मारुती चितमपल्ली (जन्म: 5 किंवा 12 नोव्हेंबर 1932 – मृत्यू: 18 जून 2025) हे मराठी लेखक, वन्यजीव अभ्यासक, पक्षीतज्ज्ञ आणि वनसंरक्षक होते. त्यांना "अरण्यऋषी" म्हणूनही ओळखले जायचे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य निसर्ग, वन्यजीव आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि अभ्यासासाठी वाहिले.
महाराष्ट्रातील सोलापूर येथे एका गिरणी कामगाराच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण सोलापूर येथील टी. एम. पोरे विद्यालय आणि दयानंद कॉलेजात झाले. त्यांनी कोयंबटूर येथील स्टेट फॉरेस्ट सर्व्हिस कॉलेजमधून वनसेवेचे प्रशिक्षण घेतले आणि महाराष्ट्र वनसेवेत 26 वर्षे सेवा बजावली, ज्यात ते उपवनसंरक्षक (Deputy Chief Conservator of Forests) म्हणून निवृत्त झाले.
सोलापूरातील गुजराथी, तेलुगू आणि उर्दू मिश्रित वातावरणात चितमपल्ली यांचे बालपण गेले. त्यांच्या आई-वडिलांना वाचनाची आणि निसर्गाची आवड होती, ज्यामुळे मारुती यांना लहानपणापासून जंगल आणि निसर्गाबद्दल आकर्षण निर्माण झाले. त्यांनी मराठी, संस्कृत, जर्मन आणि रशियन भाषांचा अभ्यास केला आणि 13भाषा अवगत होत्या.
त्यांनी कर्नाला पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट टायगर रिझर्व्हच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले. वनसेवेदरम्यान त्यांनी 65 वर्षे जंगलात घालवली आणि प्राणी, पक्षी, वनस्पती यांचा सखोल अभ्यास केला.
चितमपल्ली यांनी मराठी साहित्यात निसर्गावर आधारित ललित लेखनाला नवीन उंची दिली. त्यांच्या लेखनात शास्त्रीय माहिती आणि लालित्यपूर्ण शैली यांचा सुंदर संगम आहे. त्यांनी 25 हून अधिक पुस्तके लिहिली, ज्यात पक्षीकोश, प्राणीकोश, वृक्षकोश, रानवाटा, जंगलाचं देणं आणि नीलवंती यांचा समावेश आहे. त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार (1989, 1993-94 आणि विदर्भ साहित्य संघ पुरस्कार (1991) यांसारखे मानाचे पुरस्कार मिळाले.
त्यांनी जंगल पर्यटनाबाबत सल्ला दिला की, जंगलात मेकअप, परफ्यूम किंवा पावडर वापरू नये, कारण प्राण्यांना मानवी वासाने धोका वाटतो, आणि ते सावध होऊन स्वतःला सुरक्षित ठेवतात.आणि त्यामुळे हल्ला करतात. त्यांना 2025 मध्ये भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यांचे निधन 18 जून2025 रोजी सोलापूर येथे झाले, आणि त्यांच्या निधनाने साहित्य आणि निसर्ग संरक्षण क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली.
अस्वीकरण: : हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही.
Edited By - Priya Dixit