IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना 24 ऑक्टोबरपासून पुण्यात होणार
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना 24 ऑक्टोबरपासून पुण्याच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.भारतीय संघाला न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 8 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.
संपूर्ण भारतीय संघ अवघ्या 46 धावांवर गारद झाला. टीम इंडिया संपूर्ण कसोटीत या धक्क्यातून सावरू शकली नाही आणि 36 वर्षांनंतर घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धचा कसोटी सामना गमावला. हा सामना गमावल्याने टीम इंडिया मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे.आता दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला जिंकावे लागणार आहे.
टीम इंडियाने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आतापर्यंत एकूण दोन कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी एकात भारताचा विजय झाला आहे आणि एक पराभव झाला आहे.
भारतीय संघ भलेही पहिला कसोटी सामना हरला असेल, पण टीम इंडियाकडे असे खेळाडू आहेत जे सामना जिंकण्यास सक्षम आहेत.
सरफराज खानने पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात शतक झळकावले आणि त्याला ऋषभ पंतने चांगली साथ दिली. सरफराज ने 150 धावांची खेळी केली होती, तर पंतने 99 धावा केल्या होत्या.आता दुसऱ्या कसोटीत चाहत्यांना पुन्हा एकदा या फलंदाजांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.
Edited By - Priya Dixit