बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : मंगळवार, 28 मे 2024 (08:43 IST)

या मुंबईकर क्रिकेटरचं 'खोट्या बातमी'नं संपलेलं करिअर, आता अमेरिकन टीमचा 'स्टार'

ते 2000 चं दशक होतं. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या स्कूल टूर्नामेंटचा अंतिम सामना सुरू होता. तो सामना पाहण्यासाठी माजी भारतीय क्रिकेट खेळाडू दिलीप सरदेसाई आले होते.
 
डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज हरमीत सिंह मुंबईच्या स्वामी विवेकानंद शाळेकडून खेळत होता. हरमीतच्या गोलंदाजीचा दिलीप सरदेसाई यांच्यावर प्रभाव पडला. सरदेसाईंना हरमीतमध्ये माजी भारतीय गोलंदाज बिशन सिंह बेदी यांची झलक दिसली.
 
मुंबईच्या क्रिकेट संघाबद्दल नेहमीच बोललं जातं. या संघात स्थान मिळवण्यासाठी तीव्र चुरस असते. याच हरमीत सिंहने पुढे फक्त 17व्या वर्षी मुंबईच्या संघात स्थान पटकावलं.
 
हरमीत सिंह भारताच्या 19 वर्षांखालील खेळाडूंच्या संघातदेखील होता. पुढे तो अमेरिकेच्या राष्ट्रीय संघात समाविष्ट झाल्यावर मात्र त्याच्या आयुष्याला एक वेगळंच वळण लागलं. अमेरिकन क्रिकेट संघ टी20 विश्वचषक 2024 साठी पात्र ठरण्यासाठी हरमीतचं योगदान महत्त्वाचं होतं.
 
टी20 विश्वचषक 2024 आधी बांगलादेश संघाने अमेरिकेचा दौरा केला होता. त्यावेळेस क्रिकेट जगताचं लक्ष हरमीतकडे गेलं. त्या टी20 मालिकेच्या पहिल्याच सामन्यात हरमीत सिंहने जबरदस्त गोलंदाजी केली. त्याचबरोबर त्याने 13 चेंडूंमध्ये 33 धावा ठोकल्या. त्याच्या या दणदणीत कामगिरीमुळे अमेरिकन संघाने बांगलादेशच्या संघावर विजय मिळवला.
 
या सामन्याचा सामनावीर हरमीत सिंह ठरला. सामन्यानंतर हरमीतनं म्हटलं की, "आम्हाला कमकुमत संघ समजू नका."
 
दुसऱ्या सामन्यात हरमीत सिंहच्या हातून फारसं काही घडलं नाही. मात्र अमेरिकन संघानं इतिहास घडवला. दुसरा सामनासुद्धा जिंकत अमेरिकन संघानं ती मालिकादेखील जिंकली.
 
टी20 विश्वचषकासाठी अमेरिकन संघानं जी तयारी केली. त्याबाबत हरमीत सिंह खूपच समाधानी दिसतो.
तो म्हणतो, "अलीकडेच आम्ही कॅनडाला 4-0 असं हरवलं आहे. त्यानंतर आम्ही बांगलादेशविरुद्ध देखील चांगली कामगिरी केली. आमचा संघ समतोल आहे. संघात पुरेसे अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यामुळे आमचा संघ मजबूत झाला आहे."
 
टी20 विश्वचषकात 12 जूनला भारताचा सामना अमेरिकेशी देखील होणारा आहे.
 
हरमीतला जेव्हा अमेरिकेत क्रिकेटबद्दल कसं वातावरण आहे हे विचारण्यात आलं, तेव्हा त्यानं सांगितलं, "आयसीसीला माहित आहे की अमेरिका ही खेळांची मोठी बाजारपेठ आहे. जर अमेरिकन क्रिकेट संघानं चांगली कामगिरी केली, तर त्यावरून लक्षात येईल की इथे देखील क्रिकेटचं वेड आहे. यातून आयसीसीला गुंतवणूक करण्याची हमी मिळेल.
 
"अमेरिकेत असणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांमध्ये क्रिकेटचं जबरदस्त वेड आहे. त्याचबरोबर अमेरिकेतील बेसबॉल आवडणारे लोक देखील आता क्रिकेटमध्ये रस घेत आहेत. क्रिकेटसाठी ही चांगली बाब आहे."
 
हरमीत सिंह अमेरिकन क्रिकेट संघात एक अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळतो आहे. भारतासाठी 19 वर्षांखालील दोन विश्वचषक स्पर्धा खेळलेला हरमीत आता अमेरिकन क्रिकेट संघातील प्रमुख खेळाडू बनला आहे.
 
मात्र, एक खेळाडू म्हणून त्याने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. स्पॉट फिक्सिंगचे आरोप त्याच्यावर झाले. त्यानंतर हरमीतनं पुनरागमन केलं. क्रिकेटच्या या प्रवासात त्याला जवळच्या माणसांनादेखील गमवावं लागलं आहे.
 
मुंबईतून सुरुवात
मुंबईतील एका मध्यम वर्गीय कुटुंबातील हरमीत सिंहनं सर्वात आधी मुंबईतील शालेय क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली होती. हरमीतचं कौशल्य इतकं होतं की त्याला मुंबईच्या 14, 16 आणि 19 वर्षांखालील संघांमध्ये निवडण्यात आलं होतं.
 
17 व्या वर्षी हरमीतची निवड मुंबईच्या रणजी संघासाठी झाली होती. प्रथम श्रेणी क्रिकेटर म्हणून हरमीतची सुरूवात चांगली झाली. मात्र, मुंबईकडून फारसे सामने खेळण्याची संधी त्याला मिळाली नाही. एका मोसमात जेव्हा त्याला संघात स्थान मिळालं नव्हतं, तेव्हा त्याला जम्मू-काश्मीरच्या संघाकडून खेळण्याची ऑफर आली.
 
जम्मू-काश्मीर संघासाठी तो दोन सामने खेळला. मात्र अधिक काळ तो त्या संघाबरोबर राहिला नाही आणि मुंबईत परत आला. त्यानंतर त्याला त्रिपुराच्या क्रिकेट संघाकडून खेळण्याची संधी मिळाली.
 
त्रिपुराच्या किक्रेट संघाबरोबर खेळायला मिळालं ही आपल्या करियरसाठी झालेली चांगली गोष्ट होती असं हरमीतला वाटतं. याबद्दल तो सांगतो की, "एक व्यावसायिक क्रिकेटर म्हणून त्रिपुराच्या संघाकडून खेळण्याचा मला खूप फायदा झाला. त्यामुळेच मला 30 प्रथम श्रेणी सामन्यांतून खेळता आलं."
 
अमेरिकेत जाण्यामागचं कारण?
हरमीत सिंह विविध प्रकारे क्रिकेट खेळत होता. मात्र, हरमीतला मुंबईच्या क्रिकेट संघात किंवा भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळू शकलं नाही. 2020 मध्ये त्याला अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली आणि त्याने ती स्वीकारली.
 
अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेण्यामागचं कारण हरमीत सिंह सांगतो. तो म्हणतो, "जेव्हा अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली तेव्हा मी विचार केला की पुढील पाच वर्षात क्रिकेटच्या विश्वात मी स्वत:ला कुठे पाहतो. जेव्हा तुम्ही रणजी ट्रॉफीमध्ये क्रिकेट खेळता तेव्हा तुम्हाला हे ठाऊक नसतं की पुढील वर्षी तुम्हाला क्रिकेट संघात स्थान मिळेल की नाही.
 
"ही एक चांगली ऑफर होती. त्यामुळे माझं क्रिकेटचं वेड देखील कायम राहणार होतं आणि मला चांगले पैसे देखील मिळणार होते. एका रणजी क्रिकेटपटूला त्याच सामन्यासाठी पैसे मिळतात, ज्यात तो सामना खेळतो. जेव्हा सामना नसतो तेव्हा पैसे मिळत नाही. अशात कुटुंबाचीदेखील जबाबदारी असते.
 
"2009-2010 मध्ये मी पहिला प्रथम श्रेणी क्रिकेट सामना खेळलो होतो. त्यानंतर 2018-19 पर्यत मला फक्त 30 प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळण्याची संधी मिळाली होती. त्यामुळेच मी अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला होता."
 
ज्या खेळाडची बीसीआयमध्ये नोंदणी झालेली आहे किंवा बीसीसीआयबरोबर करार झालेला आहे, त्याला निवृत्तीनंतरच परदेशी लीगमध्ये क्रिकेट खेळता येतं.
 
तरुण भारतीय खेळाडूंना परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी दिली पाहिजे, असं विचारल्यावर हरमीत सिंहनं या मुद्द्याच्या दोन्ही बाजू सांगितल्या.
 
तो म्हणतो, "जे खेळाडू भारतासाठी खेळत आहेत त्यांनी परदेशी लीगमध्ये खेळता कामा नये. कारण बीसीसीआय त्यांना चांगले पैसे देतं. मात्र, जे खेळाडू प्रथम श्रेणी क्रिकेटपर्यंत देखील पोहोचले नाहीत, त्यांच्याकडे कमाईचं कोणतंही साधन नसतं. त्यांना परदेशी लीगमध्ये क्रिकेट खेळण्याची परवानगी बीसीसीआयनं दिली पाहिजे."
 
तो पुढे म्हणाला, "ते खेळाडूसुद्धा आंतरराष्ट्रीय खेळाडूंप्रमाणे कठोर मेहनत करत असतात. त्यांना परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी मिळाली पाहिजे. माझ्यासोबत खेळलेले अनेक खेळाडू अजूनसुद्धा संघर्ष करत आहेत."
 
हरमीतचं नाव जेव्हा स्पॉट फिक्सिंगशी जोडलं गेलं...
2013 मध्ये भारतीय क्रिकेट संघात स्पॉट फिक्सिंगचा मुद्दा जोरदार चर्चेत होता. या प्रकरणाशी अनेक बड्या खेळाडूंची नावं जोडली गेली होती. त्याच वर्षी हरमीत सिंह आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघाकडून खेळला होता.
 
या प्रकरणात हरमीत सिंहचं नावदेखील आलं होतं. त्याच्यावर आरोप करण्यात आला होता की त्याला त्याच्याबरोबरच्या खेळाडूंच्या स्पॉट फिक्सिंगबद्दल माहित होतं. मात्र त्याची माहिती हरमीतनं बीसीसीआयला दिली नव्हती.
 
तपासानंतर हरमीत सिंहवर करण्यात आलेले हे आरोप खोटे असल्याचं सिद्ध झालं. दिल्ली पोलिसांनी देखील त्याला क्लिन चीट दिली होती. हरमीतचं म्हणणं आहे की, तसं तर या प्रकरणाचा त्याच्यावर खूप विपरित परिणाम झाला. मात्र त्याहून अधिक महत्त्वाची बाब म्हणजे प्रसारमाध्यमांमधून आलेल्या चुकीच्या बातम्यांमुळे त्याचं करियर संपलं होतं.
हरमीत सिंह सांगतो, "एका प्रमुख वृत्तपत्रानं खोटी बातमी छापली होती की, या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत बीसीसीआयनं हरमीत सिंहला निलंबित केलं आहे. प्रत्यक्षात ही गोष्ट खरी नव्हती. बीसीसीआयनं मला कधीही निलंबित केलं नव्हतं.
 
"एका प्रमुख वृत्तपत्रानं ही बातमी छापल्यामुळे इतर सर्व प्रसारमाध्यमांनी देखील तीच बातमी प्रसारित केली. मी प्रसारमाध्यमांना याबद्दल वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न केले मात्र ते थांबले नाहीत.
 
"मग मी जेव्हा त्या वृत्तपत्राच्या संपादकांशी बोललो तेव्हा त्यांनी वृत्तपत्रात एक प्रकारची माफी छापली. मात्र तोपर्यत या खोट्या बातमीमुळे माझं नुकसान झालं होतं. त्यावेळेस मला विदर्भाचं कंत्राट मिळालं होतं. मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे ते माझ्या हातून गेलं आणि माझ्याकडे वाईट नजरेनं पाहिलं जाऊ लागलं."
 
कोव्हिड काळात आईच्या शेवटच्या क्षणी सोबत नसल्याची खंत
2020 मध्ये हरमीत सिंह अमेरिकेत गेला. 2021 मध्ये कोरोनाच्या संकटाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात हरमीत सिंहच्या आईचं निधन झालं. तिच्या निधनाचा हरमीतला मोठा धक्का बसला. आपल्या आईबद्दल त्याने एक भावनिक पोस्टदेखील केली होती.
 
त्या पोस्टमध्ये हरमीतनं लिहिलं होतं, "माझ्या आईचं निधन झालं तेव्हा मी अमेरिकेत होतो. माझी पत्नीसुद्धा गर्भवती होती. भारतात कोविडची दुसरी लाट सुरू होती आणि मला भारतात परत जाता आलं नाही. त्या काळात मी आईसोबत नव्हतो याची हुरहुर मला आहे. मी आधी कधी रडलो नव्हतो, मात्र जेव्हा माझ्या आईचं निधन झालं तेव्ही मी खूप रडलो होतो."
 
हरमीत सिंहच्या आईचं निधन झाल्यानंतर एक महिन्याने त्याच्या आजोबांचंदेखील निधन झालं.
काही दिवसांनी हरमीतला मुलगी झाली. हरमीत म्हणतो, त्याच्या मुलीमुळे त्याचं आयुष्य पुन्हा रुळावर आलं.
 
Published By- Priya Dixit