1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: गुरूवार, 14 मे 2020 (09:25 IST)

स्वराज्य रक्षक छत्रपती श्री संभाजी महाराज

Chhatrapati sambhaji maharaj jayanti
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या प्रथम पत्नी सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजीराजे भोसले यांची आज जयंती आहे.
 
त्यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ला, पुणे येथे झाला. रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजीराजांच्या आई, सईबाईंचे निधन राजे लहान असताना झाले. त्यांची आजी जिजाबाई यांनी त्यांचा सांभाळ केला. 
 
अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. तसेच ते अनेक भाषेत विद्याविशारद व अत्यंत धुरंधर राजकारणी होते. 16 जानेवारी 1681 रोजी संभाजीराजांना राज्याभिषेक झाला. ते राजकारण आणि रणांगण यात तरबेज झाले होते. ते प्रजाहित दक्ष होते. येसूबाई या त्यांच्या पत्नी होत्या. त्यांनी नऊ वर्षे उत्तम राज्यकारभार केला. 
 
औरंगजेबाने 1682 मध्ये स्वराज्यावर हल्ला केला. संभाजीराजांच्या नेतृत्त्वाखाली मराठयांनी हिमतीने लढा दिला. 1687-88 मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला.त्यामुळे परिस्थिती कठीण झाली. त्यातच संभाजीराजांच्या पाठीत खंजीर खुपसायला अनेक फितुर सदैव तत्पर होते. 
 
1 फेब्रुवारी 1689 रोजी औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने संगमेश्र्वर येथे संभाजीराजांना पकडले. 11 मार्च 1689 रोजी तुळापूर येथे त्यांनी हौतात्म्य पत्करले.