बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : शुक्रवार, 12 जुलै 2024 (16:16 IST)

पावनखिंड : शिवाजी महाराज पन्हाळ्याचा वेढा फोडून विशाळगडावर कसे पोहोचले?

Panhala fort
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांनी महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील लोकांना प्रेरित केलं आहे.
 
अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानावर हल्ला, आग्र्याहून सुटका अशा वेगवेगळ्या प्रसंगांनी शिवाजी महाराजांच्या धैर्याची प्रचिती येते तसेच ते रोमांचकही आहेत.
 
यापैकीच एक महत्त्वाची घटना म्हणजे पन्हाळा वेढ्यातून महाराजांची सुटका आणि पावनखिंडीतली लढाई.
 
या लढाईमुळे शिवाजी महाराजांच्या बुद्धीचातुर्याची कल्पना तसंच त्यांच्याबरोबर असलेल्या धैर्यवान मावळ्यांची प्रचिती त्यांच्या शत्रूला झाली.
 
1660 या वर्षीच्या जुलै महिन्यात 12 आणि 13 तारखेला ही ऐतिहासिक घटना घडली.
 
12 जुलै 1660 रोजी शिवाजी महाराज पन्हाळ्यावरुन निसटले आणि 13 जुलै रोजी विशाळगडावर पोहोचले.
 
अफजलखानाचा वध प्रतापगडाच्या पायथ्याशी झाला. 10 नोव्हेंबर 1659 रोजी अफजलखानाला ठार मारल्यावर विजापूरच्या सैन्याची दाणादाण उडाली तर इकडे शिवाजी महाराजांच्या सैन्याला मोठी लूट प्राप्त झाली.
 
नेतोजी पालकरांच्या नेतृत्वाखाली शिवाजी महारांजांनी आदिलशाहीच्या प्रांतात आणि कोकणात मोठी मजल मारायला सुरुवात केली. अफजलखानाच्य मृत्यूनंतर अगदी काही दिवसांच्या आत शिवाजी महाराजांनी कोल्हापूर, पन्हाळा आणि कोकणात मोठा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला.
 
शिवाजी महाराजांकडून हा प्रदेश आणि लूट परत मिळवण्यासाठी आलेल्या आदिलशाहीने पाठवलेल्या रुस्तुम-ए-जमान आणि अफजलखानाचा मुलगा फाजलखान यांचाही पराभव शिवाजी महाराजांनी केला.
 
हे सगळं यश अगदी कमी काळात मिळालं होतं.
अफजलखानाच्या पराभवानंतर आदिलशाहाच्या साम्राज्याला एका पाठोपाठ एक जबर धक्के देण्याचं काम महाराजांनी केलं होतं.
 
साहजिकच शिवाजी महाराजांना थांबवून आपला गेलेला मुलुख परत मिळवण्याचा प्रयत्न आदिलशहा करणार होता. यातूनच पन्हाळगडाच्या वेढ्याचं प्रकरण उद्भवलं.
 
पन्हाळा किल्ला
भारतीय लष्करी इतिहासात पन्हाळा किल्ल्याला विशेष महत्त्व आहे ते त्याच्या स्थानामुळे.
 
सध्या कोल्हापूर जिल्ह्यात असणारा हा किल्ला स्थापत्य, लष्करी, इतिहास, सामरिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. या गडाचा इतिहास शिलाहार आणि यादवांच्या काळापासून सुरू होतो.
 
पन्हाळा किल्ल्याचं पठार समुद्रसपाटीपासून साधारणतः तीन हजार फूट उंचीवर आहे. या पठाराचा परिघ सुमारे 4.5 मैल इतका आहे.
 
पन्हाळ्यावर पराशर ऋषींचं वास्तव्य होतं. त्यांनी पन्हाळ्याचा उल्लेख पन्नागालय असा केला आहे. त्यानंतर ग्रँट डफ यांनी पन्नाला असा उल्लेख या किल्ल्याचा केला आहे.
 
तसंच अनेक इतिहास आणि भूगोलतज्ज्ञांनी या किल्ल्याचं नाव पर्णाल असं लिहिलं आहे. यावरुन आजचं पन्हाळा नाव आलं असेल हे निश्चित.
 
पन्हाळ्याची भक्कम तटबंदी, उंचावरचं स्थान, पाण्याचा चांगला साठा, राहण्यास इतर गडांच्या तुलनेत विपुल जागा, आक्रमण झाल्यास आघातशोषक म्हणून उपयोगी पडणारा पावनगडासारखा जोडकिल्ला ही किल्ल्याची सर्वांत चांगली जमेची बाजू होती.
 
पन्हाळ्याला वेढा
शिवाजी महाराजांनी आदिलशाही परिसरातली ठाणी जिंकायला सुरुवात झाल्यावर विजापूरमधून प्रतिक्रिया येणं प्राप्तच होतं.
 
आदिलशहाने शिवाजी महाराजांवर हल्ला करण्यासाठी सिद्दी जौहरची नेमणूक केली होती. त्याच्याबरोबर अफजलखानाचा मुलगा फाजलखान, रुस्तुम- ए-जमान आणि इतर सरदारांना पाठवलं. सिद्दीच्या फौजेत मराठा सरदारही होते.
 
शिवाजी महाराजांनी जिंकून घेतलेली ठाणी पुन्हा जिंकून घेत सिद्दी पुढे सरकू लागला. अशा वेळेस शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ल्यावर थांबण्याचा निर्णय घेतला.
 
हा काळा साधारणतः मार्च महिन्याचा होता. पुढे तोंडावर असलेला पावसाळा लक्षात घेता सिद्दीने वेढा दिल्यास थांबण्याचं योग्य केंद्र म्हणून त्यांन पन्हाळ्याची निवड केली असावी.
 
गजापूरचा रणसंग्राम हे पुस्तक लिहिणाऱ्या शंतनू परांजपे यांनी याबद्दल सविस्तर मांडणी केली आहे. पन्हाळ्याच्या निवडीमागचे कारण लिहिताना परांजपे लिहितात, "पन्हाळा हा किल्ला महाराजांनी नुकताच जिंकून घेतला होता आणि भरपूर दारुगोळा आणि दाणागोटा भरुन युद्धासाठी म्हणून त्याला अनायसे तयार ठेवले होते. पन्हाळा हा किल्ला स्वराज्याच्या सीमेवर असल्याने एकप्रकारे हे युद्ध आदिलशाही मुलखातच खेळले जाणार होते. त्यामुळे स्वराज्याच्या रयतेला तोशीस आजिबात दिली जाणार नव्हती."
 
वा पडलाच तर गड झुंजवणे अशक्य नव्हते आणि पुढे जर निघायची वेळ आली तर पश्चिमेकडे विशाळगड आणि रांगणा हे किल्ले होतेच, असंही परांजपे लिहितात.
 
एकेक ठाणी जिंकत सिद्दी जौहर पन्हाळ्याजवळ आला आणि त्याने किल्ल्याला वेढा दिला तसंच 40 किमी अंतरावरील विशाळगड किल्ल्यालाही वेढा देऊन ठेवला होता. त्यामुळे महाराजांची सर्व बाजूने कोंडी झाली.
 
सिद्दी जौहरने राजापूरच्या इंग्रजांकडून तोफ आणि दारुगोळाही मिळवला त्यामुळे त्याची बाजू अधिकच भक्कम झाली होती.
 
शाहिस्तेखान आणि वेढा फोडण्याचे प्रयत्न
एकीकडे शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकून पडले तर दुसरीकडे नवं संकट राज्यावर घोंघावू लागलं.
 
शाहिस्तेखान किंवा शाईस्ताखान नावाने ओळखला जाणारा मुघल सरदार हा औरंगजेबाची आई मुमताज महलचा भाऊ होताच तसेच जहाँगीर बादशहाची पत्नी नूरजहाँ ही शाहिस्तेखानाच्या वडिलांची बहीण होती.
 
औरंगजेब मुघल साम्राज्याच्या बादशहा पदावर आल्यावर मुघल आणि आदिलशहा यांच्यात करार झाला.
 
पूर्वीच्या निजामशाहीतील अहमदनगरचा परिसर मुघलांच्या ताब्यात आला. शाहिस्तेखान त्यावेळेस दख्खनच्या सुभेदारीवर होता.
 
शिवाजी महाराज पन्हाळा आणि कोल्हापूर परिसरात अडकल्यावर त्याने नगरमधून पुण्यावर स्वारी करायला सुरुवात केली. अनेक ठाणी जिंकूनही घेतली त्यामुळे महाराजांच्या राज्यावर मोठं संकट निर्माण झालं.
 
एकीकडे शाहिस्तेखान आणि दुसरीकडे सिद्दी जौहर अशा संकटात अडकलेल्या शिवाजी महाराजांना सोडवण्यासाठी नेताजी पालकर स्वतः सिद्दी हिलाल, सिद्दी वाहवाह यांना घेऊन महाराजांची सूटका करायला आले पण त्यांना यश आलं नाही. सिद्दी जौहरने पन्हाळ्याच्या जवळच झालेल्या लढाईत त्यांना माघारी परतण्यास भाग पाडलं.
 
वेढा फोडला
अशाप्रकारे शिवाजी महाराज साधारणतः चार महिने पन्हाळ्यावर अडकून पडले होते.
 
जुलै महिन्यातला जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे आता वेढ्यातून बाहेर पडण्यास पोषक स्थिती निर्माण झाली होती.
 
सुरुवातीला महाराजांनी आपण स्वतः स्वाधीन होत आहोत असं नाटक आपल्या वकिलांकरवी वठवलं.
 
मात्र 12 जुलै 1660 रोजी भरपावसाळ्यात रात्री किल्ला सोडण्याचा निर्णय घेतला.
 
त्यांनी पन्हाळ्याच्या पश्चिमेस साधारणतः 60 किमी अंतरावर असलेल्या खेळणा म्हणजेच विशाळगडाकडे जाण्याचा निर्णय घेतला.
 
धो धो कोसळणारा पाऊस, त्यात आपल्या शरण येण्याच्या नाटकामुळे वेढ्यात तयार झाले ढिलाई याचा त्यांना फायदा निश्चितपणे उठवता आला.
 
पन्हाळ्याच्या पश्चिमेस असणाऱ्य़ा एका वाटेने ते 600 मावळ्यांसह बाहेर पडले. तरीही या मोहिमेची चाहूल सिद्दी जौहरला लागलीच.
 
सिद्दी जौहरने त्यांना थांबवण्यासाठी मोठं दळ पाठवलं. सुरुवातीला त्यांनी शिवा काशीद या महाराजांसारख्याच दिसणाऱ्या व्यक्तीस पकडले. मात्र हे खरे महाराज नाहीत हे लक्षात आल्यावर त्यांनी त्वेषाने पाठलाग सुरू केला.
 
शिवाजी महाराजांनी विशाळगडावर जाऊ नये यासाठी वाटेत शृंगारपूरचे सुर्वे नेमले होतेच.
 
हे अडथळे तसेच एकीकडे कोसळणारी अस्मानी आणि पाठलाग करणारी सुलतानी असं संकट पार करत त्यांना विशाळगडावर पोहोचायचं होतं.
 
अखेर सिद्दीच्या सैन्याला रोखण्यासाठी एके ठिकाणी त्यांना थांबावंच लागलं. पांढरपाणी नावाच्या जागेवरील खिंडीत बाजी प्रभू देशपांडे यांचे हिरडस मावळातील आणि इतर सैन्य सिद्दी जौहरच्या सैन्याला रोखण्य़ासाठी थांबले आणि तिकडे शिवाजी महाराज विशाळगडाच्या दिशेने गेले.
 
या लढाईत बाजी प्रभू देशपांडे यांनी आपल्या असीम शौर्याचं दर्शन घडवलं. पण त्यांना यश आलं नाही.
 
बाजी प्रभू देशपांडे आणि त्यांचे भाऊ फुलाजी प्रभू देशपांडे यांचे या लढाईत प्राण गेले. त्यांची विशाळगडावर समाधी बांधण्यात आली.
 
25 ऑगस्ट 1660 रोजी पन्हाळा आणि पावनगड हे किल्ले पुन्हा आदिलशहाच्या ताब्यात गेले.