इतिहास लिहिण्याकरिता बरीच मेहनत करावी लागणार हे निश्‍चित.
 
बाकी कोणत्याही खेळाडूपेक्षा आपल्या वादग्रस्त कारकिर्दीतील अखेरच्या स्पर्धात्मक सामन्यात खेळणाऱ्या आशिष नेहरावरच उद्याच्या लढतीतील प्रकाशझोत राहणार आहे. असंख्य दुखापतींना भलेल्या आणि अनेकदा पुनरागमन केल्यामुळे खळबळजनक ठरलेल्या आशिष नेहराच्या कारकिर्दीला टी-20 क्रिकेटने नवे वळण दिले होते. भेदक डावखुरा वेगवान गोलंदाज असलेल्या नेहरानेही भारतीय संघाला टी-20 क्रिकेटमध्ये आपल्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग करून दिला.
 
आता मायदेशातील प्रेक्षकांसमोर अखेरचा सामना खेळून क्रिकेटला अलविदा करण्याची 38 वर्षीय नेहराची इच्छा आहे. तसेच नेहराच्या अखेरच्या सामन्यात त्याला विजयाची भेट देण्याचा भारतीय संघाचा निर्धार आहे. परंतु ते तेवढे सोपे नाही. महेंद्रसिंग धोनीच्या संयमी नेतृत्वाखाली आणि नंतर गेल्या दोन वर्षांत विराट कोहलीच्या आक्रमक नेतृत्वाखाली कसोटी, एकदिवसीय क्रिकेट आणि टी-20 क्रिकेटमध्ये जगभरात दिग्विजय करीत असलेल्या भारतीय संघाने या प्रवासात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका या देशांनाही पराभूत करणाऱ्या भारतीय संघाच्या वाटचालीत न्यूझीलंडविरुद्ध टी-20 क्रिकेटमधील अपयश ही दुखरी नस ठरली आहे.
 
भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध आतापर्यंत एकदाही टी-20 सामना जिंकलेला नाही. किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास भारताने किवींविरुद्ध सर्व टी-20 सामने गमावले आहेत. त्यापैकी अखेरचा पराभव गेल्या वर्षी टी-20 विश्‍वचषक स्पर्धेतील होता. अर्थात विजय मिळविणाऱ्या संघाने इतिहासाची चिंता करायची नसते, तर नव्याने इतिहास घडवायचा असतो. त्यामुळे विराट कोहलीसारख्या अत्यंत आक्रमक आणि सकारात्मक कर्णधाराच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्ध अपयशाची मालिका खंडित करण्याची भारताला संधी आहे हे निश्‍चित.
 
नुकत्याच पार पडलेल्य एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडने भारताला जबरदस्त झुंज दिली. परंतु पहिला सामना गमावल्यानंतर खडबडून जागे झालेल्या भारतीय संघाने दुसरा सामना सहज जिंकला आणि तिसऱ्या सामन्यातही न्यूझीलंडचा प्रखर प्रतिकार मोडून काढताना मालिका 2-1 अशी जिंकली. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्‍वास आणि मनोधैर्य सध्या उंचावलेले आहे. आणि याच आत्मविश्‍वासाच्या जोरावर टी-20 क्रिकेटमध्ये न्यूझीलंडवर पहिला विजय मिळविण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.