मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 21 जानेवारी 2023 (15:21 IST)

रोहित शर्माचा उडाला गोंधळ, टॉस जिंकला पण काय करायचं सांगेना

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी रोहित शर्मा आणि टॉम लॅथम मैदानात उतरले. सामनाधिकारी जवागल श्रीनाथही पोहोचले. टॉस झाला पण त्यानंतर एक अनोखा गोंधळ पाहायला मिळाला.
रोहितने टॉस जिंकला. त्यानंतर सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी रोहितला काय निर्णय घेणार असं विचारलं पण तो गोंधळून गेला.
 
श्रीनाथ आणि न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम दोघेही रोहितच्या निर्णयाची प्रतीक्षा करत राहिले. १० सेकंदानंतरही रोहित ठरवू शकला नाही तेव्हा तेही चक्रावून गेले. अखेर रोहित शर्माने गोलंदाजी करणार असल्याचं सांगितलं.
 
भारतीय संघाने हैदराबाद इथे झालेली लढत जिंकून मालिकेत आघाडी घेतली. रायपूर इथे पहिल्यांदाच वनडे होत आहे. संध्याकाळनंतर दव पडत असल्याने गोलंदाजांना चेंडू ग्रिप करणं कठीण होतं. क्षेत्ररक्षकांनाही त्रास होतो. प्रचंड धावसंख्येचा बचावही करता येईल का अशी परिस्थिती निर्माण होते.
 
पहिल्या सामन्यातही 349 धावा करुनही भारतीय संघाला 17 धावांनीच विजय मिळवता आला होता. शुबमनने द्विशतकी खेळी करत भारतीय संघाला मोठ्या धावसंख्येचा पाया रचून दिला होता पण मायकेल ब्रेसवेलने 140 धावांची तडाखेबंद खेळी करत न्यूझीलंडच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या.
 
यातून बोध घेत काय निर्णय घ्यायचा याबाबत रोहित गोंधळात सापडला.
रोहितचा गोंधळ पाहून समालोचक रवी शास्त्री यांनी त्याला विचारलं. तो म्हणाला, “टॉस जिंकून काय करायचं याबाबत आम्ही खूप चर्चा केली. त्यामुळे नेमकं काय करायचं हे मी विसरुन गेलो. रायपूरच्या या मैदानावर ही पहिलीच वनडे आहे. त्यामुळे खेळपट्टी कशी असेल याबाबत क्युरेटरने आम्हाला सांगितलं आहे. संध्याकाळनंतर दव पडतं. तो मुद्दाही होता. आधीच्या लढतीत आम्ही प्रथम फलंदाजी केली. आज आम्ही गोलंदाजी करत आहोत. आम्हाला हे आव्हान स्वीकारलं आहे”, असं रोहितने सांगितलं.
 
न्यूझीलंडची घसरगुंडी
रोहितचा गोलंदाजीचा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला.
मोहम्मद शमीने पहिल्याच ओव्हरमध्ये धडाकेबाज सलामीवर फिन अलनला शून्यावरच बाद केलं. सहाव्या ओव्हरमध्ये सिराजच्या गोलंदाजीवर हेन्री निकोल्स शुबमन गिलच्या हाती झेल देऊन तंबूत परतला. त्याला केवळ 2 धावा करता आल्या.
 
पुढच्याच षटकात मोहम्मद शमीने स्वत:च्याच गोलंदाजीवर डॅरेल मिचेलला अफलातून झेल टिपत बाद केलं. त्याने एका धावेचं योगदान दिलं.
 
शमीप्रमाणेच हार्दिक पंड्याने स्वत:च्याच गोलंदाजीवर डेव्हॉन कॉनवेचा झेल टिपत न्यूझीलंडच्या डावाला खिंडार पाडलं. कर्णधार लॅथमकडून संघाला अपेक्षा होत्या पण शार्दूल ठाकूरच्या फसव्या चेंडूवर तोही गिलकडे झेल देऊन तंबूत परतला. लॅथम बाद होताच न्यूझीलंडची अवस्था 15/5 अशी झाली.

Published By - Priya Dixit