सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By Author रूपाली बर्वे|
Last Modified: गुरूवार, 17 नोव्हेंबर 2022 (16:37 IST)

35 तुकड्यांच्या किंचाळाने आता तरी आंधळ्या प्रेमाला डोळे यावे...

love
आपल्या प्रेमाबद्दल कुणी उलट-सुलट बोललं तर किंचितही सहन होत नाही मगं आपल्याच हाताने आपल्या प्रेमाचे 35 तुकडे-तुकडे करावे इतकी घृणा.. इतका वहशीपणा... कसा यावा? अशी कोणती मागणी केली असावी तिने? लग्नाचीच... का? तर तिला सन्मान, सुरक्षा आणि सामान्य जीवन हवं हवंस वाटत असावं... हे एका दिवसात घडलेलं प्रकरण तर मुळीच असू शकतं नाही.... कुठलीही दोर ताण दिल्यावरच तुटले... पण तो कधी तरी बदलेल, कधी तरी सुधारेल, कधी तरी पुन्हा प्रेमाने वागेल, आपलं प्रेम खरं असल्याचे समजून तिने किती तरी वेळा प्रेमापोटी त्याला माफ केलं असेल... कुटुंबाचा विरोध पत्कारुन आपल्या प्रेमासाठी किती तरी आपल्यावर जीव देणारी माणसं दुरावून लावली असेल... पण शेवटी परिणाम काय? इतका विकृत... 
 
ही आजची पिढी ज्यांना आई-वडिलांनी कान धरलेले खपत नाही तर चुका आणि ठोकर खाल्ल्यावरच अक्कल येते. धडे देणे, चुक काय बरोबर काय याची जाणीव करुण देणे त्यांना बंडखोर बनवते. पण जेव्हा विश्वासाला तडा जातो, सुरक्षा पणाला लागते, इज्जतीची भीती सतावते तेव्हाच पवित्र बंधने आठवतात.. समाजाने दिलेली विवाह पद्धतीचं महत्त्व कळतं.. दुरावलेल्या आई-वडिलांची शिकवण देखील आठवतंच असेल...
 
प्रेमात पडल्यावर समोरच्याला त्याच्या गुण-अवगुणांसकट स्वीकारण्याची वृत्ती काही दिवस महान असल्याची अनुभूती देत असेल कदाचित... तेव्हा अधून-मधून त्याने रागाने हात उचल्यावर निमूटपणे गिळून गप्प बसणे... स्वत:ची समजूत काढणे की तो असा नव्हे... रागाच्या भरात चुकला असेल तरी लगेच प्रेमाने जवळ करतो... काळजी घेतो... इथेच काही चुकत आहे हे लक्षात घेण्यासारखं आहे... कारण चुकीची माफी मागून नंतर त्याने घेतलेली काळजी आणि भरभरुन दिलेलं शारीरिक प्रेम तो पुढे कधीही असं वागणार नाही याची पावती नव्हे.. त्याच्या या चुका पोटात घालून आपण त्याच्या वहशीपणाला वाव तर देत नाहीये.. हे विचार करण्यायोग्य आहे.
 
आता लिव्ह-इन या विषयावर विचार केला तर लग्नात अस घडतं नसावं याची हमी नाहीच... पण ज्या नात्यात एकत्र राहणे फक्त नावालाच मात्र विश्वास दूरदूरपर्यंत नाही.. हे नातं स्त्री स्वातंत्र्याचा आरसा दाखवत असलं तरी शोषणाचा आधुनिक प्रकार तर नाही... याचा विचार केला पाहिजे... 
 
अगदी यावर चर्चा करायला बसलो तर लोकं त्या काळातील उदाहरणं देखील मांडतील ज्या युगात माणूस सुसंस्कृत नव्हता आणि त्याला पाहिजे तोपर्यंत कोणत्याही स्त्री किंवा पुरुषासोबत राहण्याचे स्वातंत्र्य होते.
 
पण आपली समाजव्यवस्था सुसंस्कृत होत असताना विवाह संस्थेचा उगम झाला. सुव्यवस्थित सामाजिक व्यवस्था राबवण्यासाठी घडलेल्या या परिवर्तनामुळे याला सामाजिक आदर आणि प्रतिष्ठेच्या दृष्टिकोनातून पाहिले गेले. या व्यस्थेमुळे स्त्रियांना केवळ संरक्षणात्मक कवचच मिळाले नाही तर किती तरी हक्क पदरी पडले.
पण प्रेम आहे आणि त्याला नावाची गरज नाही म्हणून नात्यात सन्मान प्रेमापेक्षा किततरी पटीने महत्त्वाचा असतो हे मुली विसरत असतील तर त्यांनी आपली भूल सुधारली पाहिजे... जेथे सन्मान नाही तेथे प्रेमाला अर्थ नाही... ज्यात कथित प्रेमाचा गळा आवळताना, 35 तुकडे करताना हात थरथरत नाही... ते केमिकल टाकून वेगवेळ्या ठिकाणी फेकून देताना मन मोठी चूक घडल्याची गवाही देत नाही.... याला प्रेम म्हणावं...?
 
का मुलींना हा प्रकार लवकर लक्षात येत नाही किंबहुना लक्षात आल्यावरही विधात्याने स्त्रीला वरदान म्हणून वेदना सहन करण्याची प्रवृत्ती जीवावर बेतते..... भंडावून सोडतो तो हा विचार की शिक्षित...आत्मनिर्भर.. स्वत:च्या पायावर उभी राहणारी स्वतंत्र स्त्री... आपण घेतलेला निर्णयच योग्य अशी ठाम मते पटवून देणारी स्त्री... शारीरिक आणि भावनिक छळाला बळी जात असतानाही सर्व काही सुरळीत होईल म्हणून कुणालाही आपल्या आयुष्यात डोकावण्याची परवानगी न देणारी स्‍त्री... खरंच इतकी सक्षम आहे का? की केवळ धाडसी असल्याचा देखावा सुरु आहे... दोन दिवसाच्या प्रेमात किंवा करिअरमध्ये जरा उंची गाठल्यावर येणारा अभिमान आपल्या आई-वडिल आणि कुटुंबापेक्षा कधी मोठा होता तेच कळत नाही... या भुरळ घालणार्‍या जाळ्यात सर्व इतकं सोनेरी दिसू लागतं की त्यामागील अंधार दिसेनासा होता... आणि तो दाखवण्याचा प्रयत्न करत असलेले जीवलग दुरावले जातात.... 
 
हे आपण ठरवायचे आहे की आपण आपल्या जीवनात सन्मान आणि प्रतिष्ठेला प्राधान्य द्यायचे की अस्तित्वात नसलेल्या नात्याला? असं नातं तरी काय ज्यात मूल्य नाही, समर्पण नाही, मान नाही, सुरक्षा नाही.
 
तथाकथित स्वतंत्र म्हणवल्या जाणार्‍या मुलींनीही स्वातंत्र्याची अशी व्याख्या बघून विचार करण्याची गरज आहे की हे देखील शोषणाचे आधुनिक रूप तर नाही... 
 
अश्या नात्याचं काय असत्त्वि ? जे जन्मदात्यांशी जुळलेली नाळ, जीवापाड निस्वार्थ प्रेम देणारी मैत्री आणि संपूर्ण जगाशी संबंध तोडण्यास भाग पाडतं असेल .... त्यात खरंच प्रेम असेल तरी का? प्रेम आंधळं मुळीच नसावं... त्याला चक्क चमकदार डोळे असावे... तीक्ष्ण मेंदू हवा... सतर्कता असावी... आणि 35 तुकडे होण्याआधीच कधी हे न जुळलेलं बंध तोडावे इतकी हुशारी असावी...
 
मात्र 35 तुकड्यांमध्ये जीव गमावणार्‍या त्या एका मुलीचे किंचाळणे आणि मनात असलेले किती तरी प्रश्न असे स्वातंत्र्य शोधत असलेल्या प्रत्येक मुलीने ऐकावे....