शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: दुबई , बुधवार, 20 डिसेंबर 2017 (09:10 IST)

आयसीसीच्या क्रमवारीत पुजारा तिसऱ्या स्थानावर

आयसीसीच्या कसोटी विश्‍वक्रमवारीतील फलंदाजांच्या मानांकन यादीत भारताचा भरवशाचा फलंदाज चेतेश्‍वर पुजाराने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. 54 कसोटी सामन्यांत 52.96 सरासरीने 4396 धावा करणाऱ्या पुजाराने 873 गुणांसह तिसरे स्थान पटकावले आहे.
 
फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय कर्णधार विराट कोहली 893 गुणांसह दुसऱ्या स्थानावर असून 945 गुणांसह अग्रस्थानी असलेला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ याची सर डॉन ब्रॅडमन यांच्या 961 गुणांच्या विक्रमाकडे सुरू असलेली घोडदौड कायम आहे. सर्वाधिक कसोटी खेळणाऱ्यांच्या यादीत स्मिथने ब्रॅडमनना कधीच मागे टाकले आहे. आपल्या कारकिर्दीत 114 कसोटी खेळणारा स्मिथ सर्वाधिक कसोटी खेळणाऱ्यांच्या यादीत सर गॅरी सोबर्स (189 कसोटी), व्हिव्ह रिचर्डस (179), ब्रायन लारा (140) आणि सचिन तेंडुलकर (139) यांच्यानंतर पाचव्या स्थानावर आहे.
 
गोलंदाजांच्या क्रमवारीत रवींद्र जडेजा व आर. अश्‍विन तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर कायम असून इंग्लंडचा जेम्स अँडरसन 892 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. अष्टपैलूंच्या क्रमवारीत जडेजा (870) व अश्‍विन (829) अनुक्रमे दुसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत. सांघिक क्रमवारीत भारत 124 गुणांसह पहिल्या क्रमांकावर कायम असून दक्षिण आफ्रिका (111), इंग्लंड (105), न्यूझीलंड (100) आणि ऑस्ट्रेलिया (97) त्याखालोखाल पहिल्या पाचात आहेत.