मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: गुरूवार, 23 मार्च 2023 (15:56 IST)

कँपा कोला : इतिहासाच्या फ्रिजरमधून अनेक दशकांनंतर पुनरागमन, अशी आहे जुनी कहाणी

campa cola
राजधानी दिल्लीच्या कनॉट प्लेसच्या शंकर मार्केटकडून तुम्ही जेव्हा फायर ब्रिगेड लेनकडे पुढं जाता तेव्हा रस्त्याच्या डाव्या बाजूला एक मोडकळीस आलेली इमारत (कारखाना) पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. या इमारतींच्या भिंतीवर आजही कँपा कोला लिहिलेलं आहे.
 
रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड (आरआयएल) चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी देशाच्या सॉफ्ट ड्रिंकच्या (शीत पेय) बाजारपेठेत हात आजमावण्यासाठी कंबर कसलीये. दुसरीकडे, त्याचवेळी या इमारतीचा परिसर मात्र आजही तसाच सामसूम आहे.
 
एके काळी इथं कायम कँपा कोलाच्या बाटल्यांचा पुरवठा करण्यासाठी गाड्यांच्या रांगा लागलेल्या असायच्या.
 
या इमारतीच्या मेन गेटबाहेर लक्झरी कारची गर्दी झालेली पाहायला मिळायची. या गाड्यांचे ड्रायव्हर त्या स्वच्छ करत असल्याचं अनेकदा दिसायचं.
 
तर, मुकेश अंबानी त्यांच्या रिलायन्स रिटेल कंपनीच्या माध्यमातून शीत पेयांच्या मार्केटमध्ये प्रवेश करत आहेत.
 
काही काळापूर्वी रिलायन्स रिटेलनं 1970 आणि 1980 च्या दशकातील सर्वात चर्चित सॉफ्ट ड्रिंक ब्रँड कँपा कोला टेकओव्हर केल्याची बातमी आली होती.
 
त्यानंतर कॅनॉट प्लेसमधील या कँपा कोलाच्या कारखान्यात पुन्हा जीवंतपणा येईल, असं वाटलं होतं.
 
या जुन्या कारखान्यात एकेकाळी आधी कोका कोला आणि नंतर कँपा कोलाचं उत्पादन होत होतं. उत्पादनाची प्रक्रिया अगदी बाहेरूनही पाहता येत होती. कारण, कारखान्याला लावलेल्या काचांतून मागे बाटल्यांमध्ये सॉफ्ट ड्रिंक मशीनद्वारे एका कनव्हेयर बेल्टवर भरलं जात असल्याचं स्पष्ट दिसायचं.
 
दिल्लीतील चार्टर्ड अकाऊंटंट राजन धवन यांनी त्या काळच्या काही आठवणींना उजाळा दिला.
 
"मी मथुरा रोडवर असलेल्या दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये शिकत असताना आम्ही शाळेकडून अनेक वेळा कोका कोलाचा हा कारखाना पाहण्यासाठी आलो होतो. त्यावेळी कंपनी व्यवस्थापन मुलांना भेटवस्तूही द्यायचं. नंतर सीए बनल्यानंतर मी 1980 च्या दशकाच्या अखेरीस इथं परत आलो होतो. त्यावेळी हा कारखाना बंद होऊ लागला होता. पाहता-पाहता एक चांगला कारखाना बंद झाला. कधी-कधी मनात विचार येतो की, याठिकाणी तेव्हा काम करणारे नंतर कुठे गेले असतील."
 
आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. काही दिवसांतच पारा वर चढायला सुरुवात होईल. अगदी त्याचवेळी रिलायन्सचा कँपा लेमन आणि कँपा ऑरेंज बाजारात पेप्सिको आणि कोका-कोलाला टक्कर देण्यासाठी दाखल होईल.
 
रिलायन्सनं गेल्यावर्षी प्योर ड्रिंक्स कंपनीकडून कँपा कोला ब्रँडची 22 कोटींमध्ये खरेदी केली होती.
 
दरम्यान, रिलायन्सनं हे शीत पेय सर्वात आधी आंध्र प्रदेश आणि तलंगणामध्ये लाँच करणार असल्याची माहिती दिलीय. त्यानंतर ते याचं देशभरात लाँचिंग करणार आहेत. सध्या उतारवयात असलेल्या तेव्हाच्या भारतीयांच्या मनात अजूनही कँपा कोलाच्या स्वादाच्या आठवणी कायम असल्याचं रिलायन्सचं म्हणणं अगदी योग्य आहे. कारण त्यांच्या बालपणी ते हे शीत पेय मोठ्या प्रमाणात प्यायले आहेत. पण तसं असलं तरी, रिलायन्स सर्व वयोगटातील ग्राहकांवर लक्ष्य केंद्रीत करणार आहे.
 
रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स हे शीतपेय लाँच करत आहे. सध्याच्या सॉफ्ट ड्रिंकच्या मार्केटमध्ये पेप्सी आणि कोकचं मोठ्या प्रमाणावर वर्चस्व आहे. कोका कोलाचा 51 टक्के बाजारपेठेवर तर पेप्सिकोचा 34 टक्के बाजारपेठेवर ताबा आहे.
 
यावरूनच बाजाराची दिशा नेमकी कोणत्या बाजुला आहे, हे तुमच्या लक्षात येईल. त्याशिवाय अनेक स्थानिक शीतपेयदेखील बाजारात उपलब्ध आहेत. सॉफ्ट ड्रिंकच्या या संपूर्ण खेळामध्ये जाहिरातीला प्रचंड महत्त्वं आहे. पेप्सिको आणि कोका कोला दरवर्षी जाहिरातींवर शेकडो कोटींचा खर्च करतं. त्यामुळं रिलायन्सला जर या सॉफ्ट ड्रिंक्सच्या बाजारात त्यांचं स्थान निर्माण करायचं असेल तर त्यांनाही प्रचंड जाहिराती कराव्या लागतील, हे स्पष्टच आहे.
 
ज्या काळात कँपा कोलाचा बोलबाला होता, तेव्हा सलमान खान याचा ब्रँड अॅम्बेसेडर असायचा. आता रिलायन्स यासाठी कोणत्या सेलिब्रिटी ला ब्रँड अॅम्बेसेडर बनवणार हे पाहावं लागणारेय.
 
आयपी युनिव्हर्सिटीतील बिझनेस अँड मार्केटिंगचे प्राध्यापक डॉ. सुधीर बिष्ट यांच्या मते, "रिलायन्समध्ये पेप्सिको आणि कोका कोलाला आव्हान देण्याची क्षमता आहे असं मला वाटतं. पण मोठ्या प्रमाणावर जाहिराती केल्याशिवाय ते शक्य होणार नाही. नवा ब्रँड लाँच करण्यासाठी तर जाहिरातींचा अक्षरशः मारा करावा लागेल."
 
भारतातील सॉफ्ट ड्रिंक्सचं मार्केट दरवर्षी हजारो कोटी रुपयांचं आहे. त्यामुळं रिलायन्स त्यांची नवी उत्पादनं बाजारात उतरवण्यात काहीही कसर सोडणार नाही, असंही बिष्ट म्हणाले.
 
कँपा कोलाच्या बाजारात होत असलेल्या नव्या रुपाचं ग्राहकांकडून स्वागत केलं जाईल, असं रिलायन्सला वाटत आहे. लोक याला पसंती दर्शवतील असं त्यांचं मत आहे. रिलायन्सनं त्यांच्या या नव्यानं लाँच होणाऱ्या उत्पादनांचं स्लोगन "द ग्रेट इंडियन टेस्ट" असं ठेवलंय.
 
दिल्लीतील प्रसिद्ध वॉटर पार्क फन अँड फूड व्हिलेजचे अध्यक्ष संतोख चावला यांच्या मते, "मला मिळत असलेल्या माहितीनुसार रिलायन्स कँपाचे दरही फार ठेवत नाहीये. मला वाटतं की, कमी किमतीमुळंदेखील त्यांना बाजारामध्ये स्थान निर्माण करण्याची संधी मिळू शकते."
 
दिल्ली निवडणूक आणि ली मॅरेडियनशी नातं
कँपा कोलाच्या नव्यानं लाँच होण्याबाबत चर्चा करताना, संतोख चावला काहीसे भावूक झाले. ते सांगू लागले की, त्यांच्या कुटुंबाचे सरदार मोहन सिंग आणि त्यांचा मुलगा चरणजित सिंग यांच्याशी कौटुंबीक संबंध होते. याच सरदार मोहन सिंग यांच्या नावावर दिल्लीतील एक प्रसिद्ध इमारत आहे. ती इमारत जिन्सची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. ती म्हणजे मोहन सिंग प्लेस.
 
सरदार मोहन सिंग यांच्या मृत्यूनंतर चरणजित सिंग यांनी कँपा कोला आणि त्यांचे इतर व्यवसाय यशोशिखरावर पोहोचवले होते. चरणजित सिंग यांचे वडील सरदार मोहन सिंग हे भारतात कोका कोलाचा व्यवसाय सुरू करणाऱ्यांपैकी एक होते.
 
ते नवी दिल्ली नगर परिषद (एनडीएमसी) चे उपाध्यक्षही राहिले होते. जनपथमध्ये तिबेट मार्केट आणि डिफेन्स कॉलनी उभी करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
 
चरणजित सिंग यांना काँग्रेसनं 1980 च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण दिल्लीतून तिकिट दिलं होतं. त्यांच्यासमोर जनता पार्टीचे नेते विजय कुमार मल्होत्रा होते. चरणजित सिंग त्यांच्या प्रचारात प्रचंड पैसा खर्च करत होते.
 
त्या काळात निवडणूक आयोगाचा वचक नव्हता. उमेदवारांच्या खर्चावर आजच्या सारखी नजर ठेवली जात नव्हती. त्यांच्यासाठी तर शंकर मार्केटचे दुकानदारही प्रचार करत होते. निवडणुकीत चरणजित सिंग यांनी विजय कुमार मल्होत्रा यांचा पराभव केला. त्यामुळं दिल्लीतून पहिल्यांदाच शीख व्यक्ती खासदार म्हणून संसदेत गेली होती.
 
त्यांनी विजय कुमार मल्होत्रा यांचा जवळपास एक लाख मतांनी पराभव केला. महत्त्वाची बाब म्हणजे त्याच लोकसभा निवडणुकीत नवी दिल्ली मतदारसंघातून अटल बिहारी वाजपेयी विजयी झाले होते. इतर सर्व सहा जागांवर काँग्रेसचाच विजय झाला होता. चरणजित सिंग यांनी तेव्हा एक विक्रम केला होता.
 
त्यांच्यापूर्वी दिल्लीतून एकही शीख लोकसभा खासदार बनलेला नव्हता. त्याच चरणजित सिंग यांनी 1982 च्या आशियाई स्पर्धांच्या काळात ली-मेरिडियन हॉटेल सुरू केलं होतं. ते तेव्हाच्या दिल्लीतील सर्वात लक्झरी हॉटलपैकी एक होतं, असं मानलं जातं.
 
कोका कोला बंद, डबल सेव्हनची एंट्री
प्योर ड्रिंक्स ग्रुपनं 1975 मध्ये आणीबाणी लागल्यानंतर देशात कँपा कोला लाँच केलं होतं.
 
खरं म्हणजे, आणीबाणीनंतरच्या लोकसभा निवडणुका झाल्या तेव्हा त्यात जनता पार्टीचा विजय झाला. त्यात उद्योग मंत्री होते जॉर्ज फर्नांडीस. त्यांनी कोका कोलाचं भारतातील उत्पादन बंद केलं होतं.
 
सरदार मोहन सिंग यांची कंपनी प्योर ड्रिंक्स कोका कोलाच्या उत्पादनातून प्रचंड कमाई करत होती. त्यावेळपर्यंत भारतात पेप्सीचा प्रवेश झालेला नव्हता.
 
जनता पार्टी सरकारच्या निर्णयानंतर प्योर ड्रिंक्सनं लगेचच कँपा कोला लाँच केलं. कोका कोलाला देशातून बाहेरचा मार्ग दाखवण्यात आल्यानंतर सरकारनं डबल सेव्हन हे शीतपेय लाँच केलं. त्याचं नाव डबल सेव्हन ठेवण्यामागंही एक कारण होतं. ते म्हणजे, 1977 च्या निवडणुकीत विजयानंतरच काँग्रेस विरोधी सरकार सत्तेत आलं होतं.
 
डबल सेव्हनचा फॉर्म्युला सेंट्रल फूड टेक्नॉलॉजी रिसर्च इन्स्टिट्यूट, म्हैसूरनं विकसित केला होता. पण त्याला ग्राहकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
 
त्याच दरम्यान, आर्थिक उदारीकरणानंतर कोका कोलाचं 1991 नंतर भारतात पुनरागमन झालं. विशेष म्हणजे प्योर ड्रिंक्सनंच कोका कोलाला 1949 मध्ये भारतात आणलं होतं. त्यांना अमेरिकन कंपनीनं भारतात कोका कोलाच्या उत्पादनासाठी आणि विक्रीसाठी परवाना दिला होता.
 
पण कोका कोलाचं उत्पादन बंद झाल्यानंतर प्योर ड्रिंक्सनं कँपा कोला लाँच केलं आणि सुमारे 10-15 वर्षे बाजारपेठेवर त्यांचा ताबा होता, हे स्पष्टच आहे. पण पेप्सीनं भारतीय बाजारात प्रवेश केल्यानंतर प्योर ड्रिंक्सनं जणू गुडघेच टेकले होते. तोपर्यंत चरणजित सिंग यांचं निधनही झालं होतं. त्यामुळं नंतर कंपनीनं त्यांचा व्यवसाय ली मेरिडियन हॉटेलपर्यंतच मर्यादीत ठेवला.
Published By -Smita Joshi