सोमवार, 26 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 24 नोव्हेंबर 2016 (11:30 IST)

आठ वर्षानंतर भारतीय संघात पार्थिवची वर्णी

parthiv patel cricketer
इंग्लंडविरुद्धच्या आगामी तिसर्‍या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात  दुखापतग्रस्त रिद्धीमान साहा याच्याऐवजी पार्थिव पटेल याची वर्णी लागली आहे.   रिद्धीमान साहाला दुखापत झाल्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही.
 
इंग्लंडविरुद्धच्या उर्वरीत तीन कसोटी सामन्यांसाठी कालच भारतीय संघाची घोषणा झाली. भारताच्या सोळा सदस्यीय संघातून सलामीवीर गौतम गंभीरला डच्चू देण्यात आला आहे. त्याच्याऐवजी संघात वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा समावेश करण्यात आला आहे. हा निर्णय झाल्यानंतर बीसीसीआयने तब्बल 15 तासांनी पार्थिव पटेलचाही भारतीय संघात समावेश झाल्याची घोषणा केली. रिद्धीमान साहाच्या मांडीला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो तिसऱ्या कसोटीत खेळू शकणार नाही. त्याच्याऐवजी पार्थिव पटेल मैदानात उतरणार आहे.
 
पार्थिव पटेलने 2002 मध्ये पहिली कसोटी खेळली होती. त्यावेळी त्याचे वय 17 वर्ष 153 दिवस होते. त्यामुळे तो कसोटी खेळणारा सर्वात तरुण विकेटकीपर ठरला होता. मात्र आता कोहलीच्या नेतृत्त्वातील टीम इंडियातील तो दुसऱ्या क्रमांकाचा वयस्कर क्रिकेटपटू असेल. सध्या त्याने 31 वर्ष पूर्ण केली आहेत. पार्थिव पटेलसमोर 19 वर्षीय रिषभ पंतचे मोठे आव्हान होते. रिषभने नुकतंच रणजी चषकात त्रिशतक झळकावले होते. इतकंच नाही तर रणजी सामन्यातील जलद शतकाची नोंदही त्याच्याच नावावर आहे. रिषभने 48 चेंडूत शतक ठोकले होते. पंतशिवाय मध्यप्रदेशचा रणजीपटू नमन ओझाही या शर्यतीत होता. मात्र दुखापतीमुळे त्याचेही नाव मागे पडले. तसेच तामिळनाडूचा दिनेश कार्तिक हा पर्यायही निवड समितीसमोर होता. मात्र पार्थिव पटेलने या सर्वांना मागे टाकत भारतीय संघात पुनरागमन केले.