शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: गुरूवार, 14 ऑक्टोबर 2021 (12:18 IST)

सावरकरांना 'माफीचा' सल्ला महात्मा गांधीनी खरंच दिला होता का? फॅक्ट चेक

राघवेंद्र राव,
विनायक दामोदर सावरकर यांनी अंदमानच्या सेल्यूलर जेलमध्ये शिक्षा भोगत असताना इंग्रज सरकारसमोर दया याचिका दाखल केली होती. ही याचिका महात्मा गांधी यांच्या सल्ल्यानुसार लिहिली आणि पाठवली गेली होती का?
 
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या म्हणण्यानुसार तर हेच खरं आहे. सिंह यांनी हा दावा 12 ऑक्टोबर रोजी केला होता. सावरकरांवर लिहिलेल्या एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.
 
राजनाथ सिंह यांनी 'वीर सावरकर : द मॅन व्हू कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टिशन' या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात सहभागी झाले होते.
 
यावेळी ते म्हणाले, "सावरकर यांच्याविरुद्ध खोटं पसरवण्यात आलं होतं. त्यांनी इंग्रज सरकारसमोर वारंवार दया याचिका दाखल केली होती. पण ही दया याचिका त्यांनी स्वतःला माफ करून घेण्यासाठी दिली नव्हती. तर महात्मा गांधींनीच त्यांना दया याचिका दाखल करण्यास सांगितलं होतं. गांधींच्या सल्ल्यानुसार त्यांनी ही याचिका दाखल केली होती."
 
राजनाथ सिंह यांच्या वरील वक्तव्यानंतर देशात वाद निर्माण झाल्याचं दिसत आहे.
 
विरोधी पक्ष या निमित्ताने सरकारवर निशाणा साधत असून इतिहासकारही या वक्तव्याच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याचं दिसून येतं.
 
नव्या पुस्तकात तसा उल्लेख नाही
'वीर सावरकर : द मॅन हू कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टिशन' हे पुस्तक उदय माहूरकर आणि चिरायू पंडीत यांनी लिहिलं आहे.
उदय माहूरकर हे पत्रकार म्हणून कार्यरत होते. सध्या ते भारत सरकारमध्ये माहिती आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.
 
बीबीसीने याविषयी त्यांच्याशी चर्चा केली. महात्मा गांधींच्या सल्ल्यानुसार स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दया याचिका दाखल केली होती का, या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले, "नाही. माझ्या पुस्तकात तसा उल्लेख नाही."
भविष्यात काढण्यात येणाऱ्या आवृत्तींमध्ये ही बाब समाविष्ट केली जाईल का, असा प्रश्नही आम्ही त्यांना विचारला.
 
ते म्हणाले, "याबाबत ठरवलं जाईल. तुम्ही मला अडकवण्याचा प्रयत्न करू नका."
 
पुस्तक लिहिताना केलेल्या संशोधनादरम्यान राजनाथ सिंह यांनी केलेला दावा समोर आला आहे का, या प्रश्नाच्या उत्तरादाखल माहूरकर म्हणाले, "मी सावरकर यांचा संपूर्ण अभ्यास केला, असं मी म्हणणार नाही. सावरकर यांच्याबद्दलची बरीचशी माहिती अजून लोकांना नाही. सावरकर यांच्यावरील माझा अभ्यास अद्याप पूर्ण झालेला नाही. भविष्यात त्यावर मी दुसरं पुस्तक लिहू शकतो. ही गोष्ट समाविष्टही करू शकतो. सावरकर यांच्याबद्दल मला सर्वच माहिती आहे, असा दावा मी आताच करणार नाही."
 
माहूरकर यांनी आपण यासंदर्भात आपल्या संशोधकांशी चर्चा करू, असं म्हणत काही वेळ मागितला.
 
काही वेळानंतर बीबीसीशी पुन्हा त्यांची चर्चा झाली.
 
यावेळी माहूरकर म्हणाले, "ही गोष्ट खरी आहे. बाबाराव सावरकर हे सावरकर यांचे भाऊ होते. ते गांधीजी यांच्याकडे गेले होते. त्यावेळी महात्मा गांधी यांनीच सावरकरांना हा सल्ला दिला होता. पुस्तकाच्या पुढच्या आवृत्तीत आम्ही हा प्रसंग समाविष्ट करू. गांधीजी यांना भेटण्यासाठी बाबाराव सावरकर यांच्यासमवेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) काही लोकही गेले होते. हीच गोष्ट बाबाराव यांच्या लिखाणातून पुढे येते.
 
सावरकर फाळणी टाळू शकले असते का?
राजनाथ सिंह यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकाचं नाव खूपच रंजक आहे.
 
'वीर सावरकर : द मॅन हू कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टिशन.'
 
पण खरं तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीच द्वीराष्ट्रवादाचा सिद्धांत सर्वात आधी मांडला होता, म्हणून त्यांना ओळखलं जातं.
 
मुस्लीम लीगने 1940च्या लाहोर अधिवेशनात मुस्लिमांसाठी वेगळ्या देशाची संकल्पना मांडली होती.
 
पण, सावरकर हे आधीपासूनच म्हणत होते. त्यांनी त्याच्या तीन वर्षांपूर्वीच अहमदाबाद येथे याविषयी वक्तव्य केलं होतं.
हिंदू आणि मुस्लीम ही दोन वेगवेगळी राष्ट्रं आहेत. दोघांचा हक्क या भूमीवर एकसारखा नाही, असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं.
 
त्याच्याही आधी त्यांनी आपल्या 'हिंदुत्व : हू इज अ हिंदू' या पुस्तकातही याविषयी स्पष्टपणे लिहिलं होतं.
 
राष्ट्राचा आधार धर्म आहे, असं म्हणत त्यांनी भारताला हिंदुस्थान म्हटलं. हिंदुस्थानचा अर्थ म्हणजे हिंदूंची भूमि असा आहे. हिंदुत्वासाठी भौगोलिक एकता खूप जास्त महत्त्वाची आहे. एक हिंदू व्यक्ति प्राथमिक स्वरुपात इथला प्रथम नागरीक आहे. किंवा तो पूर्वजांमुळे हिंदुस्तानचा नागरीक आहे.
 
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 'हिंदुत्व : हू इज अ हिंदू' या पुस्तकात लिहिलं, "आपल्या येथील मुस्लीम किंवा ख्रिश्चनांना काही प्रकरणांमध्ये जबरदस्तीने गैर हिंदू म्हणून धर्मांतरित केलं गेलं. त्यांची पितृभूमिक हीच आहे. आपल्या संस्कृतीचा मोठा भाग असाच आहे. पण तरीही त्यांना हिंदू मानता येणार नाही.
 
खरं तर हिंदुप्रमाणे हिंदुस्तान त्यांची पितृभूमिच आहे. पण ही त्यांची पुण्यभूमी नाही. त्यांची पुण्यभूमी अरब देशांत आहे. त्यांचे धर्मगुरु, विचार आणि नायक या भूमीत जन्मलेले नाहीत."
 
याप्रकारे सावरकर यांनी राष्ट्राचा नागरिक म्हणून हिंदू आणि मुस्लीम-ख्रिश्चन हे मौलिक स्वरुपात एकमेकांपासून वेगळे असल्याचं म्हटलं होतं.
 
पुण्यभूमी वेगळी असल्याने सावरकर यांनी राष्ट्राप्रति त्यांच्या निष्ठेवर संशय घेतला होता.
 
भारताच्या विभाजनात हिंदू-मुस्लीम दंगलीची मोठी भूमिका होती. भारताची फाळणी हिंदू-मुस्लीम एकतेतूनच टाळता आली असती. त्यासाठीचे प्रयत्न महात्मा गांधींकडून सुरू होते. पण त्यांना तात्विकरित्या वेगळं सिद्ध करण्यासाठी सावरकर यांनी मोठी भूमिका निभावली होती.
 
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वंशज काय म्हणतात?
रणजित सावरकर हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे लहान बंधू डॉ. नारायण सावरकर यांचे नातू आहेत. ते मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाशी संबंधित आहेत.
 
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी महात्मा गांधींच्या सांगण्यावरून दया याचिका दाखल केली, असं रणजित यांनाही वाटत नाही.
ते सांगतात, "हा जीभ घसरल्याचा प्रकार असल्याचं मला वाटतं. महात्मा गांधी यांनी आपल्या लेखांमध्ये याचिका दाखल करण्याचं समर्थन केलं होतं. त्यांनी सावरकर बंधूंच्या सुटकेसंदर्भात दोन लेख लिहिले होते. आमच्यात वैचारिक मतभेद आहेत. पण सावरकरांवर शांततापूर्ण चर्चा करण्याच्या मार्गावर येत असतील तर आम्ही त्याचं स्वागत करतो. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की सावरकर एक महान देशभक्त आहेत. आपल्या मातृभूमिवर प्रेम करण्याची किंमत त्यांनी अंदमानात राहून चुकवली आहे."
 
रणजित सावरकर यांच्या मते, वीर सावरकर यांची याचिका फक्त स्वतःसाठी नव्हे तर इतर राजकीय कैद्यांसाठीही होती.
 
त्यावेळचे गृहमंत्री रेजिनॉल्ड क्रेडॉक यांनी वीर सावरकर यांच्या याचिकेबाबत लिहिलं आहे. ही दयेसाठीची एक याचिका आहे. पण यामध्ये कोणताच खेद किंवा पश्चाताप नाही, असं त्यांनी लिहिल्याचं रणजित यांनी सांगितलं.
 
रणजित म्हणतात, "सावरकर यांनी जे केलं त्याला गांधी यांचा पाठिंबा होता. त्याला त्यांची स्वीकृती होती. राजनाथ सिंह यांच्या म्हणण्याचा अर्थही हाच होता, असं मला वाटतं."
 
इतिहासाशी छेडछाड
वादग्रस्त वक्तव्याबाबत बोलताना गांधी-शांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि गांधींचे अभ्यासक अध्येता कुमार प्रशांत म्हणतात, "असं आम्ही कधीच पाहिलं नाही किंवा ऐकलेलं नाही. याविषयी कुठेच काही लिहिलेलं नाही."
ते म्हणतात, "हे लोक इतिहासाची नवी पाने लिहिण्याच्या कलेत पारंगत आहेत. ज्यांच्याकडे आपला इतिहास नसतो, ते इतरांच्या इतिहास आपल्या मुठीत घेण्याचा प्रयत्न करतात. राजनाथ सिंह यांनी अत्यंत बिनबुडाचं वक्तव्य केलं आहे."
 
कुमार प्रशांत यांच्या मते, "गांधी यांचा सावरकरांच्या माफीनाम्याशी काहीच संबंध आलेला नाही. माफीनाम्यासारखी एखादी गोष्ट गांधीजी यांच्या जीवनात असली असती तर त्यांनीही त्यावर अंमलबजावणी केली असती. पण त्यांनी कधीच माफीनामा लिहिलेला नाही. शिवाय इतर कोणत्याही सत्याग्रहींना त्यांना हा मार्ग सुचवला नाही. त्यामुळे हा दावा खरा आणि प्रामाणिक मानला जाऊ शकत नाही."
 
गांधीहत्येचे डाग पुसण्याचे प्रयत्न
ज्येष्ठ पत्रकार निलांजन मुखोपाध्याय यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील उच्चपदस्थ व्यक्तींवर 'द आरएसएस : आयकॉन्स ऑफ द इंडियन राईट' हे पुस्तक लिहिलेलं आहे.
ते सांगतात, "सावरकर यांच्यासंदर्भातला सर्वात मोठा वाद महात्मा गांधी यांच्या हत्येशी संबंधित आहे. त्या प्रकरणातून सावरकर मुक्त झाले. पण नंतर बनवण्यात आलेल्या कपूर कमिशनच्या अहवालात त्यांना पूर्णपणे दोषमुक्त मानलं गेलं नाही. गांधी हत्याकांडात सावरकर यांचा सहभाग असल्याकडेच संशयाची सुई आहे. सावरकर यांच्यावरील हा सर्वात मोठा डाग आहे. सरकार ते पुसण्याचा प्रयत्न करत आहे,"
 
1948 साली महात्मा गांधी यांच्या हत्येच्या सहाव्या दिवशी विनायक दामोदर सावरकर यांना गांधीहत्येत सहभागी असल्याच्या आरोपावरून मुंबई येथून अटक करण्यात आली होती.
 
पुढे फेब्रुवारी 1949 ला यातून त्यांची सुटका झाली.
 
मुखोपाध्याय सांगतात, "राजनाथ सिंह यांचं वक्तव्य सावरकर यांच्यावरील गांधीहत्येचे डाग पुसण्यासाठीच आहेत. उद्या दुसरा कुणी नेता येईल आणि म्हणेल की गांधींच्याच म्हणण्यावरून गोडसेंनी बंदूक हाती घेतली होती."
 
त्यांच्या मते, आपण इतिहासाच्या मिथककरणाच्या काळात जगत आहोत. इथं रोज एक खोटं वारंवार बोलून त्याला सत्य ठरवलं जातं. इतिहासाबाबतची चर्चा उडत-उडत केली जाऊ शकत नाही. ती विस्ताराने होते.
 
हिंदुत्व शब्दाचे निर्माता
इतिहासकारांच्या मते, सावरकर यांचं राजकीय जीवन दोन विभागांत वाटलं जाऊ शकतं.
 
मुखोपाध्याय म्हणतात, "विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सावकर हे राष्ट्रवादी होते. परदेशातून परतले, आंदोलनांमध्ये सहभागी झाले. त्यामुळे काळ्यापाण्याची शिक्षा त्यांना झाली. त्यांना अंदमानच्या तुरुंगात पाठवलं गेलं.
आपल्या राजकीय जीवनाच्या या टप्प्यात सावरकर यांनी 1857 च्या उठावाबाबत एक पुस्तक लिहिलं. तो उठाव हिंदू-मुस्लीम एकतेचं अद्वितीय उदाहरण असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. हिंदू-मुस्लीम एकत्र आल्यानेच इंग्रज सरकारला धक्का बसला होता."
 
मुखोपाध्याय यांच्या मते, सावरकर यांच्या राजकीय जीवनाचा दुसरा टप्पा अंदमान तुरुंगात राहून इंग्रजांना माफी मागणं हा आहे.
 
त्यांना अंदमान तुरुंगातून सोडण्यात आलं पण नागपूर आणि पुण्याच्या तुरुंगात त्यांना ठेवलं गेलं. ते राष्ट्रवादी आंदोलनाचा भाग होते. त्यामुळे त्यांना सोडण्याची अनेक नेत्यांनी मागणी केली होती."
 
पण सावरकर यांच्याबद्दलचा मोठा वाद त्यांच्या हिंदुत्व : हू इज हिंदू या हस्तलिखितावरून असल्याचं मुखोपाध्याय यांनी सांगितलं.
 
ते सांगतात, "या दस्तऐवजातून प्रेरणा घेऊनच केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बनवला. हिंदू राष्ट्रवादी विचारधारा सावरकरांआधीच विकसित होत होती. पण सावरकरांनी त्याला छापिल स्वरुप प्राप्त करून दिलं.
 
1966 मध्ये आपल्या मृत्यूपर्यंत सावरकरांचे आरएसएससोबतचे संबंध वाईटच होते. ते आरएसएसला एक महत्त्वहीन संघटना मानत असत. तसंच द्वितीय महायुद्धादरम्यान ब्रिटिश धोरणांचे ते समर्थकही होते.
 
हिंदूंनी स्वतःला मजबूत बनवण्यासाठी ब्रिटिश फौजांमध्ये सहभागी झालं पाहिजे, असं त्यांनी म्हटलं होतं. ते आपल्या उभ्या आयुष्यात कोणत्याही इंग्रजविरोधी आंदोलनात सहभागी झाले नाहीत. तसंच भारत छोडो आंदोलनातही ते सहभागी नव्हते."
सावरकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनसंघ यांचे कधीच सदस्य नव्हते. पण संघ परिवारात त्यांचं नाव अतिशय आदराने आणि सन्मानाने घेतलं जातं, ही एक शोकांतिकाच आहे, असं मुखोपाध्याय म्हणाले.
 
2000 साली वाजपेयी सरकारने तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्याकडे सावरकर यांना भारतरत्न हा सन्मान देण्याची मागणीही केली होती. पण नारायण यांनी ही मागणी फेटाळून लावली होती.
 
अनावश्यक गोंधळ?
इतिहासकार आणि वीर सावरकर यांच्या चरित्राचे लेखक विक्रम संपत यांनी एक ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे.
 
सध्या सुरू असलेला गोंधळ अनावश्यक आहे. मी माझ्या पुस्तकात आधीच ही गोष्ट लिहिली होती. 1920 मध्ये गांधीजींनीच सावरकर बंधुंना याचिका दाखल करण्यास सांगितलं होतं. आपल्या यंग इंडिया या वृत्तपत्रात एका लेखाच्या माध्यमातून त्यांच्या सुटकेची मागणी गांधीजींनी केली होती, असं त्यांनी म्हटलं.
महात्मा गांधी यांनी यंग इंडियामध्ये जो लेख लिहिला होता, त्याचं शीर्षक होतं सावरकर बंधू.
 
त्यामध्ये त्यांनी अनेक गोष्टी लिहिल्या. त्यात गांधींनी म्हटलं की दोघंही ब्रिटिश सरकारकडून स्वातंत्र्य मागत नाहीत. उलट इंग्रज सरकारच्या सहकार्याने भारतासंदर्भातलं धोरण योग्यरित्या बनवलं जात आहे, असं त्यांना वाटतं."
 
शम्सुल इस्लाम दिल्ली विद्यापीठात राज्यशास्त्र विषयाचे शिक्षक होते. त्यांनी सावरकर-हिंदुत्व : मिथक आणि सत्य हे पुस्तकही लिहिलं आहे. याच पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीचं नाव आहे सावरकर अनमास्क्ड.
शम्सुल इस्लाम म्हणतात, "दया याचिका दाखल करणं हा काही गुन्हा नाही. कैद्यांना आपलं म्हणणं मांडण्यासाठीचा हा एक अधिकार आहे. पण सावरकरांचा माफीनामा गुडघे टेकवणारा आहे. कित्येक क्रांतिकारींना काळ्या पाण्याची शिक्षा झाली, फासावर लटकवण्यात आलं. काही वेडे झाले तर काहींनी आत्महत्या केली. पण कुणीही माफीनामा लिहिला नव्हता."
 
इस्लाम यांच्या मते माफीनामे फक्त चार जणांनी लिहिले. त्यामध्ये सावरकर, अरबिंदो घोष यांचे भाऊ बारिंद्र घोष, ऋषिकेश कांजीलाल आणि गोपाल यांचा समावेश आहे.
 
ते सांगतात, "ऋषिकेश कांजीलाल आणि गोपाल यांच्या याचिकेत त्यांनी आपण राजकीय कैदी असल्याने आपल्यासोबत तसा व्यवहार करावा, असं म्हटलं होतं. ही योग्य याचिका होती. त्याचं तांत्रिक नाव दया याचिका आहे."
 
हिंदू महासभा आणि आरएसएसच्या अनेक व्यक्तींनी सावरकरांचं चरित्र लिहिलं आहे, पण त्यापैकी कुणीही गांधींच्या सल्ल्यानुसार माफी मागितल्याचं लिहिलेलं नाही, असं शम्सुल इस्लाम यांनी सांगितलं.
 
ते म्हणतात, सर्वात लज्जास्पद म्हणजे हा माफीनामा 14 नोव्हेंबर 1913 चा आहे. तर गांधीजी भारताच्या राजकारणात 1915 च्या अखेरीस आले होते. त्यामुळे गांधींच्या सांगण्यावरून माफीनामा लिहिल्याचं म्हणणं अर्थहीन आहे.
 
इस्लाम यांच्या मते महात्मा गांधी यांनी यंग इंडियामध्ये सावरकर यांच्या माफीनाम्यावर एक लेख लिहिला होता. त्यात त्यांनी सावरकर यांच्यासारख्या लोकांनी माफीनामा लिहून नैतिक मूल्यही गमावल्याचं म्हटलं होतं."
 
त्यामुळे वादग्रस्त वक्तव्यं करून गांधींचा अपमान करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोक गांधींना गोडसे आणि सावरकर यांच्या बरोबरीने उभे करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं इस्लाम यांना वाटतं.