रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: गुरूवार, 10 जून 2021 (08:29 IST)

१० जून : नेत्रदान दिनानिमित्त लेख,अंधेरी जिंदगी में रोशनी का दीप जलाये

घरी थोडावेळ वीजपुरवठा खंडित झाला की गडद काळोखाची जाणीव माणसाला हैराण करून सोडते, मग ज्यांच्या आयुष्यात कायमस्वरूपी अंधार आहे त्यांची वेदना शब्दांत मांडणे कठीण आहे. अशा अंध बांधवांच्या आयुष्यातील अंधार दूर करण्यासाठी नेत्रदानाची चळवळ गत दहा वर्षांपासून अमरावतीच्या हरिना फाऊंडेशनद्वारे राबवली जात आहे. या उपक्रमाबद्दल 10 जूनच्या नेत्रदान दिनानिमित्त सांगताहेत फाऊंडेशनचे उपाध्यक्ष चंद्रकांत पोपट.
 
नेत्रदानातून दृष्टीहिनांच्या आयुष्यात उजेडाचा दीप उजळावा
 
दृष्टी जाण्याची अनेक कारणे असतात. पण नेत्रदानातून अनेक दृष्टीहिनांना पुन्हा दृष्टी मिळू शकते. गरज आहे सकारात्मक प्रयत्नांची. त्यासाठी नेत्रदानाविषयीचे गैरसमज समूळ काढून टाकण्याची गरज आहे. याबाबत श्रीलंका या देशाकडून बोध घेतला पाहिजे. तिथे कुठल्याही व्यक्तीचा मृत्यू झाला की त्याचे नेत्रदान केले जाते. अनेक देशांनी ही तरतूद स्वीकारली आहे. भारतात मात्र अजूनही मरणोत्तर नेत्रदानाबाबत बरेच गैरसमज आहेत. या गैरसमजांमुळे नेत्रदानाप्रती समाजात निर्माण झालेली उदासीनता चिंताजनक आहे. भारतात होणाऱ्या मृत्यूच्या आकडेवारीनुसार प्रत्येकाचे नेत्रदान झाले तर संपूर्ण जगातील अंधत्वाचे निवारण होऊ शकते. जर श्रीलंकेत हे स्वीकारले गेले तर, भारतातही झाले पाहिजे, यादृष्टीने फाऊंडेशनमार्फत आम्ही पाठपुरावा करतच आहोत पण या प्रयत्नांना नागरिकांची साथ मिळणेही आवश्यक आहे.
 
मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्यांचेही नेत्रदान होऊ शकते
 
जगातील अंध लोकसंख्येतील एक चतुर्थांश व्यक्ती एकट्या भारतात आहेत. त्यातही बालकांची संख्या मोठी आहे. त्यांचे आयुष्य प्रकाशमय करण्यासाठी नेत्रदानाची चळवळ सर्वदूर पोहोचली पाहिजे. 75 वर्षांच्या व्यक्तीचेही नेत्रदान होऊ शकते. केवळ एडस्, कर्करोग आदी गंभीर आजाराच्या रुग्णांचे नेत्रदान होऊ शकत नाही. चष्मा वापरणाऱ्या किंवा अगदी मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तीचे नेत्रदानही करता येते.
 
प्रक्रिया असते साधीसुलभ  
 
नेत्रदानाची प्रक्रिया साधी व सुलभ असते. निधन झालेल्या व्यक्तीच्या नेत्रदानासाठी निधनानंतर डोळ्यांवर ओले कापड व डोक्याखाली उंच उशी ठेवावी. मृतदेह ज्या कक्षात आहे, तेथील पंखे व दिवे बंद करावेत. याबाबत हरिना नेत्रदान समिती किंवा संबंधित स्वयंसेवी संस्था, आय बँक, डॉक्टर यांना वेळीच माहिती द्यावी. व्यक्तीच्या निधनानंतर सहा ते आठ तासांत नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असते. संस्थेकडून पथक घरी आल्यानंतर 15 ते 20 मिनीटांत नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण करते. निधन झालेल्या व्यक्तीचे डोळे दृष्टीहिनांना दृष्टी मिळवून देतात.
 
नेत्रदानात डोळे नव्हे तर केवळ कार्निया काढला जातो. डोळ्यातून काढलेला कार्निया 120 तासांत अंध व्यक्तीत प्रत्यारोपित केला जातो. गरजूला दृष्टी प्राप्त होण्यासाठी कॉर्नियल ट्रान्सप्लांटची गरज असते. अशा शस्त्रक्रिया करणारी केंद्रेही पुरेशा संख्येने उपलब्ध असणे गरजेचे असते. अमरावतीमध्ये सध्या तीन प्रत्यारोपण केंद्रे आहेत. तिथे डॉ.पंकज लांडे, डॉ.प्रवीण व्यवहारे, डॉ. नवीन सोनी, डॉ.अतुल कढाणे,डॉ.मनीष तोटे आदी तज्ज्ञ उपलब्ध आहेत.
 
हरिना फाऊंडेशनने आतापर्यंत 2 हजार 900 व्यक्तींच्या नेत्रदान प्रक्रियेत सहभाग घेतला. आता शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही जनजागृती सुरु केली आहे. मोर्शी, दर्यापूर व परतवाड्यातही फाऊंडेशनची शाखा सुरु करण्यात आली आहे.  स्व.मंगलजीभाई जीवनजीभाई पोपट, स्व.लीलाबेन मंगलजीभाई पोपट व स्व.रोहित दिलीपभाई पोपट यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अमरावती जिल्ह्यात 46 नेत्रदान शिबिरे घेण्यात आली. त्याचा लाभ 50 हजार व्यक्तींनी घेतला. खापर्डे बगिच्यात स्व.मंगलजीभाई पोपट नेत्रालयात अत्यल्प दरात संगणकाद्वारे डोळ्यांची तपासणी होते व चष्माही दिला जातो. अनेक दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून हा उपक्रम राबवला जात आहे.  सीएस डॉ.श्यामसुंदर निकम यांच्या मार्गदर्शनात नेत्र चिकित्सक डॉ.नम्रता सोनोने व त्यांची टीम मदतीसाठी तत्पर असते. स्व.मधुसुदनजी जाजोदिया नेत्र प्रत्यारोपण केंद्राद्वारे 290 दृष्टिहिनांवर प्रत्यारोपणासाठी सहकार्य करण्यात आले. गरीब व वंचित घटकांसाठी हा उपक्रम राबवला जात आहे.  अवयवदानाच्या चळवळीतही अमरावती जिल्हा आघाडीवर असून, आतापावेतो 15 व्यक्तींचे अवयवदान झाले आहे.
 
दृष्टीहिनाच्या जीवनात प्रकाश पेरणे हीच मृत व्यक्तीसाठी खरी श्रद्धांजली ठरते. त्यामुळे नेत्रदानासाठी किंवा अवयवदानासाठी कुटुंबियांनीही पुढाकार घेतला पाहिजे. यासाठी चळवळ सर्वदूर निर्माण होण्याची गरज आहे. देशातील कुणीही व्यक्ती अंधत्वाची शिकार होऊ नये व अवयवदानाअभावी  गरजूला प्राण गमवावे लागू नये यासाठी संकल्प करूया व चळवळीला बळ देऊया.
 
– चंद्रकांत पोपट, अमरावती