1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : गुरूवार, 27 जानेवारी 2022 (19:25 IST)

माझी शाळा

आज दुपारी इन्दोरच्या एम. जी. रोडनी जात असताना, श्रीकृष्ण टाॅकिज समोरची मराठी माध्यमिक शाळा आठवली. मी जेव्हा जेव्हा तिथून निघते तेव्हा तेव्हा माझ्या शाळेला जरूर वंदन करते. मूळचा हिरवा रंग उडालेला लाकडी दरवाजा, मध्यभागी असलेले विशाल पटांगण, त्याच्या दोन्ही बाजूंना लाकडी खांब, काळ्या दगडांचे व्हरांडे त्यावर कौलारू छत अशी आमची मराठी माध्यमाची शाळा म्हणजे जीवनाचा सौख्याचा काळ. माझ्या सारख्या अनेक मुली त्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी असतील. विज्ञानाच्या फडके बाई, गणिताच्या लोकरेबाई, संगीताच्या वागळे बाई तर खेळाच्या कुळकर्णी बाई अशा अनेक सुयोग्य शिक्षिकांनी मिळून आमचे जीवन आकारले. नीळा स्कर्ट, पांढरे ब्लाऊज, काळे जोडे ते पण प्लास्टिकचे, पांढरे मोजे आणि त्यावर काळी रिबीन नी घट्ट तेलाने माखलेल्या दोन भरगच्च दोन वेण्या असा आमचा गणवेश होता. घरच्या जुन्या कापडाची शिवलेली पिशवी आमची स्कूल बॅग होती तर एल्यूमिनीयमचा डबा आमची शिदोरी. पाण्याची बाटली असणं म्हणजे श्रीमंताच्या पोर असा रूतबा. पांच पैशाच्या चिंचा, बोरं या कच्चा कविठ म्हणजे आमचं पार्टी मटेरियल असायचे आणि त्याचे पैसे जो देईल, तो व्यक्ती आमच्या जीवनातील महान व्यक्ती, श्रीमंत अन् उदारपण. बहुतेक करून प्रत्येकीच्या डब्यात भाजी कमी अन् चटणी लोणचंच जास्त असायचे. आमचा स्पेशल मेनू म्हणजे शिळ्या पोळीचा लाडू या मेजवानी म्हणजे शेव मुरमुरे अर्थात त्यात मुरमुरे अधिक अन् शेवेचा वाटा कमी. सरकारी शाळा, लंगडे डेस्क, फाटकी टाटपट्टी अशा कमी संसाधनात, दोन मैत्रीणी मध्ये एकच पुस्तक, रफ वहीचा अविष्कार घरात असलेल्या जुन्या कागदांची घरी शिवलेली वही, ती पण वर पासून शेवटच्या ओळी पर्यंत उपयोगात आलेली. पेन्सिल हातातून निसटून जाई पर्यंत तिचा वापर आणि हेच हाल खोड रबराचे पण. कंपास पत्र्याचा असायचा अन् तो पण अनुवंंशीक म्हणजे मोठ्या भावंडान कडून विरासत लाभलेला असल्याने त्याचे झाकण कमीच लागायचे मग अशा कंपास चे सामान कसे जपावे हा मोठा यक्ष प्रश्न असे, हो, पण त्याचे समाधान होते, सायकल च्या टयूब चे गोल रिंग. माझ्या घरची आर्थिक स्थिती अतिशय गरिब असल्याने मला अधिकांश वस्तू जुन्या स्वरूपात या भेट स्वरूप म्हणूनच लाभल्या होत्या. असो तो काळच तसा होता. माझा माध्यमिक शालेय जीवनाचा काळ जवळपास 45 वर्ष जुना आहे. 
 
अनेक आंबटगोड आठवणींचे ते स्वर्णीम युग आज ही डोळ्या समोर ती वास्तू पाहताच सजीव होऊन मला भूतकाळात घेऊन गेले. असे म्हणतात की past is always dead परंतु मला कधी कधी भूतकाळात रमायला आवडते. त्या संसारात मनुष्य अलगदपणे शिरतो, मुक्त पणे विचरण करतो, काही काळा साठी वर्तमानाच्या जबाबदारी ह्या अवघड ओझ्या मधून मुक्त होतो. निरागस बाल्य जीवनाचा आनंद, मैत्रीणी चे भांडण अबोला अशा अनेक गोष्टी मनाला तजेला देतात आणि पुन्हा प्रसन्न मनाने आपल्या वर्तमानात प्रवेश करतो. 
 
आज असेच झाले माझ्या शाळेची जुनी वास्तू पाहून. तिथे आता मराठी संकुलाचे निर्माण होत आहे. हळू हळू विलुप्त होणारी माझी शाळा सभोवतालच्या भिंती तेवढीच शिल्लक राहिली आहे. थोड्या दिवसात त्या पण इतिहास जमा होतील आणि राहिल ती फक्त आठवण. मनात कोरलेली शाळा, शिक्षिका त्यांच्या आमचे आयुष्य चांगले घडावे ह्या साठी धडपड, तळमळ अशा अनेक गोष्टी डोळ्या समोर तरंगत असतात. 
 
ज्या शाळेनी आमचं आयुष्य घडवले, आम्हाला सुयोग्य मार्गदर्शन व जीवन मार्ग दिला, माणुसकीचा वारसा दिला  अशा माझ्या लुप्त होणार्या वास्तूला, शाळेला त्रिवार वंदन. जीवन अंतापर्यंत जीवनाचा हा स्वर्णीम काळ सुखाची अनुभूती देत राहिल हा माझा विश्वास आणि माझ्या शाळेतला सविनय वंदन. 
 
सौ. स्वाती दांडेकर
फोन नं. 9425348807