मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शनिवार, 30 सप्टेंबर 2023 (11:45 IST)

बाळासाहेब ठाकरे यांचा दसरा मेळावा अशी होती परंपरा वाचा सविस्तर

Bal Thackeray
बाळासाहेब ठाकरे यांनी 56 वर्षांपूर्वी 30 ऑक्टोबर 1966 रोजी शिवाजी पार्कच्या मैदानात पहिला दसरा मेळावा घेतला. शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर चार महिन्यांनी हा मेळावा झाला. विशेष म्हणजे 1966 साली दसरा हा 23 ऑक्टोबरला होता. मात्र, काही कारणास्तव शिवसेनेला त्यादिवशी दसरा मेळावा आयोजित करता आला नाही.

त्यामुळे शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा हा दसऱ्याच्या दिवशी नव्हे तर सात दिवसांनी म्हणजे 30 ऑक्टोबरला पार पडला. त्याकाळी मराठी वर्गात प्रचंड लोकप्रिय असलेल्या 'मार्मिक' या नियतकालिकामधून शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्याची जाहिरात करण्यात आली होती. मार्मिकमधून मराठी नागरिकांना 30 ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्कवर जमण्याचे आवाहन करण्यात आले होते.
 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या या पहिल्या दसरा मेळाव्याला साधा पँट-शर्ट परिधान करुन आले होते. यावेळी त्यांच्यासोबत सुभाष देसाई यांच्यासह शिवसेनेचे काही मोजके नेते उपस्थित होते. अनेक नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना शिवाजी पार्कात सभा घेण्याऐवजी एखाद्या बंदिस्त सभागृहात सभा घ्यावी, असे सुचविले होते. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घ्यायचे ठरवले.  त्यावेळी शिवाजी पार्क मैदानाचा परिसर आतासारखाच रहिवाशी भाग होता.

मैदानाच्या भोवतालच्या या भागात दोन-तीन मजल्याच्या लहान इमारती होत्या. तसेच मैदानाच्या सभोवताली रांगेने नारळाची झाडे होती. दसरा मेळाव्याच्यानिमित्ताने एरवी शांत असणाऱ्या शिवाजी पार्कच्या मैदानावर प्रचंड मोठी गर्दी जमली होती. बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणावेळी 'सायलेन्स झोन' असलेल्या शिवाजी पार्कात टाळ्यांचा कानठळ्या बसवणारा आवाज दुमदुमत होता. यावेळी श्रोत्यांच्या गर्दीत महिलांची संख्याही लक्षणीय होती, अशी आठवण शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी सांगितली.
 
त्यावेळच्या दसरा मेळाव्याचा स्वरुप आतासारखे नव्हते. शिवसेनेच्या जन्मानंतर पक्ष विस्ताराच्यादृष्टीने घेतल्या जाणाऱ्या बैठकांचा तो एक भाग होता. या पहिल्यावहिल्या दसरा मेळाव्यापूर्वी मुंबईत अनेक ठिकाणी बैठक घेतल्या होत्या. यादरम्याना बाळासाहेबांनी अनेक चाळी आणि व्यायामशाळांना भेटी दिल्या.

चाळीतील अगदी लहान खोल्यांमध्येही बाळासाहेब ठाकरे बैठका घेत असत. फक्त 10 ते 20 लोक असले तरी बाळासाहेब त्यांच्यासमोर बोलायचे. या जनसंपर्कामुळेच त्यावेळी दादरची हिंदमाता आणि परळ येथील भारतमाता व्यायामशाळेतील तरुणांनी शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी स्वत: ला झोकून दिले होते.

शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्याला कोणतीही पोलीस सुरक्षा पुरवण्यात आली नव्हती. त्यावेळी गिरगाव व्यायामशाळेतील तरुणांनी या मेळाव्याला सुरक्षाव्यवस्था पुरवली होती. वेगवेगळ्या ठिकाणच्या याच व्यायामशाळा पुढे जाऊन शिवसेनेच्या शाखांच्या निर्मितीचे कारण ठरल्या, असे सुभाष देसाई यांनी सांगितले.
 
 
स्टीलच्या डब्ब्यातून जमवले होते पैसे
शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यावेळी गर्दीत एक स्टीलचा डब्बा फिरवण्यात आला होता. त्यावेळी दसरा मेळाव्याला आलेल्या लोकांनी या डब्ब्यात आपापल्या परीने शिवसेनेसाठी वर्गणी दिली होती. याच दसरा मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळही उपस्थित होते. छगन भुजबळ त्यावेळी व्हीजेटीआय महाविद्यालयात शिकत होते. जेव्हा छगन भुजबळांना दसरा मेळाव्याची माहिती मिळाली तेव्हाच त्यांनी शिवाजी पार्कला जायचे ठरवले. मी शिवाजी पार्कात गेलो तेव्हा त्याठिकाणी प्रचंड गर्दी होती. एवढा मोठा जनसमुदाय मी यापूर्वी कधीही पाहिला नव्हता, अशी आठवण छगन भुजबळ यांनी सांगितली.
 
शिवसेना राजकारणापासून दूर राहणार
प्रबोधनकार ठाकरे, श्रीकांत ठाकरे, रामराव आदिक अशा अनेक ज्येष्ठ मंडळींच्या उपस्थितीत पहिल्या मेळाव्यात बाळासाहेब सभेपुढे बोलायला उभे राहिले.
या व्यासपीठावर प्रबोधनकार ठाकरे, श्रीकांत ठाकरे यांच्यासोबत रामराव आदिक, बळवंत मंत्री आणि प्रा. स. अ. रानडे हे देखील उपस्थित होते.
‘महाराष्ट्राला आज खरी गरज महाराष्ट्रवादाची आहे’, असं म्हटलं आणि त्याक्षणी बाळासाहेबांनी सभा जिंकली. बाळासाहेबांच्या या वाक्यानंतर प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला.
 
आज महाराष्ट्राला राजकारणापेक्षा समाजकारणाची गरज आहे. त्यामुळे शिवसेना राजकारणापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राजकारण हे ‘गजकरणासारखं’ आहे. असं म्हणत बाळासाहेबांनी आपल्या शिवसेनेचे धोरण स्पष्ट केले होते.
 
मात्र असं म्हटल्याचा एक फायदा असा झाला की राजकारणापासून दूर राहू इच्छिणाऱ्या मात्र सामाजिक क्षेत्रात धडपडणाऱ्या अनेकांनी समाजसेवेसाठी शिवसेनेचा पर्याय निवडल्याचं जाहीर केल्यानंतर बाळासाहेबांची दूरदृष्टी लक्षात आली.

मराठी माणसासाठी पहिला मेळावा ठरला खास
शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा आजही मराठी माणसं लक्षात ठेवतात यामागे अनेक कारणं आहेत. या पहिल्या मेळाव्यात मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढणा-या शिवसेनेने आपली भुमिका अधिक स्पष्ट केली होती.
 
महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाच्या वसाहतीत मराठी माणसाला 80 टक्के जागा मिळाल्या पाहिजेत आणि मराठी लिहिता-वाचता किंवा चांगले मराठी बोलता येते अशा व्यक्तीलाच राज्य सरकारने सरकारी नोकऱ्या द्याव्यात अशी बाळासाहेबांनी मागणी केली आणि महाराष्ट्राच्या कानाकोप-यात, घराघरात शिवसेनेचे कार्यकर्ते घडू लागले.
 
त्यानंतरही बाळासाहेबांनी मराठी माणसांच्या नोकऱ्यांसाठी पाठपुरावा सुरुच ठेवला.अशारितीने शिवसेनेचा पहिला मेळावा, ज्याला गर्दी होईल का? हा प्रयत्न यशस्वी होईल का? अशी शंका बाळासाहेबांना वाटत होती, त्या मेळाव्याने राजकीय इतिहासात एक नवी परंपरा सुरु केली.बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे यांनी दरवर्षी दसरा मेळाव्याची परंपरा जपली.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor