गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 20 सप्टेंबर 2021 (10:49 IST)

विराट कोहली RCB चं कर्णधारपद सोडणार

Virat Kohli to step down as RCB captain after IPL 2021
विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारपासून सुरू झालेल्या 2021 उर्वरित हंगामानंतर कोहली आरसीबीचं कर्णधारपद सोडणार आहे.
 
"आरसीबीचा कर्णधार म्हणून हा माझा शेवटचा हंगाम आहे. आरसीबीसाठी खेळाडू म्हणून मी सदैव खेळत राहीन. आरसीबीचे सर्व चाहते, समर्थक यांचे मी मनापासून आभार मानतो," असं आरसीबीच्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या व्हीडिओत कोहलीने सांगितलं.
 
आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून कोहली आरसीबीकडूनच खेळतो आहे. 2013 मध्ये कोहलीकडे आरसीबीच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. मात्र कोहलीच्या नेतृत्वात आरसीबीला आयपीएल जेतेपदावर नाव कोरता आलेलं नाही.
 
कोहलीने 132 सामन्यात आरसीबीचं नेतृत्व केलं आहे. यापैकी 60 सामन्यांमध्ये आरसीबीने विजय मिळवला आहे तर 65 लढतीत पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
 
काही दिवसांपूर्वीच कोहलीने पुढच्या महिन्यात होणाऱ्या ट्वेन्टी-20 वर्ल्डकपनंतर भारतीय ट्वेन्टी20 संघाचं कर्णधारपद सोडणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.
 
2019 पासून कोहलीच्या बॅटमधून लौकिकाला साजेशा धावा झालेल्या नाहीत. फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कोहलीने दोन कर्णधारपदं सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
 
भारतीय टेस्ट तसंच वनडे संघाच्या कर्णधारपदी कोहलीच असेल. आयपीएल स्पर्धेत पुढच्या हंगामापासून कोहली खेळाडू म्हणून उपलब्ध असेल.