महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जीवनकार्यावर आणखी येणार तब्बल एवढे नवे ग्रंथ
महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या ३४ नवीन ग्रंथ प्रकाशनास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा समितीचे अध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी मान्यता दिली. तसेच महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्रे साधने समितीच्या सदस्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे मानधन तातडीने देण्यात यावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.पाटील यांनी दिले.
महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्रे साधने प्रकाशन समितीची बैठक मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय येथे झाली. यावेळी मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते “शोध महाराजा सयाजीरावांचा” या समितीने तीन वर्षांत केलेल्या कार्य अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्रे साधने प्रकाशन समितीचे सदस्य ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, बडोदा विद्यापीठाच्या कुलगुरू व समिती सदस्य श्रीमती राजमाता सुभांगीनी राजे गायकवाड, डॉ. भारती पाटील, प्रा शिवाजी देवनाळे, श्रीमती मंदा हिंगुराव, डॉ.विजय शिंदे, दिनेश पाटील व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या वर्षानिमित्त समितीचे सदस्य बाबा भांड यांनी सयाजीराव गायकवाड यांच्या संबंधीच्या लंडनच्या अभिलेखागारातून 15 दुर्मिळ कागदपत्रे मिळविली आहेत. ही समाधान आणि आनंदाची बाब आहे. त्याचे प्रकाशन लवकरच राज्य शासनाकडून करण्यात येईल. हा नवा इतिहास संशोधकास नक्कीच प्रेरणा देईल. हे सर्व साहित्य ऑनलाइन उपलब्ध व्हावे यासाठी संकेतस्थळ तयार करण्यात आली आहे. याचे उद्घाटन लवकरच करण्यात येईल, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले. या समितीने तीन वर्षात २६ हजार पानांचे ६२ ग्रंथ प्रकाशित केले यात ३२ ग्रंथ मराठीत, २० ग्रंथ इंग्रजी आणि १० ग्रंथ हिंदी भाषेतील आहेत.
Edited By- Ratnadeep Ranshoor