बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 5 सप्टेंबर 2021 (10:32 IST)

रविचंद्रन अश्विन : 413 विकेट्स घेणाऱ्या अश्विनला इंग्लंमधील कसोटी सामन्यात का घेतलं नाही?

'हा वेडेपणा आहे'
 
'मला विश्वास बसत नाहीय'
 
'अत्यंत आश्चर्यकारक निर्णय आहे'
 
या प्रतिक्रिया आहेत जगभरातील काही माजी क्रिकेटपटूंच्या. त्यांच्या अशा प्रतिक्रियांमागे तसं कारणही आहे.
 
भारताचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन टेस्ट रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकवर असून, भारतातील आतापर्यंतचा चौथा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. तरीही इंग्लंडविरोधातील चौथ्या कसोटी सामन्यात पुन्हा एकदा अंतिम 11 मध्ये आर. आश्विनचा समावेश करण्यात आला नाही.
 
34 वर्षीय अश्विनने आतापर्यंत क्रिकेटमध्ये 413 विकेट्स घेतल्या आहेत. क्रिकेटच्या इतिहासात अश्विनपेक्षा जास्त विकेट्स फक्त 14 खेळाडूंनी घेतल्यात. तरीही अश्विनला इंग्लंड दौऱ्यातील चार कसोटी सामान्यांतील एकाही सामन्यात खेळण्याची संधी देण्यात आली नाहीय.
 
सहा महिन्यांपूर्वी इंग्लंडला 3-1 ने पराभत करण्यात भारतासाठी सर्वात मोठं योगदान आर. अश्विनचं होतं. त्यावेळी त्या मालिकेत 14.71 च्या सरासरीने अश्विनने 32 विकेट्स घेतल्या होत्या.
 
माजी क्रिकेटपटूंच्या काय प्रतिक्रिया आहेत?
बीबीसी टेस्ट मॅच स्पेशलमध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने अश्विनला न खेळवण्याच्या निर्णयावर म्हटलं, "मला आश्चर्याचा धक्का बसलाय."
 
आर. अश्विनने कसोटीत केलेल्या चार शतकांचा आणि 413 विकेट्सचा उल्लेख करत भारताच्या निर्णयाला 'वेडेपणा'ही मायकल वॉननं म्हटलंय.
 
याबाबत इंग्लंडचा माजी स्पिनर फिल टफनेलने म्हटलं की, "मला यावर विश्वासच बसत नाही. तुम्ही जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या गोलंदाजाला चारही कसोटी सामन्यात हाफ पँट आणि एक कप चहासोबत कसं बसवू शकता? तो कुठल्याही स्थितीत कुठल्याही कसोटीत समाविष्ट होऊ शकतो."
 
भारताचे माजी विकेटकीपर दीप दासगुप्ता म्हणतात, "ओव्हल स्पिनर्सची मदत करतो. त्यामुळे यात कुठल्याही स्थितीत रविचंद्रन अश्विननं खेळायला हवं होतं."
 
इंग्लंडचे माजी फलंदाज मार्क रामप्रकाश म्हणाले की, अश्विनकडे आवश्यक एक्स-फॅक्टर आहे.
 
तर इंग्लंडचे माजी फलंदाज एबोनी रेनफर्ड-ब्रेंट यांनी अश्विनची निवड न करण्याच्या निर्णयाला 'अजब निर्णय' म्हटलंय.
भारतानं अश्विनला संघात का घेतलं नाही?
भारताकडे गोलंदाज जास्त आहेत आणि तो फलंदाजी करू शकत नाही, म्हणून त्याला संघात घेतलं नाही?
 
मात्र, या प्रश्नावरही विचार करावा लागेल. कारण अश्विनच्या नावावर कसोटी सामन्यात दोन शतकांची नोंद आहे. यातले दोन शतकं तर या वर्षाच्या सुरुवातील इंग्लंड विरोधातच लगावली होती. इंग्लंडच्या जो रूट आणि जॉनी बेयरस्टो या दोनच खेळाडूंनी अश्विनच्या गोलंदाजीवर अधिक धावा केल्या होत्या.
 
अश्विन इंग्लंडपेक्षा भारतातील वातावरणात अधिक प्रभावी मानला जातो. त्याने यावर्षी जून महिन्यात साउथॅम्पटनमध्ये न्यूझीलंडविरोधातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात 45 धावा देत 4 विकेट्स घेतल्या होत्या. 2016 साली आशियाबाहेर 28.08 च्या सरासरीने जगातील सर्व गोलंदाजांच्या तुलनेत सर्वोत्तम कामगिरी केली होती.
 
गेल्या महिन्यात ओव्हलवर खेळवल्या गेलेल्या काऊंटी सामन्यात अश्विननं 28 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या. अशा सर्व स्थितीत त्याचं संघातून बाहेर राहणं, अनेकांना आश्चर्यकारक वाटतंय.
 
काही वर्षांपूर्वी याच मैदानावर स्पिन गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. 1998 साली श्रीलंकेच्या मुथैया मुरलीधरनने 65 धावांच्या बदल्यात 9 विकेट्स घेतल्या होत्या, तर 1997 साली फिल टफनेलने ऑस्ट्रेलियाला 104 धावांवर परतवून इंग्लंडला विजय मिळवून दिला होता.
 
गेल्या काही वर्षातील इतिहासही हेच सांगतो की, कमी वेगानं चेंडू फेकणारे गोलंदाज अजूनही फायदा उठवताना दिसतात.
 
टीएमएसचे डेटा विशेतज्ज्ञ अँडी जाल्जमॅन यांनी सांगितलं की, "2015 नंतर ओव्हलवर खेळवल्या गेलेल्या पाचही कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाजांनी 31.07 च्या सरासरीने 123 विकेट्स घेतल्या होत्या. त्यांचा स्ट्राईक रेट प्रत्येक 60 चेंडूत एक विकेट्स असा होता. मात्र, स्पिनर्सनी केवळ 29.01 च्या सरासरीने आणि 51 च्या स्ट्राईक रेटने 50 विकेट्स घेतल्या होत्या."
मग अश्विनला न घेण्याचं नेमकं कारण काय आहे?
मायकल वॉन यांनी म्हटलं की, "जेव्हा इतकी गुणवत्ता, अनुभव आणि समजूतदारपणा असलेल्या खेळाडूला पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चार सामन्यात तुम्ही घेत नाही, तेव्हा समजावं की, अंतर्गतच काहीतरी समस्या आहे."
 
"असंही होऊ शकतं की, कर्णधार आणि रविचंद्र अश्विन हे एकमेकांच्या नजेराल नजर मिलवत नसतील. बाकी तर सर्व नुसतीच कारणं आहेत," असंही वॉन म्हणाले.
 
नाणेफेकीच्या दरम्यान भारतीय कर्णधार विराट कोहलीने म्हटलं की, इंग्लंडकडे चार डावखुरे फलंदाज असल्यानं डावखुरा गोलंदाज रवींद्र जडेजाचं असणं चांगलं आहे.
 
मार्क रामप्रकाश यांनी म्हटलं की, "भारतानं लॉर्ड्सवर चार वेगवान गोलंदाजांसह विजय मिळवला. ते परिस्थितीच्या अनुकूल राहण्याचा प्रयत्न करतायेत आणि त्यांच्याकडे चार उत्तम गोलंदाज आहेत."
 
याचा अर्थ असा की, पाचवा गोलंदाज जडेजा आणि अश्विन यांच्यातील एक असेल. भारताने डळमळीत स्थितीत गेल्यानंतर ज्यावेळी जडेजाला पाचव्या स्थानी फलंदाजीसाठी पाठवलं, तेव्हाच लक्षात आलं की, विराट कोहली जडेजाला अधिक पसंती देतो.
 
भारतीय संघ जूनपासून इंग्लंडमध्ये आहे. जर अश्विन इंग्लंडविरोधात एकही सामना खेळला नाही, तर तुम्ही विचार करू शकता की, जो रूट आणि इतर खेळाडू किती खुश होतील.
 
याबाबत टॉम मूडीनं म्हटलंय की, "भारताच्या अंतिम 11 मध्ये आर. अश्विनला स्थान नसल्याचं पाहून आश्चर्याचा धक्का बसला. माझ्या मते, संघात तीन वेगवान गोलंदाज आणि दोन स्पिनर असायला हवेत."
 
इंग्लंडमधील क्रिकेटरसिकही आश्चर्यचकित
#BBCCricket या हॅशटॅगवरून इंग्लंडमधील बऱ्याच क्रिकेटरसिकांनी आर. अश्विनला संघातून बाहेर ठेवण्याच्या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केलंय.
 
याबाबत फिल इन चेस्टरने लिहिलंय, "पोर्तुगाल कधी रोनाल्डोला संघाबाहेर करेल का? मग अश्विनला भारत बाहेर का ठेवतोय?"
 
कीर नामक युजरनं लिहिलंय, "माहित नाही, अश्विनसोबत असं काय झालंय. भारताच्या निवड पथकानं अश्विनचा खेळ पाहिला नाहीय? त्याची कामगिरीच चांगली होती. मात्र, इंग्लंडचा समर्थक असल्यानं मला आनंदच आहे की अश्विनला बाहेर ठेवलंय."
 
इयान नावाच्या युजरनं म्हटलंय की, भारतानं अश्विनला इंग्लंडला उधारीवर दिलंय.