शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: सोमवार, 11 डिसेंबर 2023 (10:16 IST)

ओशो : पुण्यातील आश्रमातून सुरू झालेल्या साम्राज्याच्या उदयाची आणि अस्ताची कहाणी

रेहान फजल
 भारतात असताना लाखो अनुयायी त्यांना ‘ओशो’ म्हणायचे. पण भारतातून बाहेर पडल्यानंतर जगभरात ते ‘आचार्य रजनीश’ आणि ‘भगवान श्री रजनीश’ या नावाने ओळखले जाऊ लागले.
 
‘ओशो’ शब्दाचा अर्थ होतो - स्वत:ला महासागरात विलीन केलेली व्यक्ती.
 
ओशो यांचा मृत्यू होऊन जवळपास 33 वर्षे झाली. पण आजही त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची विक्रमी संख्येत विक्री होते, त्यांचे व्हीडिओ आणि भाषणांचे ऑडिओ आजही सोशल मीडियावर पाहायला आणि ऐकायला मिळतात.
 
ओशो यांच्याबद्दल इतकं कुतुहल, आस्था निर्माण होण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे ते कधीही कोणत्याही परंपरेचा, तात्विक विचारसरणीचा किंवा धर्माचा भाग बनले नाहीत.
 
11 डिसेंबर 1931 रोजी मध्य प्रदेशात ओशो यांचा जन्म झाला. त्याचं खरं नाव ‘चंद्रमोहन जैन’ असं होतं.
 
वसंत जोशी यांनी ‘Osho, The Luminous Rebel : Life Story of a Maverick Mystic’ या मथळ्याचं चरित्र लिहिलं आहे. त्यामध्ये ते लिहितात, “ओशो तसे सामान्य मुलाप्रमाणे वाढले. पण तरीही त्यांच्यामध्ये काहीतरी वेगळे गुण होते. त्यापैकी एक म्हणजे सतत प्रश्न विचारणं आणि प्रयोग करत राहणं. त्यांना लहानपणापासून लोकांमध्ये रस होता. माणसांच्या वागण्यावर त्यांचं बारीक लक्ष होतं.”
 
कॉलेजमधून ओशोंना काढून टाकलं
1951 मध्ये BA पास झाल्यानंतर ओशोंनी मध्य प्रदेशातील जबलपूरमधील हितकरणी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
 
तेव्हा त्यांचा तत्त्वज्ञान विषय शिकवणाऱ्या प्राध्यापकांशी वाद झाला.
 
क्लास सुरू झाला की, ओशो त्यांना सतत प्रश्न विचारायचे. त्याची उत्तरं देऊन प्राध्यापक कंटाळायचे. शेवटी सिलॅबसही पूर्ण व्हायचा नाही.
 
वसंत जोशी लिहितात, “या प्रकारणामुळे प्राध्यापक खूप वैतागले होते. त्यामुळे त्यांनी कॉलेजच्या प्राचार्यांना सांगितलं की, या कॉलेजमध्ये एकतर मी राहीन किंवा चंद्रमोहन राहील. प्राचार्यांनी चंद्रमोहनला ऑफिसमधून बोलावलं आणि त्यांना कॉलेज सोडून जायला सांगितलं.
 
“प्राचार्य म्हणाले यात तुझा काहीच दोष नाही. पण या मुद्द्यावरून महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापकाने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी त्यांची इच्छा नव्हती. शेवटी चंद्रमोहन यांनी एका अटीवर महाविद्यालय सोडण्याचा निर्णय घेतला. ती म्हणजे त्याला दुसऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून द्यावा."
 
पण चंद्रमोहन त्यांच्या प्रश्न विचारण्याचा कारणांवरून एवढा बदनाम झाला होता की, त्याला अनेक कॉलेजने स्वीकारण्यास नकार दिला. मोठ्या कष्टाने त्याला DN जैन कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला.
 
तरुणपणात चंद्रमोहन नेहमी डोकेदुखीची तक्रार करत असत. एकदा तर त्यांची डोकेदुखी एवढी तीव्र झाली की त्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या इतर भावांनी चंद्रमोहनच्या वडिलांना बोलावलं. जास्त अभ्यासामुळे रजनीशला डोकेदुखीचा त्रास होत असल्याचं त्यांच्या वडिलांचं मत होतं.
 
प्राध्यापकाची नोकरी सोडली आणि बनले अध्यात्मिक गुरू
शिक्षण पूर्ण झाल्यावर रजनीश यांनी 1957 मध्ये रायपूर येथील संस्कृत विद्यापीठात प्राध्यापक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली.
 
तसचं, 1960 मध्ये ते जबलपूर विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक झाले. त्यावेळी ते एक उत्तम शिक्षक मानले जायचे.
 
याच दरम्यान त्यांनी भारतभर दौरे केले. राजकारण, धर्म आणि लैंगिक विषयांवर वादग्रस्त व्याख्याने देण्यास सुरुवात केली.
 
काही दिवसांनी त्यांनी प्राध्यापक पदाचा राजीनामा दिला आणि ते पूर्णवेळ 'गुरू' बनले.
 
1969 मध्ये त्यांनी मुंबईत मुख्यालय स्थापन केले.
 
एक वर्षापूर्वी त्यांना भेटलेल्या माता योग लक्ष्मी त्यांच्या मुख्य सहायक झाल्या.
 
यादरम्यान ओशोंची भेट क्रिस्टीना वुल्फ या ब्रिटिश महिलेशी झाली. ओशोंनी त्या महिलेला 'मा योग विवेक' असं नाव दिलं.
 
मूळ कल्पनांमुळे प्रसिद्धी
रजनीश यांनी सुरुवातीपासूनच जुन्या धार्मिक श्रद्धा आणि कर्मकांडांच्या विरोधात आवाज उठवला.
 
आपले धर्म हे आध्यात्मिक ज्ञानाऐवजी लोकांमध्ये विभाजनाचे साधन बनले आहेत, असं ओशो यांना वाटायचं. आताच्या धर्मांनी नवचैतन्य गमावले आहे, असं ओशो सांगायचे.
 
धर्म आणि राजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांचा एकमेव उद्देश लोकांना नियंत्रित करणे आहे, असं ओशोंनी सांगितलं.
 
पाश्चिमात्य तत्त्वज्ञान आणि सिग्मंड फ्रॉईड यांचे मनोविश्लेषण (Psychoanalysis) यांचा अद्भुत समन्वय त्यांनी लोकांसमोर मांडला. तसंच 'लैंगिक मुक्ती'चा उघडपणे पुरस्कार केला.
 
क्लिष्ट संकल्पना सोप्या भाषेत मांडण्याच्या त्यांच्या हातोटीमुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले.
 
त्यांची प्रशंसा करताना सुप्रसिद्ध लेखक खुशवंत सिंग यांनी लिहिलं, "ओशो हे भारतात जन्मलेल्या सर्वात मौलिक विचारवंतांपैकी एक होते. याशिवाय ते सर्वात विचारी, वैज्ञानिक आणि कल्पक व्यक्ती होते."
 
अमेरिकन लेखक टॉम रॉबिन्स यांच्या मते, ओशोंची पुस्तके वाचल्यावर असे वाटते की ते 20 व्या शतकातील सर्वात मोठे आध्यात्मिक गुरू होते.
 
मुलींच्या गळ्यात ओशोंचं चित्र असलेली माळ
आनंद शीला या अनेक वर्षे ओशोंच्या खासगी सचिव होत्या. त्या अगदी लहान वयातच ओशोंच्या संपर्कात आल्या.
 
ओशो प्रत्येक स्त्रीला मातृत्वाचे प्रतिक मानत असल्याने त्यांच्या प्रत्येक स्त्री अनुयायाचे नाव 'मां' असं ठेवायचे.
 
तसंच प्रत्येक पुरुष अनुयायीला 'स्वामी' म्हणून हाक मारायचे.
 
शीला त्यांच्या आत्मचरित्र 'Don't Kill Him : The Story of My Life with Bhagwan Rajneesh' मध्ये लिहितात, "मी त्यांच्या खोलीत पहिल्यांदा प्रवेश केला तेव्हा भगवान रजनीश माझ्याकडे पाहून हसले आणि त्यांचे हात पुढे केले. त्यांनी मला मिठी मारली आणि माझा हात हलकेच धरला. नंतर मी माझे डोके त्यांच्या मांडीवर ठेवले.थोड्या वेळाने मी शांतपणे उठून निघू लागले. तेव्हा त्यांनी मला पुन्हा हाक मारली. ते म्हणाले शीला तू मला उद्या अडीच वाजता भेटायला येशील, असं म्हणत त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला."
 
वादग्रस्त विषयांवर भाषणं
ओशो आपली भाषणे हिंदी किंवा इंग्रजीत देत असत. भाषणादरम्यान अनुयायांना डोळे मिटून राहण्याच्या सूचना दिल्या जायच्या.
 
ओशो हे वादग्रस्त विषयांवरील मतांसाठी प्रसिद्ध होते.
 
विन मॅककॉमॅक त्यांच्या 'The Rajneesh Chronicles' या पुस्तकात लिहितात, "त्यांचे विचार इतके वादग्रस्त होते की त्यांच्यावर बंदी घालण्याबाबत भारतीय संसदेत अनेक वेळा चर्चा झाली. वेगवेगळ्या लोकांना आकर्षित करण्यासाठी ओशोंनी अनेक गोष्टींचा वापर केला.
 
"ते त्यांचे विषय निवडायचे. त्यांचे प्रेक्षक संमिश्र पार्श्वभूमीतून आलेले असायचे. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी सर्व वयोगटातील, धर्माचे, वंशाचे लोक जमायचे. जो कोणी त्यांच्या संपर्कात आला तो एकतर त्यांचा शिष्य किंवा विरोधक बनला.
 
1972 मध्ये भारतात येणारे परदेशी पर्यटक त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागले. त्यांच्या सेक्रेटरी लक्ष्मी त्यांना भेटलेल्या लोकांची निवड अत्यंत काळजीपूर्वक करत असत.
 
आधी या पर्यटकांना 'Dynamic Meditation' मध्ये सहभागी होण्यास सांगितले जायचे. नंतर त्यांना ओशोंना भेटायला परवानगी मिळायची.
 
सुरुवातीला ते रोज सकाळी सहा वाजता मुंबईच्या चौपाटीच्या समुद्रकिनाऱ्यावर भाषण करायचे.
 
रात्री तो कोणत्या ना कोणत्या सभागृहात किंवा घरी लोकांना संबोधित करत.
 
कधी त्यांच्या श्रोत्यांची संख्या 100 ते 120 तर कधी 5 हजार ते 8 हजारपर्यंत वाढायची.
 
पुण्यात बांधला रजनीश आश्रम
काही दिवसांनंतर ओशोंना मुंबईत जगणं कठीण वाटू लागलं.
 
मुंबईच्या मुसळधार पावसामुळे त्यांची अ‍ॅलर्जी आणि दमा दिवसेंदिवस वाढू लागला.
 
त्यांच्या परदेशी अनुयायांनाही मुंबईच्या पावसाळ्याची सवय नव्हती.
 
त्यांना विविध प्रकारचे आजार होऊ लागले. शेवटी ओशोंनी आपल्या सेक्रेटरीला मुंबईजवळ नवीन जागा शोधण्यास सांगितले.
 
बरीच शोधाशोध केल्यानंतर पुण्यात आश्रम बांधण्याचं ठरलं. पुण्याचे हवामान आणि हवामान मुंबईपेक्षा चांगले होते. आश्रमासाठी त्यांनी कोरेगावची निवड केली.
 
आनंद शीला लिहितात, "पुण्याला पोहोचल्यानंतर ओशोंनी स्वतःला लोकांपासून वेगळे करायला सुरुवात केली. सुरुवातीला ते आश्रमाच्या बागेत लोकांना भेटायचे. नंतर लोकांना त्यांना भेटणे खूप कठीण झाले. ते स्वत:भोवती केवळ विश्वासार्ह लोकांना जवळ ठेवायचे. खरंतर ते अनुयायांपेक्षा कामगार शोधत होते.
 
"त्यांनी भारतीयांकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. त्यांच्या आश्रमात बरेच लोक कुतूहल म्हणून येत असल्याचे जेव्हा जाणवू लागले तेव्हा त्यांनी प्रवेश शुल्क वाढवले. एवढंच नाही तर भारतीय अनुयायांना परावृत्त करण्यासाठी इंग्रजीत भाषणे देण्यास सुरुवात केली.
 
लैंगिक संबंधांच्या नैतिकतेकडे दुर्लक्ष
ते नेहमी खुर्चीवर बसायचे आणि त्यांचे शिष्य नेहमी जमिनीवर बसायचे.
 
पुण्यात दररोज सुमारे 5000 लोक त्यांना ऐकण्यासाठी येऊ लागले.
 
पुण्यातील रजनीश आश्रमामुळे पर्यटन वाढू लागले. पुण्याला जगाच्या नकाशावर आणण्यातही आश्रमाचा मोठा वाटा आहे.
 
यामुळे पुण्याची अर्थव्यवस्थेची भरभराट झाली. ओशोंच्या आश्रमात विविध प्रकारचे उपचार दिले जाऊ लागले. पैसा पाण्यासारखा येऊ लागला. या उपचारपद्धतींमध्ये लैंगिक उपचारांना सर्वाधिक महत्त्व मिळू लागले.
 
यामध्ये लैंगिकता कोणताही पूर्वग्रह न ठेवता स्वीकारली जाऊ लागली. लैंगिकतेशी संबंधित नैतिक मुद्दे आणि निर्बंध बाजूला ठेवण्यात आले.
 
आनंद शीला लिहितात, "भगवान रजनीश यांची इच्छा होती की आपण कोणत्याही मत्सराची भावना न बाळगता काम करावे. भारतीय लोकांना या थेरपींमध्ये भाग घेण्याची परवानगी नव्हती. ओशोंनी या थेरपींमध्ये भारतीय लोकांना प्रवेश का नाकारला हे अनेकांना समजलं नाही.
 
“याबाबत अनेक प्रश्न विचारले. त्यांचा युक्तिवाद असा होता की, पाश्चिमात्य लोक हे अत्याचारी जगातून आलेले आहेत. त्यांची जीवनशैली आणि मानसिकता भारतीय लोकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. त्यांना सक्रिय उपचाराची गरज आहे. तर भारतीय लोकांसाठी निष्क्रिय आणि शांत ध्यान पुरेसे आहे."
 
आश्रमातील महिलांना सेक्सचं स्वातंत्र्य
ओशो आपल्या आश्रमात अनुयायांना सेक्स पार्टनर बदलण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन देत असत.
 
ओशोंचे शिष्य टिम गेस्ट त्यांच्या 'My Life In Orange : Growing Up with the Guru' या पुस्तकात लिहितात, "अनेक भारतीय त्यांचे 'संभोगातून समाधी' हे पुस्तक अश्लील पुस्तक मानतात. सेक्सविषयी इतके खुलेपणामुळे लिहिल्याने त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. हे पुस्तक लिहिल्याने, ब्रम्हचर्याचे विचार मानणाऱ्या संत आणि ऋषींचे ओशो शत्रू बनले.
 
"अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्याऱ्या त्यांच्या विचारांना लैंगिक भागीदार बदलण्यासाठी प्रोत्साहन देणारे विचार म्हणून पाहिले गेले. महिलांना लैंगिक स्वैराचार वाढवण्यास प्रवृत्त करण्याचा त्यांचावर आरोपही झाला.
 
अल्पावधीतच पुण्यातील रजनीश आश्रमाचे एकूण क्षेत्रफळ 25 हजार चौरस मीटरपर्यंत वाढले. तेथे एक वैद्यकीय केंद्र बांधले गेले. त्याठिकाणी जगभरातून आणलेले डॉक्टर आणि परिचारिका ठेवण्यात आल्या.
 
आश्रमातील रहिवासी आणि पूर्णवेळ कामगारांना वैद्यकीय सेवा मोफत पुरवण्यात आली.
 
आनंद शीला लिहितात, "आश्रमात नवजात मुलांना ठेवू नये, असं ओशोंना वाटायचं. त्यामुळे महिला संन्याशांना गरोदर होण्यापासून परावृत्त केले जायचे. ओशोंनी आश्रमातील अनेक अधिकाऱ्यांना नसबंदी आणि गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया करण्यास सांगितले होते. तसंच गर्भवती स्त्रीयांना आश्रमात प्रवेश नव्हता.
 
ओशो अनेकदा 'Sexual Reparation' बद्दल बोलत. त्यामुळे आश्रमातील लोक मुक्त लैंगिक जीवन जगत होते. त्यामुळे आश्रमात संसर्गजन्य लैंगिक आजार वाढू लागले.
 
काही संन्यासींनी एका महिन्यात सुमारे नव्वदवेळा लैंगिक संबंध ठेवल्याचं समोर आलं.
 
आनंद शीला लिहितात, "मला आश्चर्य वाटायचे की एवढ्या व्यस्त दिवसानंतरही साधूंना सेक्ससाठी वेळ कसा मिळायचा."
 
परफ्यूम आणि अत्तराची अ‍ॅलर्जी
दरम्यान, ओशोंचे आजार वाढू लागले. त्यांची अ‍ॅलर्जी, दमा आणि पाठदुखीचा त्रास वाढला.
 
त्यांचा मधुमेह वाढल्यावर त्यांनी निवासस्थान सोडलं, भाषणं देणं बंद केलं. त्यांचे डोळे कमकुवत झाले आणि पुस्तक वाचून पुन्हा डोकेदुखी सुरू झाली.
 
आनंद शीला लिहितात, "ओशोंना परफ्यूमची खूप अ‍ॅलर्जी होती. जे लोक परफ्यूम आणि अत्तर लावून यायचे त्यांना त्यांच्या जवळ येऊ नये म्हणून आम्हाला खूप प्रयत्न करावे लागले. सकाळ-संध्याकाळच्या भाषणाआधी प्रत्येक श्रोत्याने परफ्यूम लावलंय की नाही याची तपासणी व्हायची”
 
17 दिवस अमेरिकन तुरुंगात
ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला ओशोंचं पुण्यातून मन भरलं होतं.
 
त्याचवेळी त्यांनी अमेरिकेतील ओरेगॉनमध्ये एक आश्रम बांधण्याची योजना आखली. ज्यामध्ये हजारो लोक एकत्र राहू शकतील.
 
31 मे 1981 रोजी ते मुंबईहून आपल्या नवीन आश्रमाकडे रवाना झाले.
 
विमानातील सर्व प्रथम श्रेणीच्या जागा त्यांच्या सहकाऱ्यांसाठी बुक केल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचे आश्रमातील अडीच हजार रहिवासीही अमेरिकेत गेले.
 
त्यात प्रसिद्ध चित्रपट अभिनेते विनोद खन्ना यांचाही समावेश होता. दरम्यान, ओशोंनी 93 रोल्स रॉयस कार विकत घेतल्या. पण त्यानंतर त्यांचे वाईट दिवस सुरू झाले आणि त्यांचे अमेरिकन स्वप्न पत्त्यांसारखे कोसळू लागले.
 
स्थलांतर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर अमेरिकेत कारवाई करण्यात आली. ओशोंना 17 दिवस अमेरिकन तुरुंगात राहावे लागले.
 
तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी अमेरिका सोडण्याचे मान्य केले. यानंतर त्यांनी अनेक देशांमध्ये आश्रय घेण्याचा प्रयत्न केला पण एकापाठोपाठ एक अनेक देशांनी त्याला स्वीकारण्यास नकार दिला.
 
शेवटी त्यांना भारतात परत यावं लागलं.
 
19 जानेवारी 1990 रोजी वयाच्या अवघ्या 58 व्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला.
 
त्यांची समाधी पुण्यातील 'लाओ त्झू हाऊस' या त्यांच्या निवासस्थानी बांधण्यात आली होती.
 
त्या समाधीस्थळावर लिहिलं आहे, "ओशो, जो कधीही जन्मला नाही, कधीही मरण पावला नाही. त्यांनी 11 डिसेंबर 1931 ते 19 जानेवारी 1990 च्या दरम्यान या पृथ्वीला भेट दिली. "