सोमवार, 14 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 नोव्हेंबर 2022 (21:56 IST)

डॉ. राणी बंग रुग्णालयात दाखल, मुंबईच्या रिलायन्स रुग्णालयात हलवण्यात येणार

dr rani bang
जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या चातगाव येथील सर्च- शोधग्रामच्या प्रणेत्या डॉक्टर राणी बंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नागपूर येथील सिम्स रुग्णालयात आसीयुमध्ये डॉ. राणी बंग अॅडमिट आहेत. मात्र प्रकृती अधिक गंभीर होत चालल्याने त्यांना तत्काळ मुंबई येथील रिलायन्स रुग्णालयात हलवण्यात येणार आहे.
 
गडचिरोली जिल्ह्यातील समाजसेवक डॉक्टर अभय बंग यांच्या त्या धर्मपत्नी आहेत. मेंदूच्या आजाराने ग्रस्त असल्याने राणी बंग यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरु आहेत.  तीन दिवसांपूर्वी वर्धा येथे झालेल्या एका जाहीर कार्यक्रमानंतर राणी बंग यांना अचानक अस्वस्थ वाटू लागेले होते. राणी बंग यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना एका स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांना आता पुढील उपचारासाठी नागपूरमधील सिम्स रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले.
 
स्त्रीरोग शास्त्र या विषयात डॉ. राणी बंग यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. तसेच अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स विद्यापीठातून मास्टर्स इन पब्लिक हेल्थ या विषयात त्यांनी पदवीही मिळवली.
 
डॉ. अभय बंग यांच्यासोबत जोडल्या गेल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी स्त्रियांच्या आरोग्यावर मोठं काम केलं. या स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्या आणि भावविश्वाचा आढावा घेणारी दोन पुस्तकं त्यांनी लिहिलं. कानोसा आणि गोईण अशी ही दोन पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
 
डॉ. अभय बंग आणि राणी बंग यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा डीलिट, 2003 सालचा महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार तर 2018 सालचा पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळाला.