मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: गुरूवार, 14 जानेवारी 2021 (12:06 IST)

हुंडा फक्त मुलगाच मागतो का...?

समीर आज मुलगी पाहायला निघाला होता. सकाळपासून समीरच्या आईची खूप गडबड सुरू होती. तसे समीरच्या घरी समीर आणि समीरची आई दोघेच फक्त.  मुलगी पाहण्याकरता खास समीर मुंबईहून आला होता. समीर रुममध्ये आवरत होता. इतक्यात समीरची आई आली.
 
“समीर बेटा, आवर पटकन. पाहुणे वाट पाहत असतील…”
“हं. जाऊ चल. आलोच.” समीर आवरुन हॉलमध्ये आला. आई तिथेच होती. 
“चला आईसाहेब” असं म्हणून तो गाडीच्या चाव्या घेऊन बाहेर पडला. पाठोपाठ आईसुद्धा बाहेर पडली. 
गाडीमध्ये बसल्यानंतर समीरने आईला विचारले,
“तू भेटली आहेस का त्यांना या आधी ?”
“हो रे.. एकदा भेट झाली आहे आमची..”
“माझ्या अटींबद्दल सांगितले का..”
“हो… ते तयार आहेत. अगदी तुझ्या मनासारखंच होईल.”
आईच्या या उत्तरावर समीर किंचित हसला. ते दोघे मुलीच्या घरी पोहोचले.
 
मुलीच्या वडिलांनी समीर आणि आईचे स्वागत केले. घरी बाकी साऱ्याची ओळख करून दिली आणि मुलीच्या आईला म्हणाले,
“आर्या ला बोलवा .”
“हो..” 
आर्यच्या आई हसतमुखाने म्हणाल्या. थोड्या वेळाने आर्या आली. शिडशिडीत, सावळी, सुंदर आर्या. उंच, गोऱ्या समीरला शोभेल अशी. 
समीरला आर्या  पाहताक्षणी आवडली. तिने समीरच्या आईला वाकून नमस्कार केला आणि समीरच्या बरोबर समोर अलगद बसली. काही वेळ असाच बाकी बोलण्यात निघून गेला. 
 
नंतर आर्यच्या वडिलांनी तिला व समीरला एकांतात पाठवले. समीर व आर्या गच्चीत आले होते. दोन-चार शब्दाची देवाण-घेवाण झाल्यानंतर समीर म्हणाला, 
“तुम्हाला मुंबईला यावं लागेल लग्नानंतर…”
“हो.. ते माहिती आहे की मला…" 
“कसं काय ?”
“म्हणजे तुमच्या आई तसं म्हणाल्या होत्या… म्हणून तर तयार झाले ना मी लग्नाला.”
“अस्स… बर…"
"तसं तर मी आईलाही आताच नेणार होतो पण ऐकत नाहीत आईसाहेब..." 
यावर आर्या म्हणाली, “म्हणजे लग्नानंतर त्यासुद्धा येणार का मुंबईला ?”
“हो.. अर्थात…” 
समीरच्या या उत्तरावर आर्याच्या चेहऱ्यावरच्या छटा बदलल्या.
“काय झालं ?”
“काही नाही…”
“सांगा.. बिनधास्त. मनात शंका ठेवून राहू नका.”
“खरं सांगायचं तर तुम्ही एकटे आहात आणि वेल सेटल आहात म्हणून मी होकार दिला होता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही मुंबईसारख्या सिटीमध्ये सेटल आहात, कारण पुण्या-मुंबईसारखं मनमोकळं इथे जगता येत नाही म्हणून मी तयारही झाले होते. पण, आता तुमच्या आई येणार म्हणजे…”
तिला मध्येच तोडत समीर म्हणाला,
“मला कळालं तुम्हाला काय म्हणायचे आहे, चला जाऊ या.”
“पण…”
“उरलेलं खाली जाऊन बोलू…”
ते दोघे हॉलमध्ये आले. त्यांना पाहून आर्याचे बाबा मिश्कीलीने बोलले,
“लवकर आलात…
तर मग तुम्ही कळवा आम्हाला मग पुढील बोलणी करू.”
“हो, नक्की..” समीरच्या आई बोलल्या.
"मला बोलायचं आहे… सॉरी पण हे लग्न नाही होऊ शकत…” समीरच्या या वाक्यावर सगळे खूप दचकले..
“का ? काही प्रॉब्लेम ?" आर्याचे बाबा म्हणाले. 
अक्च्युअली, मला लग्नानंतर फक्त तुमच्या मुलीचा नवरा नाही तर या घरचा जावईही व्हायचं आहे. पण तुमच्या मुलीला माझ्या घरची सून नाही व्हायचं.”
“म्हणजे..” आर्याचे बाबा म्हणाले.
“म्हणजे, तिला फक्त मी हवा आहे. माझी आई नको.
माझी नाती नकोत आणि सर्वात महत्त्वाचे हुंडा तर मला पटतच नाही… तो देणे आणि घेणे हे मला आवडत नाही.”
“पण आम्ही हुंडा मागितला तरी कुठे…? आणि तुमच्या आईंनी आधीच सांगितले की तुम्हाला हुंडा नको म्हणून.”
“हो, आम्हाला नकोच आहे हुंडा… पण तुमच्या मुलीला हवाय…”
“काही पण बोलू नका. मी असं काही मागितलं नाही आहे…”
“वेल सेटल, पुण्या-मुंबईत राहणारा, एकुलता एक, त्याच्या आई-वडिलांची जबाबदारी नको हा हुंडाच झाला की आणि तो देणं मला जमणार नाही.
लग्नानंतर जर आम्ही तुम्हा मुलींची सारी जबाबदारी घेतो तर तुम्हाला आमची नाती सांभाळायलासुद्धा नको का ? 
जर आम्ही आमची मानसिकता बदलतो आहोत तर तुम्ही तुमची वेगळीच मानसिकता तयार करत आहात… एखादी गोष्ट आयती मिळवण्यापेक्षा ती परिपूर्ण करण्यात खरी गंमत आहे. 
एखाद्याला स्विकारताना त्याच्या गुण- दोषांसोबत त्याची नातीसुद्धा मनापासून स्विकारली तरच नातं खुलतं… असो ! चल आई निघू या आपण.”
असे म्हणून समीर निघून गेला आणि निरुत्तरीत होऊन आर्या व तिच्या घरचे त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होते.
 
मुलगा सरकारी नोकरीला पाहिजे, स्वत:चे चांगले घर पाहिजे, खूप बँक बँलंस पाहिजे, चारचाकी गाडी असावी आणि मुलाकडे खूप प्रापर्टी असावी........... मुलीला सर्व सुखसोयी मिळाव्यात हा प्रत्येक आई वडिलांचा प्रयत्न असतो. पण मुलीला लग्नासाठी तयार करताना आई-वडिलांनी तिला आधी सासरची जबाबदारी घेणं, नाती सांभाळणं विशेष म्हणजे सासू-सासऱ्याचा स्वतःच्या आई-वडिलांसारखा सांभाळ करणं हे देखील शिकवायला हवं ! 

मुलाला शिकवायचं, नोकरी लावायची, छान घर बांधून द्यायचं अन् त्याच आई- वडिलांची अडचण कशी होऊ शकते मुलींना कळत नाही. पण आर्यासारख्या मुली समाजात बघायला मिळतात. म्हणजे नवलच म्हणावं लागेल.
 
आई- वडिलांनी रक्ताचं पाणी करून ज्या मुलाला घडवलं त्याच मुलाचं लग्न होताच आई- वडिलांनी एकदम त्याच्या आयुष्यातून एक्झीट घ्यायची. का ? तर त्यांना सुन-मुख हवंय, मुलाचं लग्न हवंय. पण अशा मुली स्वतःच्या भावांचा का नाही विचार करीत ! 
 
त्यांच्या येणाऱ्या वहिनींनी पण अशीच अपेक्षा ठेवली की लग्नानंतर आई-वडील नको. तर मुलींनी चांगल्या भविष्याचा विचार जरूर करावा पण कुटुंब तोडून नाही ! 
 
- सोशल मीडिया