बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: मंगळवार, 3 जुलै 2018 (11:21 IST)

‘मी अगेन्स्ट दी मुंबई अंडरवर्ल्ड’... इसाक बागवान यांची शौर्यगाथा इंग्रजीत

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार प्रकाशन
 
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि ॲड. उज्ज्वल निकम राहणार उपस्थित 
 
मध्य मुंबई आणि पोलीसांवर दहशत माजवणारा खतरनाक गुंड मन्या सुर्वेचा कर्दनकाळ ठरलेले, १९८० च्या दशकातील बडा राजन, हाजी मस्तान, पठाण गँग, दाऊद गँग, पोत्या - अमर नाईक - अरूण गवळी टोळी, ड्रग्ज किंग आगा खानसारख्या आणि इतर समाजविघातक शक्तींना वेसण घालणारे जिगरबाज पोलीस अधिकारी इसाक बागवान यांच्या ‘Me Against the Mumbai Underworld’ ह्या शौर्यगाथेचे प्रकाशन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. गुरूवारी ५ जूलै रोजी मुंबईच्या रंगशारदा नाट्यगृहात प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी, विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम, खा. संजय राऊत, पोलीस महानिरीक्षक कैसर खालीद, अभिनेता रझा मुराद, निवृत्त पोलीस सहआयुक्त मधुकर झेंडे आदी मान्यवर ह्या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
११ जून १९८२ रोजी पोलीस इतिहासातील (मन्या सुर्वेच्या) पहिल्या एन्काऊंटरमुळे नावारूपास आलेले ते 26/11 च्या अतिरेकी हल्ल्यात एन.एस.जी कमांडो येईपर्यंत नरीमन हाऊसचा किल्ला यशस्वीरित्या लढविणारे निवृत्त सहआयुक्त इसाक बागवान.  ३५ वर्षांच्या कारकिर्दीत एका पेक्षा एक रोमांचकारी गुन्ह्यांचा लावलेला छडा, अनेक अप्रकाशित घटना आणि रहस्यमय किस्से ‘Me Against the Mumbai Underworld’ ह्या पुस्तकात वाचकांना अनुभवायला मिळणार आहे. त्याकाळी आतासारखी संपर्क साधने नसतानाही केवळ खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे थेट गुन्हेगारांच्या अड्ड्यांवर छापे मारून रक्ताला चटावलेल्या अनेक खतरनाक गुंडांच्या मुसक्या आवळण्यात इसाक बागवान यांचा हातखंडा होता.
 
तीन वेळा राष्ट्रपती शौर्य पुरस्कार मिळविणारे इसाक बागवान हे स्वत: अनेकवेळा गुन्हेगारी टोळ्यांच्या हल्ल्यातून आश्चर्यकारकरित्या बचावले आहेत. पोलीस उपनिरिक्षक ते सहायक आयुक्त ह्या प्रवासात केवळ धाडसी पोलीस अधिकारी म्हणून नाही तर खाकी वर्दितील सहृदयी माणूस अनेक घटनांमधून पोलीस दलाने आणि समाजाने अनुभवला आहे. अशा ह्या कर्तबगार इसाक बागवान यांची शौर्यगाथा प्रत्येक भारतीय नागरीकासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.