बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: बुधवार, 5 जानेवारी 2022 (13:51 IST)

सिंधुताई सपकाळांवर शासकीय इतमामात महानुभाव पंथानुसार अंत्यसंस्कार, या पंथाविषयी जाणून घ्या..

राहुल गायकवाड
पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे मंगळवारी रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर आज (5 जानेवारी) दुपारी बाराच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
सिंधुताई सपकाळ यांच्यावर पुण्याच्या ठोसर पागा येथे महानुभाव पंथानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
 
सिंधुताई यांच्यावर पुण्यातील गॅलेक्सी केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यानंतर गेल्या महिन्याभरापासून त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या.
 
सिंधुताई या महानुभाव पंथाचे आचरण करत होत्या. त्या कट्टर कृष्णभक्त होत्या. त्यांचा जन्म महानुभाव पंथात त्यांचा झाला होता.
 
महानुभाव पंथ नेमका काय आहे आणि या पंथातील व्यक्तीवर कशा प्रकारे अंत्यसंस्कार करतात हे आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला.
 
इतिहास आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी या पंथाबाबत अधिक माहिती दिली.
 
मोरे म्हणाले, ''ऐतिहासिक दृष्टिकोनातून विचार केल्यास महानुभाव पंथ हा इस. 13 व्या शतकात सुरु झाला. हा पंथ प्राचीन काळापासून आहे असं देखील काहींच म्हणणं आहे.
 
"13 व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये महाराष्ट्रात चक्रधर स्वामी होते. ते मुळचे गुजरातचे होते, ते महाराष्ट्रात आले त्यांनी या पंथाचा प्रचार केला. हा कृष्ण भक्तीचा पंथ आहे. तो भगवान कृष्ण आणि चक्रधरांची वचन प्रमाण मानतो. चक्रधर हे इश्वराचा अवतार आहे असं या पंथामध्ये मानलं जातं. त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे ते आजही वागतात,"
 
"विदर्भात या पंथाचा मोठा प्रसार झाल्याचं पाहायला मिळतं. वृद्धीपूर हे त्यांचं मुख्य ठिकाण आहे. परमार्थामध्ये कुठल्याही जातीची व्यक्ती सन्यास घेऊ शकते असं देखील या पंथामध्ये सांगण्यात आलं," असं देखील मोरे म्हणाले.
 
या पंथामध्ये दोन प्रकार आहेत
महानुभाव पंथामध्ये दोन प्रकार मानले जातात. ज्यांनी पूर्ण दीक्षा घेतली आहे संसार प्रपंचाचा त्याग केला आहे आश्रमात राहतात अशांना भिक्षू म्हणता येऊ शकतं आणि दुसरा सर्व सामान्य प्रापंचिक त्यांना वासनिक म्हटलं जातं.
 
दीक्षा घेतलेले महानुभाव पंथी हे वासनिक प्रपंचामध्ये असणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कर्मठ असतात.
 
महानुभाव पंथात अंत्यसंस्कार कसे होतात ?
महानुभाव पंथामध्ये केल्या जाणाऱ्या अंत्यसंस्काराला 'निक्षेप' असं म्हटलं जातं. या पंथामध्ये अग्निसंस्कार केले जात नाहीत तर पार्थिव दफन करतात.
 
या विधीबाबत बीबीसी मराठीने या पंथाचे अभ्यासक पुरुषोत्तम नागपुरे यांच्याकडून अधिक माहिती घेतली.
 
नागपुरे म्हणाले, "महानुभाव पंथ स्विकारलेल्या व्यक्तीला दफण केले जाते. दफन करताना एक खड्डा केला जातो. त्या खड्ड्यात एक कपार केली जाते. त्या खड्ड्यात मीठ टाकतात त्यानंतर मृतदेह ठेवल्यानंतर वरुन पुन्हा एक दोन पोती मीठ टाकलं जातं. त्यानंतर माती टाकली जाते.
 
पार्थिव दफन करण्यासाठी नेण्यापूर्वी गीतेच्या पंधराव्या अध्यायाचे स्मरण केले जाते. त्यानंतर डोलीमध्ये ठेवून दफन करण्यासाठी नेले जाते. दफन स्थळी गेल्यानंतरही गीतेच्या पंधराव्या अध्यायाचे स्मरण केले जाते.
 
"भारतात असे अनेक पंथ आहेत ज्या पंथात संन्याशांचे दहन केले जात नाही तर दफन केले जाते. संन्यासी लोकांची समाधी देखील केली जाते.
 
"महानुभाव पंथामध्ये दफन केलं जातं परंतु समाधी केली जात नाही. समाधी करुन त्याचे पूजन करण्याच्या विरुद्ध महानुभाव पंथ आहे. महानुभव पंथामध्ये संन्यासी तसेच सन्यास न घेणाऱ्या प्रत्येकाचे दफन केले जाते," असं देखील नागपुरे सांगतात.
 
महानुभाव पंथाचा उत्तरेकडे प्रसार
महानुभाव पंथाचा प्रसार पाकिस्तानपर्यंत झाला होता. चक्रधरस्वामी पुढे उत्तरेकडे निघून गेले होते. तिकडे त्यांनी या पंथाचा मोठा प्रसार केला.
 
उत्तरेकडे या पंथाला 'जयकृष्णी' पंथ म्हटले जाते. आजही उत्तर भारतात या संप्रदायाचे आश्रम आणि महंत आहेत.
 
पंथाचे प्रमुख चार नियम म्हणजे शरणागती, प्रसाद सेवा, मूर्तिध्यान व मूर्तिज्ञान आणि नामस्मरण हे आहेत. या पंथामध्ये स्त्रियांना मठात संन्यासिनी म्हणून जगण्याचा अधिकार आहे.
 
अहिंसा, शाकाहार, सात्त्विक जीवन, भिक्षा मागणे व देशभ्रमण या गोष्टी काटोकोरपणे या पंथामध्ये पाळल्या जातात.