विचित्र प्रथा-हुंडय़ात दिली जाते बीअर
आपल्या देशात विविध परंपरा आहेत. त्यातही लग्नाच्या परंपरांमध्ये विशेष प्रकार आढळून येतात. या परंपरा भौगोलिक परिसर आणि विविध धार्मिक पद्धती यांच्यातील भेदावर अवलंबून आहेत. छत्तीसगढमधील बस्तर याठिकाणी लग्नसमारंभाशी संबंधित अशीच एक विचित्र परंपरा आहे. या भागात वधू आपल्या सासरी जाताना हुंडा म्हणून सोबत पिण्याची बीअर घेऊन जाते.
ही बीअर बाजारातून विकत आणत नसून ती सल्फी नावाच्या झाडापासून बनविली जाते. हे पेय आरोग्यवर्धक असून हे पिल्याने नशा चढते. म्हणून यास देशी बीअर म्हटले जाते. हे सल्फी नावाचे झाड 9 ते 10 वर्षानंतर रस देण्यास सुरूवात करते. त्याची उंची 40 फूट इतकी आहे.
काही काळापासून ऑक्सीफोरम फिजिरीयम नावाच्या बुरशीने या झाडांना ग्रासले आहे. त्यामुळे त्यांची संख्या कमी होत आहे. परिणामी त्यांचे महत्त्व वाढल्याने आपल्या मुलीला ते हुंडय़ात देण्याची परंपरा रूढ झाली. बस्तर भागात या झाडांना सोन्या-चांदी इतके महत्त्व आहे.