शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

सामाजिक शैक्षणिक क्रांतीचे शिल्पकार ज्योतिबा फुले

विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।। नीतीविना गती गेली।।
गतिविना वित्त गेले। वित्ताविना क्षुद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।
 
वरील शब्दातून शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्‍ा सत्यशोधक महामानवाची म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले यांची आज जयंती संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतात साजरी केली जात आहे. 11 एप्रिल 1827 मध्ये ज्योतिरावांचा जन्म पुणे येथे झाला. मूळचे सातारा जिल्ह्यातील कटगुण गावचे रहिवासी असलेले ज्योतिरावांचे आजोबा सीताबा पुणे येथे कायमस्वरूपी स्थायिक झाले. वडील गोविंदराव पुणे येथेच भाजीपाल्याच्या व्यवसायावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते.
ज्योतिरावांच्या आईचे निधन झाले तेव्हा ते जेमतेम फक्त एक वर्षाचे होते. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर ज्योतिरावांनी शाळा सोडून शेती व भाजीपाला व्यवसायामध्ये मदत करण्याचे ठरविले. वयाच्या 13 व्या वर्षी त्यांचे लग्न सावित्रीबाईंशी झाले. ज्योतिरावांच्या हुशारीने व बुद्धिमत्तेने भारावून गेलेल्या शेजारील ब्राह्मण व ख्रिश्चन कुटुंबातील सदस्यांनी ज्योतिरावांच्या वडिलांना सांगून ज्योतिरावांना हायस्कुलमध्ये शिक्षणासाठी पाठविण्यास सांगितले. स्कॉटिश मिशन हायस्कूल पुणे येथे त्यांना प्रवेश मिळाला. 1847 नंतर सेकंडरी स्कूलमधील शिक्षण संपले व त्यांनी सरकारी नोकरी करावयाची नाही असे ठरविले.
 
ज्योतिराव एकदा आपल्या ब्राह्मण मित्राच्या लग्न सोहळ्यासाठी गेले असता त्यांचा तेथे खालच्या जातीचा म्हणून वधू-वर पक्षांनी अपमान केला. त्यांना तो सहन झाला नाही. ते थेट घरी येऊन रडू लागले. या अपमानामुळे त्यांच्या मनावर खूप आघात झाला. या अत्याचारावर आवाज उठवायचा असे त्यांनी ठरविले. नंतर त्यांनी पत्नी सावित्रीबाई फुले यांना घरी शिक्षण दिले. 1848 मध्ये पुणे येथे सावित्रीबाईच्या मदतीने पहिली शाळा स्थापन केली. गरीब, मागासवर्गी मुलींसाठी काढलेल्या या शाळेत कोणीही शिक्षक शिकविण्यास तार नव्हता. अशा या परिस्थितीत सावित्रीबाईंनी मुलींना शिकविण्याचा धस घेतला. या वेळी त्यांना खूप त्रास व कष्ट सहन करावे लागले.
 
सावित्रीबाई रस्त्याने चालताना त्यांना दगड, चपला व चिखल यांचा मारा होत असे. परंतु त्यांनी ह्या अपकृत्यांना न डगमगता आपले मुलींच्या शिक्षणाचे कार्य सुरूच ठेवले. दरम्यान समाजातील उच्चभ्रू व श्रीमंत लोकांनी ज्योतिबांच्या वडिलांना धमक्या देऊन मुलींची शाळा बंद करा असे सांगितले. काही काळासाठी आर्थिक व पैशाच्या चणचणीमुळे शाळा बंद ठेवावी लागली. नंतर त्यांचे ब्राह्मण मित्र गोविंद व वालवेकर यांच्या मदतीने शाळा पुन्हा सुरू केली. त्या पहिल्या दिवशी शाळेत फक्त आठ मुलींनी प्रवेश घेतला. हळूहळू शाळेतील मुलींची संख्या वाढू लागली व सावित्रीबाईंचा शिकविण्याचा उत्साह वाढला. 1868 मध्ये ज्योतिरावांनी आपल्या घराशेजारील पणाच्या आड मागासवर्गी लोकांसाठी खुला केला. ब्राह्मण समाजातील विधवा, गरोदर स्त्रियांना हीन वागणूक दिली जात असे. अशा स्त्रियांसाठी एक संस्था स्थापन करून विधवा, गरोदर स्त्रिया व त्यांच्या मुलांना संरक्षण देण्याचे कार्य या संस्थेमार्फत पार पाडले. 1873 मध्ये त्यांनी एका विधवेच्या मुलाला दत्तक घेतले. 24 सप्टेंबर 1873 मध्ये ‘सत्यशोधक समाजाची’ स्थापना करून समाजातील लाचार, गरीब, मागासवर्गी, विधवा यासारख्या लोकांचे इंग्रजांपासून व ब्राह्मण समाजापासून होणार्‍या त्रासाला आळा बसविण्याचे कार्य पार पाडले. 1876 मध्ये सत्यशोधक संस्थेचे सभासदत्व खुले करून दिले व जवळ जवळ 316 सभासद झाले. दरम्यान पुणे मुनिसिपल कार्पोरेशनवर ते सभासद म्हणून निवडून आले. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात स्वत: राहून त्यांची समाजातील उच्चभ्रू लोकांकडून होणारी पिळवणूक थांबविण्याचे कार्य केले. त्यांच्या समस्या, त्यांचे कष्ट जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. गुलामगिरी, शेतकर्‍यांचा असूड, इशारा, सार्वजनिक सत्य धर्म, दीनबंधू इ. पुस्तके प्रकाशित करून सामाजिक, धार्मिक, आर्थिक, गुलामगिरीतून कसे बाहेर पडायचे याविषयीचे ज्ञान समाजाच तळागाळात पोहचविण्याचे महान कार्य महात्मा फुले यांनी केले. अशा या महामानवास शासनातर्फे मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार दिला तर त्यांनी ती श्रद्धांजली ठरेल. त्यांच्या या जयंतीनिमित्त त्यांना शतश: प्रणाम!
- जगन्नाथ बोराटे