शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: मंगळवार, 28 जुलै 2020 (11:55 IST)

माझा लॉक डाऊन

त्या दिवशी सहज बसल्या बसल्या "लॉक डाऊन"च विचार मनात घोळत होता, आजूबाजूला असलेलं वातावरण, सद्य स्थिती या सगळ्याचा विचार मनात गुंता होतं होता, आणि एक वाटून गेलं की हे जे आपण आज भोगतोय, तसं काहीसं आपण ह्यापूर्वी ही भोगलेलं आहे. ते ही सक्ती च च होतं पण कोणती ते शब्दात सांगता येणार नाही.
साधारण २९ वर्षा पूर्वी लग्न होऊन, म्हणजेच कॉलेजच शेवटच वर्ष आटपून लगेचंच लग्न झालं, वय वर्ष २१ होत, साधारण नव्या तरुण मुलीची जी स्वप्न असतात ती माझी ही होती. लग्नानंतर लगेचंच मी "ह्यांच्या"सोबत ह्यांची पोस्टिंग जिथं होती तिथं म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील "दुसरबीड"नावाच्या गावी आली.
गावाच्या बाहेर म्हणजे शेवटी शेवटी मेन रोड वर घर /बँक होती. एक रूम होती. दुसऱ्या बाजूनं बँक होती. संसार सुरू झाला, एका खोलीत, छोटं गाव होतं, आणि पाण्याचा तुटवडा हा कायमचाच होता.
खोलीच्या बाजूच्या दारातून गेले की बँक होती, जेवण झाले की हे बँकेत, आणि मी घरी. करमायला काही साधन नाही. काम करायची आणि दारातून इकडे तिकडे बघत राहायचे.
क्रॉप लोन देण्याकरिता म्हणून ह्यांना संध्याकाळी गावाबाहेर दुसऱ्या गावांना जावे लागे, मी एकटी बसून ह्यांची वाट बघत बसली असायची. रात्री दहा नंतर वगैरे हे यायचे.
स्ट्रीट light नाहीत, आजूबाजूला राहणारे शेतातून आले की जेवून झोपणार, रात्री 8 नन्तर कुणाचा आवाज देखील येत नव्हता.
घराजवळच साखर कारखाना होता, त्याच्या "मळी"च्या वासाने रोज सतत मलमळल्या सारखे होत होते, भाजी पाला आठवडी बाजारातच मिळत असे, एरवी भाजीची दुकाने राहत नसे, त्यामुळे आठवडी बाजारात जी भाजी मिळेल तीच खावी लागे, साधारण हंगामी भाज्याचं मिळत असे. दूध ही सकाळी मिळाल्यावर दिवसभर मिळत नसे, कारण दूधवाला शेजारच्या गाऊन येत असे.
अशारितीने मी कित्येक दिवस घराबाहेर सुद्धा पडत नसे, कंटाळा येऊन येऊन कंटाळवाणे व्हायचे, खूप काही खायची इच्छा व्हायची पण साधं ब्रेडच पॅकेट पण मिळत नसे, सदा आपणाच स्वयंपाक करा (त्याच त्या भाज्या) आणि जेवा.
किराणा मालाची पण फारच थोडी अन छोटे छोटे दुकानं होती, सर्व जिन्नस पण मिळेना. गॅस सुद्धा 45 किलोमीटरवरून आणावा लागत असे.
रोज पाणी सुदधा विकत घ्यावे लागत असें, पाणी येतच नव्हते, ३००रुपयांचे पाणी महिन्यात घ्यावे लागत असे, उन्हाळ्यात कुलर तर स्वप्नंच होतं, त्यामुळे दुसऱ्या मजल्यावर शिडीने गादी रोज नेऊन झोपत असू.
आशा रीतीने आमचं रोजच जीवन होतं. नाही म्हणायला घर मालकाच्या 3 मुलांसोबत मी खेळून वेळ घालवत असे. आईस्क्रीमच तर नावंच घेऊ नका. दुकान सुदधा नव्हते. आता आठवलं तरी काटा येतो अंगावर.
पण अशा ही परिस्थितीत मी कधी तक्रार केली नाही, कोणत्या गोष्टींची मागणी केली नाही, जे आहे त्यात ह्यांची साथ दिली.
नंतर जिथं बदली झाली, तिथं ही खूप काही वेगळी परिस्थिती नव्हती, पण तिथून सतत ७वर्ष दर शनिवारी/रविवार, प्रत्येक सण, वाढदिवस, दिवाळी नवरात्र, अश्या प्रत्येक वेळी आम्ही येत असू.
पण असयुष्यातील "लॉक डाऊन"चा काळ सम्पला नव्हता, ह्या न त्या रीतीनं तो होताच आणि सुरू आहेच.
फक्त आता एवढं आहे, की सगळीकडे परिस्थितीत सुधारणा झाली, आयुष्य प्रवाहित झाले, पण आपण जिथल्या तिथं "लॉक"झालो अस वाटतं.
ह्या विषाणूने आणलेल्या सक्तीच्या "लॉक डाऊन"ने मला माझा भूतकाळ आठवुन गेला, आणि तुमच्याशी तो share करावासा वाटला म्हणून ........हा सगळा प्रपंच ! 
.....सौ. अश्विनी थत्ते