मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 16 ऑक्टोबर 2023 (23:24 IST)

क्रिकेटसाठी ऑलिंपिकचं दार का आणि कसं उघडलं?

जान्हवी मुळे
क्रिकेट वर्ल्ड कप सुरू असतानाच करोडो क्रिकेटप्रेमींसाठीच आणखी एक आनंदाची बातमी आहे. ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचं पुनरागमन झालं आहे.
 
2028 साली अमेरिकेच्या लॉस एंजेलिस शहरात होणार्‍या ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याच्या प्रस्तावावर आंतरराष्ट्रीय ऑलिपिक समितीनं म्हणजे आयओसीनं शिक्कामोर्तब केलं आहे.
 
क्रिकेटशिवाय स्क्वॉश, बेसबॉल/सॉफ्टबॉस, फ्लॅग फुटबॉल आणि लक्रॉस या खेळांनाही लॉस एंजेलिस ऑलिंपिकसाठी मान्यता मिळाली आहे. पण भारतात चर्चा अर्थातच क्रिकेटची जास्त होते आहे.
 
मुंबईत, म्हणजे भारतीय क्रिकेटच्या पंढरीतच, हा निर्णय घेण्याचा एक खास योगही आयओसीनं साधला आहे. आयओसीच्या मुंबईतल्या बैठकीत या प्रस्तावावर मतदान झालं तेव्हा दोनच सदस्यांनी विरोधात मतदान केलं.
 
त्यामुळे तब्बल 128 वर्षांनंतर ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा समावेश झालेला पाहायला मिळेल. 1900 साली ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा सामना खेळवण्यात होता.
 
लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये (LA28) पुरुष आणि महिलांच्या ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेचा समावेश झाला असून स्पर्धेचं नेमकं स्वरुप कसं असेल याविषयीची माहिती येत्या काही काळात जाहीर केली जाईल.
 
हा निर्णय आत्ताच का घेण्यात आला? याआधी ऑलिंपिकमध्ये क्रिकेट कधी खेळवण्यात आलं होतं आणि आता आयओसीच्या निर्णयाचे काय परिणाम होऊ शकतात, जाणून घेऊयात.
 
क्रिकेटसाठी या होत्या अडचणी
क्रिकेट पाचही खंडांमध्ये खेळलं जातं. पण तरीही बराच काळ हा खेळ ऑलिंपिकपासून दूरच राहिला आहे.
 
आजवर क्रिकेट ऑलिंपिकपासून दूर राहण्यात तीन मोठ्या अडचणी होत्या. एक म्हणजे या खेळाचा लांबवर चालणारा फॉरमॅट (टेस्ट आणि वन डे), मर्यादित देशांमध्येच असलेली लोकप्रियता आणि बीसीसीआयसारख्या बलाढ्य क्रिकेट बोर्डांकडून असलेली अनुत्सुकता.
 
पण ट्वेन्टी-20 हा क्रिकेटचा नवा फॉरमॅट आल्यावर चित्र बदललं.
 
क्रिकेटचा ऑलिंपिकमध्ये समावेश करण्यासाठी इंटरनॅशनल क्रिकेट कौंसिल म्हणजे आयसीसीनंही प्रयत्न नव्यानं सुरू केले आणि या खेळाला जास्तीत जास्त देशांत नेण्यासाठी पावलं उचलली.
 
केवळ हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्या देशांत टेस्ट क्रिकेट खेळलं जात होतं, पण 2017-18 साली आयसीसीने 104 देशांना T20 साठी सदस्यत्व दिलं. त्यामुळे क्रिकेटचा ऑलिंपिक चळवळीत येण्याचा मार्ग मोकळा झाला आणि या खेळाला प्रत्यक्ष ऑलिंपिकमध्ये स्थान देण्याचे प्रयत्न सुरू झाले.
 
क्रिकेटची आर्थिक गणितं आणि व्यग्र वेळापत्रक पाहता बीसीसीआय, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातील क्रिकेट बोर्ड ऑलिंपिकमध्ये सहभागासाठी फारसे उत्सुक नव्हते. पण या देशांतही गेल्या वीस वर्षांत बरंच मतपरिवर्तन झालंय.
 
2021 साली बीसीसीआयनं ऑलिंपिकसाठी भारतीय टीम पाठवण्यास आपण तयार असल्याचं स्पष्ट केलं होतं, अर्थात त्यात भारतीय ऑलिंपिक संघटनेकडून कुठलाही हस्तक्षेप नसावा अशी अटही घातली होती.
 
दरम्यान, एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, साऊथ एशियन गेम्स, पॅसिफिक गेम्स अशा स्पर्धांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला, तेव्हा त्याला चांगला प्रतिसादही मिळाला.
 
या सगळ्यामुळे क्रिकेटचा ऑलिंपिकमध्ये समावेश करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळालं आणि अखेर लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाला.
 
लॉस एंजेलिस ऑलिंपिकच कशासाठी?
क्रिकेट म्हटलं की कुणाला अमेरिकेची पटकन आठवण येतही नाही. मग त्याच अमेरिकेत होत असलेल्या ऑलिंपिकमध्ये म्हणजे LA28 मध्ये क्रिकेटला स्थान कसं मिळालं?
 
ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडताना लॉस एंजेलिस ऑलिंपिकच्या आयोजकांनी त्यामागची कारणं स्पष्ट केली आहेत.
 
ट्वेन्टी20 क्रिकेटचा वेगवान फॉरमॅट वेगानं लोकप्रिय होतो आहे, युवावर्गात या खेळाचे मोठे चाहते आहेत. लोकसंख्येचा विचार केला तर 2 अब्ज 50 कोटी लोक हा खेळ पाहतात.
 
डिजिटल विश्वात क्रिकेटची लोकप्रियता मोठी आहे. 2028 ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक स्पर्धांचे क्रीडा संचालक निकोलो कांपारिनी यांनी त्याविषयी बोलताना विराट कोहलीचं उदाहरण दिलंय.
 
निकोलो सांगतात, “आजच्या घडीला विराट कोहली सोशल मीडियावरचा तिसरा सर्वांत लोकप्रिय अथलीट आहे. त्याचे फॉलॉओर्स जवळपास 34 कोटींहून जास्त आहे.
 
“सोशल मीडियावर लब्रॉन जेम्स, टायगर वूड्स आणि टॉम ब्रॅडी या अमेरिकेतल्या तीन सुपरस्टार्सच्या फॉलोअर्सना एकत्र केलं, तरी विराटच्या फॉलोअर्सची संख्या त्यापेक्षा मोठी आहे.”
 
अमेरिकेत क्रिकेटच्या प्रसारासाठी होत असलेले प्रयत्न, हेही LA28 मध्ये क्रिकेटच्या समावेशामागचं एक महत्त्वाचं कारण आहे.
 
गेल्या काही वर्षांत अमेरिकेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांचंही आयोजन झालं आहे आणि भारतीय संघही तिथे ट्वेन्टी20 सामने खेळला आहे.
 
जुलै 2023 मध्ये अमेरिकेत मेजर लीग क्रिकेट या ट्वेन्टी20चं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत भारतातल्या आयपीएल टीम्स तसंच सत्या नडेलांसारख्या टेक क्षेत्रातल्या व्यक्तींनी गुंतवणूक केली होती.
 
2024 सालच्या ट्वेन्टी20 विश्वचषकाचं आयोजन वेस्ट इंडीज आणि अमेरिका मिळून करणार आहेत.
 
अर्थात हे सगळं आयसीसीच्या सहभागाशिवाय अशक्य होतं.
 
ऑलिंपिकसाठी आयसीसीचाही हातभार
क्रिकेटचा ऑलिंपिकमध्ये सहभाग व्हावा यासाठी आयसीसीनं विशेषतः गेल्या दोन वर्षांत अनेक पावलं उचलली आहेत.
 
या काळात आयसीसीनं लॉस एंजेलिस ऑलिंपिकच्या आयोजकांसोबत काम केलं होतं. साहजिकच आयओसीच्या निर्णयावर आयसीसीनं आनंद व्यक्त केला आहे.
 
जगात क्रिकेटचा प्रसार वाढण्यासाठी आणि नव्या पिढ्यांना क्रिकेटचे दरवाजे उघडण्यासाठी यामुळे मदत होईल असं आयसीसीनं म्हटलं आहे.
 
“आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप सुरू असताना, मुंबईतल्या बैठकीत आटओसीनं आमच्या निवडीवर शिक्कामोर्तब केलं हे म्हणजे सोन्याहून पिवळ्यासारखं आहे. ही इनिंग आत्ता कुठे सुरू झाली आहे आणि हा शानदार प्रवास कुठे घेऊन जातो हे पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत,” अशी प्रतिक्रिया आयसीसी चेअरमन ग्रेग बार्कले यांनी दिली आहे.
 
जगभरातल्या आजी-माजी क्रिकेटर्सनीही या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे.
 
भारताची माजी कर्णधार मिताली राज सांगते, “खेळाडूंना आता ऑलिंपिक सुवर्णपदकासाठी खेळण्याची संधी मिळेल आणि या खास क्रीडास्पर्धेचा एक भाग बनता येईल. जगभरातल्या आणखी काही क्रीडाप्रेमींना आमच्या या शानदार खेळाचा आनंद लुटण्याची ही एक संधी असेल.”
 
ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा इतिहास
खरंतर 1896 सालीच क्रिकेटचा ऑलिंपिकमध्ये समावेश होणार होता, पण खेळायला संघच नसल्यानं ती क्रिकेट स्पर्धा रद्द झाली.
 
चार वर्षांनी 1900 साली फ्रान्समध्ये झालेल्या ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाला. सुरुवातीला त्यात चार संघ सहभागी झाले होते – नेदरलँड्‌स, बेल्जियम, ग्रेट ब्रिटन आणि फ्रन्स.
 
पण ऐन वेळी नेदरलँड्स आणि बेल्जियमनं माघार घेतली, म्हणून ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्समध्ये केवळ एकच सामना खेळवला गेला. तो जिंकून ब्रिटननं सुवर्णपदक मिळवलं तर फ्रान्सला रौप्य मिळालं. विजेत्यांना आयफल टॉवरची प्रतिकृती देण्यात आली.
 
विशेष म्हणजे ब्रिटनचा संघ त्यांचा राष्ट्रीय संघ नव्हता, तर एका क्लबचा संघ होता आणि फ्रान्सच्या संघात त्या देशातले ब्रिटिश अधिकारी सहभागी झाले होते.
 
आणखी एक मजेची गोष्ट म्हणजे दोन्ही संघांना आपण ऑलिंपिकमध्ये खेळतोय हे माहिती नव्हतं. त्याच वर्षी फ्रान्समध्ये भरलेल्या वर्ल्ड फेअरच्या निमित्तानं हा सामना होतोय असं त्यांना वाटलं.
 
तब्बल बारा वर्षांनी या मॅचचा ऑलिंपिकच्या अधिकृत रेकॉर्ड्समध्ये समावेश करण्यात आला.
 
1904 चं ऑलिंपिक अमेरिकेतल्या सेंट लुईसमध्ये भरलं, पण क्रिकेटविषयी कुणाला फारसा रस नसल्यानं या खेळाचा ऑलिंपिकमध्ये समावेश झाला नाही.
 
आता सव्वाशे वर्षांनंतर अमेरिकेनंच क्रिकेटसाठी ऑलिंपिकचे दरवाजे उघडले आहेत. पण आयसीसी चेअरमन ग्रेग बार्कले म्हणतात, तसं ही क्रिकेटच्या ऑलिंपिक इनिंगची केवळ सुरुवातच आहे.
 
पुढची आव्हानं
LA28 मध्ये क्रिकेटच्या समावेशाच्या प्रस्तावावर मुंबईत चर्चा सुरू होती, तेव्हा एक मुद्दा मांडण्यात आला.
 
सध्या आयओसीच्या सदस्य देशांपैकी केवळ 50 % देशच क्रिकेट खेळतात मग या खेळाला ऑलिंपिकमध्ये स्थान का द्यावं?
 
पण ऑलिंपिकमध्ये समावेश झाल्यानं उलट या देशांमध्ये खेळाच्या प्रसाराची संधी मिळेल असं आयओसीच्या इतर काही सदस्यांना वाटतं. बरेच प्रयत्न करावे लागतील आणि त्यावर काम केलं जाईल असं आयोजकांनीही स्पष्ट केलं आहे.
 
त्यासाठी आयसीसी आणि विशेषतः बीसीसीआय, इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया या जगातल्या ताकदवान क्रिकेट बोर्डांनाही प्रयत्न करावे लागतील.
 
लॉस एंजेलिसनंतर पुढचं ऑलिंपिक 2036 साली ऑस्ट्रेलियात ब्रिस्बनमध्ये होणार आहे आणि तिथेही क्रिकेटचा समावेश कायम राहील अशी अपेक्षा केली जाते आहे.