धोनी चेन्नईचाच, विराटला बेंगळुरुने तर रोहितला मुंबईने राखले
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार आहे. चेन्नईचा संघ दोन वर्षांनी पुन्हा एकदा यंदाच्या आयपीएल मोसमात पुनरागमन करत असून या संघाने 15 कोटी रुपये मोजून आपल्या संघात धोनीला कायम राखले आहे. याशिवाय रवींद्र जडेजा आणि सुरेश रैना यांनाही संघात कायम ठेवण्यात आले आहे. बीसीसीआयने याबाबत घोषणा केली. दरम्यान आयपीएल 2018 साठी पुढच्या महिन्यात खेळाडूंचा लिलाव होणार आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यंदाच्या मोसमातही रॉयल चॅलेजर्स बेंगळुरु संघाकडून खेळणार आहे. याशिवाय दिग्गज फलंदाज एबी डिविलियर्सलही बेंगळुरु संघाने कायम राखले आहे. मुख्य म्हणजे विराटला आपल्या संघात कायम ठेवण्यासाठी आरसीबीला 17 कोटी रुपये शुल्क मोजावे लागले असून एखाद्या खेळाडूला संघात कायम ठेवण्यासाठी मोजावी लागलेली ही सर्वाधिक रक्कम आहे.
टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या हे मुंबई संघात यंदा कायम असणार आहेत. याशिवाय ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ पुन्हा राजस्थान रॉयल्ससाठी खेळेल तर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार सनरायजर्स हैदराबात संघाकडूनच या मोसमातही खेळतील.
कुणी कोणाला राखले
चेन्नई सुपरकिंग्ज: महेंद्र सिंग धोनी, सुरेश रैना, रवींद्र जडेजा
दिल्ली डेअरडेविल्स: ऋषभ पंत, ख्रिस मॉरिस, श्रेयस अय्यर
रॉयल चेंलेजर्स बेंगळुरु: विराट कोहली, एबी डिविलियर्स, सरफराज खान
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह
कोलकता नाइट रायडर्स: सुनील नारायण, आंद्रे रसेल
किंग्ज इलेव्हन पंजाब: अक्षर पटेल
राजस्थान रॉयल्स: स्टीव्ह स्मिथ