1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 27 मे 2024 (17:38 IST)

टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूची 'ही' आहे खासियत

आयपीएलनंतर भारतीय क्रिकेट संघासमोर टी-20 विश्चचषकाचं आव्हान आहे.महत्त्वाची बाब म्हणजे, यंदाच्या टी-20 विश्चचषकाचं आयोजन अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये केलं जात आहे.नवव्या टी-20 विश्वचषकामध्ये भारतीय संघात दिग्गज खेळाडूंचा समावेश असणार आहे.

भारतीय संघातील अनेक महत्त्वाचे खेळाडू साधारण फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे यंदाच्या टी-20 विश्वचषकात भारतासमोर मोठं आव्हान असणार आहे.मात्र, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली या संघानं अनेक विजय मिळवले आहेत. यामुळेच भारताला यंदाच्या विश्वचषकाचा प्रमुख दावेदार देखील मानलं जातं आहे.
भारतीय संघातील ज्या 15 खेळाडूंवर मोठी जबाबदारी आहे, त्यांच्यावर एक नजर टाकूया.
 
1. रोहित शर्मा (कर्णधार)
रोहित शर्माचा हा नववा टी-20 विश्वचषक असेल. 2007 मध्ये रोहितनं टी-20 प्रकारातील आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिलं अर्धशतक ठोकलं होतं. त्याच वर्षी भारतानं टी-20 विश्वचषकदेखील जिंकला होता.
रोहित शर्माला पांढऱ्या चेंडू खेळणाऱ्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानलं जातं.त्याने आतापर्यत 151 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यात 31.79 च्या सरासरीनं 3,974 धावा काढल्या आहेत.त्याशिवाय 5 शतकं आणि 29 अर्धशतकंदेखील ठोकली आहेत. याचबरोबर रोहित शर्मानं सर्वाधिक वेळा म्हणजे सहा वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. यातील पाचवेळा मुंबई इंडियन्सच्या संघासाठी तर एक वेळा डेक्कन चार्जर्सच्या संघासाठी.
भारतीय संघाला रोहित कडून दमदार सुरूवात आणि चांगल्या नेतृत्वाची अपेक्षा आहे. किंबहुना याचसाठी रोहित ओळखला
 
2. यशस्वी जैस्वाल
यशस्वी जैस्वालची ओळख पहिल्याच चेंडूपासून चौकार, षटकारांसाठी सरसावणाऱ्या आक्रमक फलंदाजाची आहे.
विशेष गोष्ट अशी की यशस्वी कसेही शॉट्स मारून धावा करत नाही. तर त्याचे बहुतांश शॉट्स तंत्रशुद्ध फलंदाजीतून खेळलेले असतात.क्रिकेटचं वेड त्याला लहानपणीच उत्तर प्रदेशातील एका गावातून मुंबईत घेऊन आलं.सुरूवातीच्या दिवसांत त्याला खूप अडचणींना तोंड द्यावं लागलं. पाणीपुरी विकावी लागली आणि तंबूतदेखील झोपण्याची वेळ आली.आयपीएलमध्ये निवड झाल्यानंतर त्याचं नशीब उघडलं आणि 2023 मध्ये भारतीय संघातदेखील त्याला स्थान मिळालं.17 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 33 च्या सरासरीनं 502 धावा केल्या आहेत. आपल्या छोट्याशा करियरमध्ये यशस्वीनं एक शतक आणि 4 अर्धशतक झळकावली आहेत.
 
3. विराट कोहली
विराट कोहलीनं आयपीएल 2024 मध्ये शानदार कामगिरी केली आहे. त्यामुळेच अनेक तज्ज्ञ यशस्वीऐवजी विराटनंच सलामीला यावं असा सल्ला देत आहेत.तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा विराटदेखील बहुधा कॅप्टन रोहित शर्माप्रमाणेच आपला शेवटचा टी-20 विश्वचषक खेळतो आहे. त्यामुळेच विश्वचषक जिंकूनच क्रिकेटमधून निवृत्त होण्याची त्याची इच्छा असेल.कोहलीनं क्रिकेटच्या सर्वच प्रकारांमध्ये अव्वल कामगिरी केली आहे. 117 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 51.75 च्या सरासरीनं 4,037 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 37 अर्धशतकांचा समावेश आहे. विराट भारतीय फलंदाजीचा मुख्य आधारस्तंभ असेल आणि भारतीय संघासमोर येणारं आव्हान जितकं मोठं असेल तितकीच विराटची कामगिरी शानदार असेल अशी आशा सर्वांना आहे.
 
4. सूर्य कुमार यादव
एबी डिविलियर्सनंतर बहुधा सूर्यकुमार हाच एकमेव फलंदाज आहे ज्याला 360 अंशाचा फलंदाज म्हटलं जाऊ शकतं.ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला फाइन लेगच्या वरून षटकार मारणं जर कोणाला शक्य असेल तर ते सूर्य कुमार यादवलास्काय' नावाने प्रसिद्ध असलेल्या या खेळाडूनं फलंदाजी सोपी करून टाकली आहे.
मुंबई इंडियन्सनं आयपीएलमध्ये मिळवलेल्या यशामध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या सूर्यकुमारचा मोठा वाटा आहे.टी20 मध्ये देखील तो महत्त्वाचा भारतीय खेळाडू आहे. आतापर्यत 60 टी20 सामन्यांमधून त्याने 45.5 च्या सरासरीनं 2,141 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 4 शतकं आणि 17 अर्धशतकं आहेत. भारतीय खेळाडूंमध्ये त्याचा 171.5 चा स्टाईक रेट देखील सर्वाधिक आहे.
 
5. हार्दिक पंड्या (उप कर्णधार)
भारतीय संघाचा उप कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार असलेला हार्दिक पंड्याला यंदाचा आयपीएल मोसम चांगला गेलेला नाही. तो वाईट फॉर्ममध्ये होता.दुखापती आणि शस्त्रक्रिया यामुळेदेखील त्याच्या करियरमध्ये चढ-उतार आले आहेत.मात्र हार्दिक असा अष्टपैलू खेळाडू आहे, ज्याच्यामुळे भारतीय संघात जबरदस्त संतुलन साधलं जातं. असा फलंदाज जो कोणत्याही क्रमांकावर येऊन धावा काढतो आणि मध्यमगतीनं गोलंदाजी करून विकेट देखील मिळतो, कोणत्या संघाला नकोसा असेल.त्याने आतापर्यत 92 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून 1,348 धावा केल्या आहेत आणि 73 गडी बाद केले आहेत.तो फॉर्ममध्ये असताना त्याची गणना जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये होते.भारताला या विश्वचषकात ऐन भरात असलेल्या हार्दिकचीच गरज आहे.
 
6. रवींद्र जडेजा
रवींद्र जडेजा हा रोहित आणि कोहलीबरोबरच या संघातील अनुभवी खेळाडू आहे.
किफायतशीर गोलंदाजी करणं, वेगानं धावा काढणं आणि मैदानात दमदार क्षेत्ररक्षण करणं ही त्याची वैशिष्ट्ये आहेत.फिरकी गोलंदाज म्हणूनही तो संघाला हवासा असतो.35 वर्षांच्या जडेजानं चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. 66 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून त्याने 23 च्या सरासरीनं 480 धावा केल्या आहेत. तर गोलंदाजी करताना 28 च्या सरासरीनं 53 गडी बाद केले आहेत.
 
 
7. शिवम दुबे
शिवम दुबेची निवड भारतीय संघात एका विशेष कारणामुळे करण्यात आली आहे. ती म्हणजे षटकार ठोकण्याची त्याची जबरदस्त क्षमता.चेन्नई सुपरकिंग्ससाठी खेळताना त्यानं मागील तीन मोसमात 150 हून स्टाइक रेटनं धावा केल्या आहेत. गरज असताना त्यानं षटकारांचा पाऊसदेखील पाडला आहे.
शिवाय आवश्यकता भासल्यास तो मध्यमगतीनं गोलंदाजी देखील करतो.21 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून त्यानं 39 च्या सरासरीनं 276 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर 8 गडी देखील बाद केले आहेत.जर अंतिम 11 खेळाडूंमध्ये त्याला स्थान मिळालं तर फलंदाजीबरोबरच त्यानं हार्दिक बरोबर चार षटकांची गोलंदाजीदेखील करावी ही संघाला त्याच्याकडून अपेक्षा असेल.
 
8. अक्षर पटेल
अक्षर पटेल संघात रवींद्र जडेजाची फोटोकॉपी असल्यासारखा आहे. त्याच प्रकारची गोलंदाजी, चपळ क्षेत्ररक्षण आणि दणकून फलंजाजी करण्यास अक्षर सक्षम आहे. दोघेही एकसारखीच गोलंदाजी करतात. त्यामुळेच एकाचवेळी या दोघांनाही संघात स्थान मिळणं अवघड आहे.
 
9. ऋषभ पंत
जीव जाण्याचा धोका असलेल्या एका भयानक अपघातातून वाचून पंत आयपीएलमध्ये उतरला.
आता तो भारतीय संघासाठी पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक बनला आहे. ऋषभ पंत यष्टीरक्षण तर चपळाईनं करतोच, त्याचबरोबर तो आक्रमक फलंदाजी करण्यासदेखील सक्षम आहे. त्याची आणखी एक खुबी म्हणजे तो डाव्या हाताचा फलंदाज आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजीच्या फळीत वैविध्य येतं. 66 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून त्यानं 987 धावा केल्या आहेत. तर यष्टीमागे त्याने 27 झेल पकडले आहेत. सोबत 9 स्टम्पिंगदेखील केल्या आहेत.
 
10. संजू सॅमसन
या विश्वचषकासाठी भारतीय संघात संजू सॅमसनची निवड दुसऱ्या यष्टीरक्षक फलंदाजाच्या रुपानं झाली आहे.
त्याच्या चाहत्यांकडून नेहमी अशी टीका केली जाते की गुणवत्ता असूनदेखील त्याला भारतीय संघात योग्य संधी मिळत नाही. संघाचं व्यवस्थापन सॅमसन आणि पंत यापैकी एकाची निवड करेल. अर्थात सॅमसन फलंदाज म्हणूनदेखील खेळू शकतो. आयपीएलमध्ये त्याने जबरदस्त फलंदाजी केली आहे आणि टी20 सामन्यांमध्ये त्याने आतापर्यत सहा हजारांपेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
25 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून त्याने 19 च्या सरासरीनं 374 धावा केल्या आहेत. या विश्वचषकात आपली सरासरी सुधारण्यासाठी तो उत्सुक असेल.
 
11. जसप्रीत बुमराह
टी 20 असो की एकदिवसीय सामने असोत की कसोटी सामने असोत जसप्रीत बुमराहने तिन्ही प्रकारांमध्ये नंबर वन रॅंकिंग मिळवली आहे. त्याच्या गोलंदाजीचा वेग,अचूक दिशा आणि लांबी आणि जबरदस्त यॉर्कर्समुळे तो कोणत्याही फलंदाजासाठी धोकादायक ठरू शकतो. जसप्रीत बुमराह या संघाचा अतिशय महत्त्वाचा खेळाडू आहे. प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज झटपट बाद करण्याची अपेक्षा त्याच्याकडून भारतीय संघाला असेल.
आयपीएलमध्ये लसिथ मलिंगा नंतर तो मुंबईसाठी सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज आहे.आतापर्यत 62 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून त्याने 19.66 च्या सरासरीनं 74 गडी बाद केले आहेत. यंदाच्या विश्वचषकात त्याने जास्तीत जास्त गडी बाद करावेत हीच त्याच्याकडून भारतीय संघाची अपेक्षा असणार आहे.
 
12. मोहम्मद सिराज
मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत दुसऱ्या सीमरची भूमिका सिराज पार पाडू शकतो.
मागील दोन वर्षात त्याच्या गोलंदाजीत सुधारणा झाली आहे. त्यामुळेच त्याच्याकडे भरवशाचा गोलंदाज म्हणून पाहिलं जातं आहे चेंडूला इनस्विंगं करण्याची नैसर्गिक प्रतिभा त्याला लाभलेली आहे. त्यामुळेच डावखुऱ्या फलंदाजांसाठी तो अतिशय धोकादायक ठरतो.आतापर्यत 10 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून त्याने 12 गडी बाद केले आहेत. यामध्ये 17 धावा देऊन 4 गडी बाद करणं ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.
 
13. अर्शदीप सिंह
डावखुरा मध्यमगती गोलंदाज असलेला अर्शदीप सिंह 2018 मध्ये 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग होता. तो हवेत चेंडूला दोन्ही बाजूने स्विंग करू शकतो. याच कारणामुळे आगामी विश्वचषकात त्याचा फॉर्म भारतीय संघासाठी अतिशय महत्त्वाचा असेल.तो आतापर्यत 44 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. यातून दिसून येत की निवड समितीकडून सिराजच्या आधी त्याची निवड करण्यात येते आहे.44 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून त्याने 20.87 च्या सरासरीनं 62 गडी बाद केले आहेत.
 
14. कुलदीप यादव
दीर्घ काळानंतर कुलचा म्हणजे कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल भारतीय संघात एकत्र खेळताना दिसू शकतात.
कुलदीपनं मागील काही वर्षांमध्ये आपल्या गोलंदाजीच्या वेगावर चांगलं नियंत्रण मिळवलं आहे. त्यामुळेच त्याला चांगले गडीदेखील बाद करता येत आहेत.फिरकी गोलंदाज म्हणून तो भारतीय संघाची पहिली पसंती आहे.आतापर्यत 35 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून त्याने 59 गडी बाद केले आहेत. 14.10 धावा प्रति गडी ही त्याची सरासरी आहे.
 
15. युजवेंद्र चहल
युजवेंद्र चहल हा आयपीएलमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा खेळाडू आहे.तो एक आक्रमक लेग स्पिनर आहे. हवेत चेंडू उसळवण्यास तो घाबरत नाही.चेंडूला जबरदस्त टर्न देत त्याने आतापर्यत 80 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून 96 गडी बाद केले आहेत. अंतिम संघामध्ये कुलदीप आणि चहल या दोघांनाही स्थान मिळावं अशीच भारतीय संघाची इच्छा असेल. खेळपट्टीकडून थोडीदेखील मदत मिळण्याची शक्यता असेल तर हे दोन्ही खेळाडू एकत्र खेळताना दिसतील आणि प्रतिस्पर्धी संघासाठी डोकेदुखी ठरतील.
 
 
Published By- Priya Dixit