गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 नोव्हेंबर 2022 (15:16 IST)

राज्यात जिल्हा परिषदांमध्ये होणार मोठी नोकरभरती; सरकारची मंजुरी

mantralaya
जिल्हा परिषदेतील गट ‘क’ वर्गाची नोकर भरती लवकरच करण्यात येणार असून, राज्य सरकारने या प्रक्रियेला हिरवा कंदील दाखवला आहे. एकूण रिक्त जागांच्या ८० टक्के जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामध्ये वाहन चालक आणि गट ड वर्गातील पदे वगळून इतर पदे भरण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
 
ज्या विभागांचा किंवा कार्यालयांचा सुधारित आकृतीबंध अंति झालेला आहे, अशा विभागातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे १०० टक्के भरण्यास मुभा देण्यात येत आहे. ज्या विभागांचा सुधारित आकृतीबंध अद्याप अंतिम झालेला नाही, अशा विभागातील गट अ, गट ब व गट क मधील (वाहनचालक आणि गट ड संवर्गातील पदे वगळून) सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या ८० टक्के मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरम्यास मुभा देण्यात येत आहे. गट क वर्गासाठी होणारी ही पदभरती जिल्हा निवड मंडळ आणि जिल्हा परिषद अंतर्गत होणार आहे.
 
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात ७५ हजार नोकर भरती करण्यात येत असून यात ग्रामविकास विभागाची ही नोकर भरती महत्त्वाची मानली जाते. गेल्या दोन वर्षामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने यादरम्यान राज्यातील नोकर भरतीवर निर्बंध लादण्यात आले होते. आता हे निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्या अंतर्गत राज्य सरकारने गट क आणि गट ड वर्गासाठी ७५ हजार नोकर भरती करण्यात येणार असल्याचं जाहीर केले आहे.
 
राज्यात शासकीय कर्मचारी यांची २ लाख ४४ हजार ४०५ जागा रिक्त आहेत. एकूण पदसंख्येच्या २३ टक्के जागा रिक्त आहेत. ७५ हजार नोकर भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे कोणत्या विभागात अंदाजीत किती नोकर भरती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
गृहनिभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग, महसूल आणि वन विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आदिवासी विभागी, सामाजिक न्याय विभाग या विभागांमध्ये १ लाख ४१ हजारांच्या आसपास पदे भरली जाऊ शकतात.
 
‘या’ खात्यांमध्ये होणार भरती
आरोग्य – १० हजार ५६८
गृह  – १४ हजार ९५६
ग्रामविकास – ११ हजार ०००
कृषी  – २ हजार ५००
सार्वजनिक बांधकाम – ८ हजार ३३७
नगरविकास – १ हजार ५००
जलसंपदा  – ८ हजार २२७
जलसंधारण – २ हजार ४२३
पशुसंवर्धन – १ हजार ४७
 
Edited By- Ratnadeep Ranshoor