बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: गुरूवार, 8 जून 2023 (19:42 IST)

हे लोक 10-10 वर्षं न धुतलेले कपडे घालतात, पण का?

denim jeans
मतिल्डा वेलीन
 
  ब्रायन साबो आणि त्यांची टीम अशा काही जीन्सचे फोटा पाहात आहेत ज्या दीर्घकाळापासून धुतलेल्याच नाहीयेत. त्या जीन्समधल्या काही विटलेल्या, फाटलेल्या तर काही पुन्हा शिवलेल्या आहेत.
 
यातली जी जीन्स चांगली असेल तिचं कौतुक केलं जातं. यातल्या काही जीन्स फाटल्यात पण तरी तुम्हाला त्या पाहून आश्चर्य वाटेल.
 
काही जीन्स तर इतक्या बारीक विरल्यात की कळणारही नाही. उलट त्या निळ्या जीन्ससोबत त्या विरण्याची एक सुंदर नक्षी तयार झालीये.
 
‘इंडिगो इन्विटेशनल’ या स्पर्धेत जगभरातले लोक भाग घेतात. या स्पर्धेचे नियमही आगळे आहेत. यातल्या स्पर्धकांना आपली जीन्स वर्षभर घालावी लागते. ही स्पर्धा फेडेड डेनिमसाठी असते.
 
जीन्स वापरून वापरून विटलेली हवी, पण त्या विटण्याची किंवा विरण्याची अशी दिलखेचक नक्षी तयार झाली पाहिजे की परीक्षक खूश होतील.
 
जीन्स (डेनिम) फेड (विटण्याची) एक सर्वात परिणामकारक क्लुप्ती म्हणजे ती न धुता तशीच ठेवणं. त्यामुळे या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांची हीच रणनिती असते – ‘लो वॉश डेनिम’.
 
दहा वर्षं जीन्स न धुता वापरली
सर्वात मोठ्या डेनिमच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या लीवाईसच्या सीईओपर्यंत सगळे वापरतात.
 
हो, जीन्स न धुता वापरण्याची पद्धत तुम्हाला कदाचित विचित्र वाटेल पण प्रसिद्ध कंपनी लिवाईसचे मुख्याधिकारी चिप बर्गही असंच काहीसं करतात.
 
2014 साली बोलताना बर्ग म्हणाले की त्यांनी जी जीन्स घातली होती ती त्यांनी कधीच धुतली नव्हती. लोकांना हे ऐकून फारच आश्चर्य वाटलं होतं.
 
यानंतर पाच वर्षांनी, 2019 साली, त्यांनी अमेरिकन न्यूज चॅनल सीएनएनला सांगितलं की त्यांनी आपली जीन्स कधीच धुतलेली नाही आणि न धुता त्यांनी ती जीन्स तब्बल 10 वर्षं वापरली आहे.
 
जीन्स (डेनिम) न धुण्याची प्रथा
ब्रायन साबू यांना कपडे कमी वेळा धुण्याची सवय लागली ते त्यांनी आधी एक जीन्सपॅन्ट घेतली तेव्हा.
 
त्यांनी आपला देश कॅनडा ते यूरोप असा सहा महिन्यांचा फिरत फिरत प्रवास केला आणि त्या काळात त्यांनी एकदाही आपली जीन्स धुतली नाही.
 
त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितली की, “त्या जीन्सला फारच घाण वास येत होता. पण ती वास येणारी जीन्स माझी ओळख बनली होती.”
 
पण या वास येणाऱ्या जीन्सने त्यांच्या आणि त्यांच्या होणाऱ्या पत्नीच्या नात्यालाही आकार दिला.
 
ते म्हणतात, “आम्ही राहायचो तिथे की जीन्स फरशीवर पडलेली असायची. पूर्ण खोलीत तिचा वास पसरलेला असायचा आणि माझं सुदैव की माझ्या पत्नीला त्या जीन्सपेक्षा माझ्यात जास्त रस होता. आमचं नातं टिकलं.”
 
ब्रायन म्हणतात की त्यांच्या अंदाजानुसार गेल्या पाच वर्षांत इंडिगो इन्विटेशनल स्पर्धेत भाग घेणाऱ्या दहा पैकी नऊ स्पर्धक आपली जीन्स पॅन्ट कमीत कमी 150 ते 200 वेळा घालतात.
 
वॉशिंग मशीन वापरण्याऐवजी हे लोक आपले कपडे स्वच्छ करायला दुसऱ्या पद्धती वापरतात. उदाहरणार्थ कपडे अल्ट्राव्हायोलेट किरणांसमोर ठेवणं. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर उन्हात वाळत टाकणं, म्हणजे त्यातली दुर्गंधी निघून जाईल.
 
याखेरीज रात्री खुल्या हवेत कपडे वाळत टाकल्यानेही त्यातली दुर्गंधी निघून जाते. अर्थात ब्रायन कधी कधी वॉशिंग मशीन वापरावं लागतं हे मान्य करतात. ते म्हणतात, “माझ्या बायकोला त्यातून दुर्गंधी यायला लागली की मला सांगते आणि आम्ही लगेच कपडे धुवायला जातो.”
 
फक्त डेनिम किंवा जीन्स घालणारे लोकच आपले कपडे कमी धुतात असं नाहीये.
 
2019 साली डिझायनर स्टेला मकार्थी यांनी ‘द गार्डियन’ या यूकेच्या वर्तमानपत्राला दिलेल्या इंटरव्ह्यूला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं की त्या आपले कपडे वारंवार धूत नाहीत. मग काय, ही बातमी मीडियात वणव्यासारखी पसरली.
 
स्टेला आपल्या मुलाखतीत म्हणाल्या होत्या की त्यांनी हा गुण लंडनच्या अनेक प्रसिद्ध टेलर्ससोबत काम करताना शिकला.
 
त्या म्हणतात, “आपल्या आयुष्यात एक नियम हवा की जर कोणत्या गोष्टीला स्वच्छतेची गरज नसेल तर आपण ती स्वच्छ करायला नको.”
 
त्या पुढे सांगतात. “मी रोज माझी ब्रा बदलत नाही आणि एकदा घातलेले कपडे लगेच वॉशिंग मशीनमध्ये टाकत नाही. मी स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या नियमांचं पालन करते पण उगाचच कपडे ड्रायक्लीन केले पाहिजेत असंही मला वाटत नाही.”
 
न धुता 100 दिवस घातले कपडे
काही लोक पर्यावरण आणि वीजेचं वाढतं बिल या कारणांमुळे आपल्या कपडे धुण्याच्या सवयी बदलत आहेत.
 
मॅक बिशप कपड्यांची कंपनी ‘वूल अँड प्रिन्स’ चे संस्थापक आहेत. त्यांनी आपल्या ब्रँडच्या प्रमोशनच्या वेळेस त्यांनी ‘कमीत कमी श्रमात आरामात धुता येण्यासारखे कपडे’ या सारख्या धोरणांवर आपल्या जाहिराती केंद्रित केल्या. मुळातच कपडे धुण्याचा कंटाळा असणाऱ्या पुरुष ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या जाहिराती बनवल्या होत्या.
 
महिलांनाच शतकानुशतकं कपडे धुण्याचं काम करावं लागतं आणि गेली अनेक वर्षं कपडे धुण्याच्या बाबतीतल्या जाहिराती या महिलांनाच उद्देशून होत्या त्यामुळे या कंपनीच्या संस्थापकांना अंदाज होता की काम कमी करण्यासाठी कपडे धुवू नका अशा जाहिरातींचा महिलांना आकर्षित करण्यासाठी उपयोग होणार नाही.
 
पण बिशप यांना वाटत होतं की पर्यावरणाच्या कारणासाठी महिला कमी वेळा कपडे धुण्याची कल्पना स्वीकारतील. त्यांनी केलेल्या रिसर्चमधून हेच समोर आलं.
 
वूल अँड प्रिन्स हा ब्रँड आपले वूल (लोकरी) कपडे विकताना 100 दिवस एकच कपडा वापरा या चँलेंजसह मेरिनो लोकरीचे कपडे विकतो.
 
या कंपनीच्या रेबिका एबी यांच्यामते या आव्हानाचा सर्वात मोठा फायदा कमी वेळा कपडे धुवायला लागणं हा आहे. मेरिनो वापरणाऱ्यांची ती आता एक खासियत बनली आहे.
 
अमेरिकेत राहाणाऱ्या चेल्सी हॅरी या ब्रँडच्या ग्राहक आहेत. त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की त्या अशा घरात वाढल्यात जिथे वापरानंतर प्रत्येक गोष्ट धुतली जाते. टॉवेल आणि पायजमाही रोज धुतला जातो. पण एका उन्हाळ्याच्या सुट्टीत त्या आपल्या आजीकडे राहायला गेल्या होत्या तेव्हा त्यांच्या आजीचे रात्री घातलेला पायजमा तक्क्याखाली ठेवून दिला आणि रात्री परत घालायला शिकवलं.
 
यानंतर त्या आपल्या पतीला भेटल्या जे सहसा कपडे धूत नाहीत. मग कोव्हिड साथीच्या काळात त्यांनी पदयात्रा सुरू केली. जोवर पूर्णपणे फिरण्यावर बंधन आली नव्हती तोवर त्या पदयात्रा करत होत्या.
 
त्या म्हणतात की जर तुम्ही तंबूत राहात असाल तर दिवसभर चालूनही तुम्ही आंघोळ करू शकत नाही कारण आंघोळीला जागाच नसते.
 
ट्रेकिंग किंवा पर्वतारोहण करणारे लोक एका विशिष्ट प्रकारच्या अंतर्वस्त्रांचा वापर करतात. हे अंतर्वस्त्र अनेक दिवस घालता येऊ शकतात आणि लवकर धुवून सुकवता येतात.
 
अशा प्रकारचे कपडे घालून हॅरी यांना जाणवलं की त्या अनेक दिवस पायी चालू शकतात आणि तरीही त्यांना कंफर्टेबल वाटतं.
 
त्या म्हणतात, “मग मी विचार केला की मी माझ्या रोजच्या आयुष्यात असं करू नये. मग मी तसं करायला सुरूवात केली.
 
दुर्गंधी रोखण्याचं आव्हान
वेगवेगळ्या लोकरी आणि धाग्यांनी बनलेले कपडे घातले की त्यांना स्वतःच्या शरीराचा वेगळा गंध जाणवतो. त्या म्हणतात की इतर कपड्यांमध्ये असं गंध कधीच जाणवत नाही. अगदी मध्यपूर्वेतल्या उष्ण भागांमध्ये प्रवास करताना त्यांना आपल्या कपड्यांचा वास येत नाही.
 
चेल्सी पण ब्रायन साबू यांच्यासारखंच कपडे पूर्ण धूत नाहीत. कधी त्या रात्रभर मोकळ्या हवेत वाळत टाकतात किंवा काखेत स्प्रे मारून दुर्गंधी थांबवता येण्यासारखे उपाय अवलंबतात.
 
त्या म्हणतात, “मला संध्याकाळी माझा लोकरी ड्रेस, लेगिन्स मोकळ्या हवेत वाळत घालायला आवडतं. मी ते कपडे खिडकीपाशी टांगते, माझी अंतर्वस्त्रही टांगते आणि मग सकाळी ते पुन्हा घालते.”
 
लीड्स यूनिव्हर्सिटीत सस्टेनेबल (पर्यावरणवादी) फॅशनचे प्रा. मार्क सुमनर म्हणतात की “कपड्यांसाठी सर्वाl वाईट गोष्ट म्हणजे ते धुणं.”
 
वॉशिंग मशीन आणि टिकाऊपणा
सुमनर म्हणतात की कपडे धुतल्याने फाटू शकतात, आटू शकतात, त्यांचा रंग जाऊ शकतो.
 
घरगुती कपड्यांचे मायक्रो फायबर्स समुद्रात कसे जमा होऊ शकतात याचा अभ्यास सुमनर आपले सहकारी मार्क टेलर यांच्यासह करत आहेत.
 
वॉशिंग मशीनमध्ये कमी वेळा कपडे धुणं पर्यावरणासाठी चांगलं असलं तरी वॉशिंग मशीन पूर्णपणे वापरातून बाद करावेत असं त्यांना वाटत नाही.
 
ते बीबीसीशी बोलताना म्हणतात, “कपडे धुतल्याने पृथ्वीचा अंत होईल अशी भीती लोकांच्या मनात बसावी असं आम्हाला वाटत नाही. फक्त एक संतुलन राखलं पाहिजे, त्यासाठीच हे प्रयत्न आहेत.”
 
एक्झिमासारख्या रोगांना बळी पडलेल्या लोकांनी आपले कपडे रोज धुणं आवश्यक असतं. अशा रोगांमध्ये आपल्या त्वचेत असलेले बॅक्टेरिया कपड्यांमध्ये पसरतात आणि त्यामुळे आणखी खाज येते तसंच त्वचेची आग होते.
 
कपड्यांवरून कोणी थट्टा करू नये, ते लाजिरवाणे असू नयेत किंवा त्यातून दुर्गंध येऊ नये ही गोष्टही लोकांच्या आत्मविश्वासासाठी गरजेची आहे.
 
सुमनर म्हणतात की, “पांढरे कपडे वेगळे धुवायचे, रंगीत वेगळे. कॉटनचे वेगळे आणि सिंथेटिक वेगळे असं सगळेच करतात. मला विचाराल तर माझ्याकडे सुती आणि सिंथेटिक कपडे वेगवेगळे धुण्याइतका वेळ नाहीये. मला वाटतं जर तुमच्या कपड्यांमधून दुर्गंध येत नसेल तर उगाच धूत बसू नका.”
 
ते पुढे म्हणतात, “दुसरं म्हणजे जेव्हा तुम्ही कपडे धुवायला जाल तेव्हा काय करायचं आहे हे स्पष्ट असू द्या. म्हणजे कपडे स्वच्छ होतील पण सर्वात प्रभावी मार्गाने.”
 
डिटर्जंट न वापरता कमी वेळात कपडे धुण्याचा सल्ला देतात.
 
ते म्हणतात की, “कपडे धुण्यात आयुष्यातला मोठा काळ जातो, इतका वेळ प्रत्येकाकडे नसतो.”
 
चेल्सी म्हणतात की, “मी टिकाऊपणा, पर्यावरण अशा गोष्टींचा विचार करते पण माझा किती वेळ जातोय यावरही विचार करते.”
 
ब्रायन म्हणतात, “मला वेळ कमी मिळतो कपडे धुवायला. मला इतरही कामं असतात, मला माझ्या कुत्र्याला फिरायला घेऊन जायचं असतं.”
Published By -Smita Joshi