शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. मराठी निबंध
Written By
Last Updated : गुरूवार, 11 मार्च 2021 (16:28 IST)

मोबाईल शाप की वरदान

आजच्या काळात सर्वत्र तंत्रज्ञान विकसित झाले आहे. विज्ञानाने फार प्रगती केली आहे. त्यामुळे आपल्याला सर्व नवे नवे तंत्रज्ञान वापरायला मिळत आहेत. त्यामधील एक तंत्रज्ञानाचे साधन आहे मोबाईल. आज घरोघरी प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसतो. 
 
मोबाईल शिवाय आयुष्याची कल्पनाच करता येत नाही कारण आपल्याला त्याची फार सवय लागली आहे. बाळ गोपाळापासून वृद्धांपर्यंत मोबाईलचा वापर सर्रास करतात त्या मुळे मोबाईल शाप आहे की वरदान हे सांगणे अवघडच आहे. 
 
आपल्याला कधीही नको त्या वेळी देखील नको असलेले कॉल किंवा मेसेज येतात. बऱ्याच वेळा आपण आपले मोबाईल बंद करून त्याला टाळतो पण प्रत्येकवेळी हे शक्य असेल असे नाही. काही लोक याचा गैरवापर करतात आणि तासन्तास गप्पा करतात, त्यामुळे स्वतःच्या वेळेचा तर सोडा दुसऱ्याचा किती वेळ घालवत आहे ह्याचं भानच ठेवत नाही. 
 
आज असे दिसून येते की एका घरात जेवढी माणसे तेवढेच मोबाईल असतात. जो बघा तो दिवसं रात्र मोबाईल मध्येच गुरफटलेला असतो. घरात असून एकमेकांशी संवाद साधायला त्यांच्याकडे वेळच नसतो. लहान मुलं देखील मोबाईल शिवाय जेवण करत नाही. हे सरासर चुकीचे आहे. त्यामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर तसेच डोळ्यावर देखील परिणाम होतात. 
 
जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असल्यास मोबाईलच्या माध्यमाने आपण लगेच एकमेकांशी संवाद साधू शकतो, एकमेकांना बघू शकतो. मोबाईलचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटे देखील असतात. लोक मोबाईलमुळे गैरवर्तन करतात. नको ती साईट्स उघडून त्याचा गैरवापर करतात. 
 
गाडी चालवताना देखील फोन वर बोलतात, त्यामुळे अपघात होतात. कानामध्ये हेडफोन लावतात त्यामुळे त्याचा दुष्परिणाम कानावर आणि मेंदूवर होतो. मानसिक विकृती विकसित होते आणि माणूस नको ते व्यवहार करतो. 
 
मोबाईलच्या द्वारे सामाजिक विघटन सारख्या घटना घडतात. मोबाईल वर अंधश्रद्धा पसरवणारे मेसेज जगभरात पसरतात. काही लोक गुन्हेगारीसाठी त्याचा सर्रास वापर करतात. विद्यार्थी देखील याचा गैरवापर करतात. हे चुकीचे आहे. 
 
मोबाईलचा वापर चांगल्या गोष्टींसाठी करावा. मोबाईल हे शाप आहे असे म्हणून चालणार नाही. कारण प्रत्येक गोष्टीची मर्यादा असते. त्यामुळे आपल्याला ती मर्यादा ओलांडायची नाही हे लक्षात ठेवले तर त्या तंत्रज्ञानाचा चांगलाच फायदा आहे. 
 
दिलेल्या तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या गोष्टींसाठी केला पाहिजे. आपण मोबाईलचा वापर चांगल्या हेतूने करावे. मोबाईल नेहमी धोरणाने वापरावे. त्यामधून चांगले घ्यावे. तेव्हाच मोबाईल आपल्या साठी वरदान सिद्ध होणार.