सोमवार, 28 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By BBC|
Last Modified रविवार, 2 ऑक्टोबर 2022 (11:09 IST)

लालबहादूर शास्त्री यांनी अयुब खान यांना धोबीपछाड दिली होती तेव्हा...

lal bahadur shastri
26 सप्टेंबर 1965 रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर हजारो लोकांना संबोधित करताना भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री अधिक उत्साहात होते. शास्त्री म्हणाले होते, "सदर अयुबने दिल्लीला पोहोचणार असल्याचं जाहीर केलं होतं. तो इतका मोठा माणूस आहे, लाहीम शाहीम. त्यांना दिल्लीला येण्याचा त्रास का दिला पाहिजे, असा प्रश्न मला पडला. मी विचार केला आपणच लाहोरला जाऊन त्यांचं स्वागत करू."
 
खरंतर हे लालबहादूर शास्त्री नव्हे तर 1965 च्या युद्धानंतरचा त्यांचा आत्मविश्वास बोलत होता. हे तेच शास्त्री होते ज्यांची कमी उंची आणि आवाजाची अयूब खान यांनी खिल्ली उडवली होती. अयूब खान लोकांचं आकलन त्यांच्या आचरणाऐवजी बाह्यरुपावरून करीत असत.
 
शास्त्रींना कमकुवत मानलं
पाकिस्तानातले भारताचे माजी उच्चायुक्त शंकर वाजपेयी सांगतात, "अयुब खान यांना भारत कमकुवत आहे असं वाटायचं. त्यांना वाटायचं कसं लढावं हे कुणाला कळत नाही आणि अतिशय कमजोर आहे. अयुब दिल्लीला येणार होते पण नेहरुंच्या निधनानंतर त्यांनी भेट रद्द केली. आता कुणाशी चर्चा करायची असं ते म्हणाले. तेव्हा शास्त्री म्हणाले तुम्ही येऊ नका आम्ही येऊ. ते कैरोला गेले होते. त्यावेळी परतताना ते कराचीत एक दिवस थांबले. शास्त्रींना विमानतळावर सोडण्यासाठी राष्ट्राध्यक्ष अयुब खान स्वतः आले होते याचा मी प्रत्यक्षदर्शी होतो. शास्त्रींसोबत चर्चा करून काही उपयोग नाही असा इशारा आपल्या साथीदारांना करत असताना मी ऐकलं होतं."
 
एवढंच नव्हे तर काश्मीरवरील हल्ल्यानंतर भारत आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडणार नाही, असा अंदाज त्यांनी वर्तवला आणि ही अयुब यांची सर्वांत मोठी चूक होती.
 
सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चचे श्रीनाथ राघवन म्हणतात, "त्याठिकाणी अतिआत्मविश्वास होता. एकतर ते स्वत: जनरल होते. नेहरूंच्या निधनानंतर नवे पंतप्रधान येतील आणि विशेषतः 1962 नंतर युद्धाचा सामना करण्याची क्षमता त्यांच्याकडे नसेल, असं त्यांना वाटलं असावं. दुसरं मुख्य कारण परराष्ट्र धोरण सल्लागार झुल्फिकार अली भुट्टो यांनी त्यांना सल्ला दिला की, यावेळी आपण भारतावर दबाव आणला तर काश्मीरचा प्रश्न आपल्या बाजूने सोडवता येईल."
 
ब्रिगेडियर ए. एच. चौधरी यांनी सप्टेंबर 1965 मध्ये आपल्या पुस्तकात लिहिलं, "अनेक वर्षांच्या लढाईनंतर एका माजी कॅबिनेट मंत्र्याने अयुब खान यांना विचारलं होतं की, मोहिमेपूर्वी त्यांनी यासंदर्भातील फायदे आणि नुकसान याविषयी कुणाशी चर्चा केली नव्हती का? त्यावर त्यांनी वैतागून उत्तर दिलं, 'वारंवार मला माझ्या कमतरतेची आठवण करून देऊ नका."
 
जेव्हा अयुब यांनी युद्धाचं कारण सांगितलं नाही
प्रसिद्ध पत्रकार कुलदीप नय्यर यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, लढाई संपल्यानंतर ते पाकिस्तानात गेले होते. ते म्हणाले, "तू हे काय केलेस? असा प्रश्न मी अयुब यांना विचारला. तुम्हाला पूर्ण कल्पना आहे की शेवटी तुम्ही जिंकू शकत नाही. ते म्हणाले, मला हा प्रश्न विचारू नका. जेव्हा तुम्ही भुट्टो यांना भेटाल तेव्हा त्यांना हा प्रश्न विचारा."
 
यानंतर कुलदीप नय्यर यांनी भुट्टो यांची भेट घेतली. ते सांगतात, "मी त्यांना विचारलं की, प्रत्येक जण सांगत आहे ही भुट्टो यांची लढाई होती. त्यांनी उत्तर दिले, मी यापासून पळ काढणार नाही. मला वाटले हीच पराभूत करण्याची योग्य संधी आहे. कारण नंतर एवढ्या ऑर्डनंस फॅक्टरी येतील की आम्हाला तुम्हाला हरवणं कठीण गेलं असतं. दुसरं मला वाटलं जेव्हा आम्ही आमचे लोक पाठवू तेव्हा खोऱ्यातील लोक आमच्या समर्थनार्थ उभे राहतील. पण मी चुकीचा होतो."
 
अयुब यांना युद्ध करण्यासाठी भाग पाडल्यानंतर संयुक्त राष्ट्रांत युद्धबंदी स्वीकारणे ही भुट्टोंसाठी मोठी लाजिरवाणी गोष्ट असायला हवी होती. पण या प्रसंगी त्यांनी केलेल्या भाषणामुळे तटस्थ देशांना निराश केले असेल.
 
'भारतीय लष्कराने लाहोरच्या दिशेने जाण्यास सुरुवात केली'
अयुब यांच्यावर पुस्तक लिहिणारे अल्ताफ गौहर लिहितात, "दिल्लीतील पाकिस्तानचे उच्चायुक्त अर्शद हुसेन यांनी तुर्कस्तानच्या दूतावासामार्फत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाला एक कोड मेसेज पाठवला की, भारत 6 सप्टेंबरला पाकिस्तानवर हल्ला करणार आहे. नियमानुसार, परदेशातील राजदूतांकडून आलेला प्रत्येक कोड संदेश राष्ट्राध्यक्षांना दाखवावा लागतो. पण तो संदेश अयुब यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला नाही. हे उघड झालं की परराष्ट्र सचिव अजीज अहमद यांनी हा संदेश दाबला कारण त्यांच्या दृष्टीने अर्शद हुसेन अस्वस्थ राहणारे व्यक्ती होते. त्यामुळे ते विनाकारण काळजी करत असावेत."
 
अयुब यांना भारतीय हल्ल्याची बातमी 6 सप्टेंबरला पहाटे 4 वाजता कळाली. पाकिस्तानच्या हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याने त्यांना सांगितलं की, भारतीय सैन्य लाहोरच्या दिशेने येत आहे.
 
दुसरीकडे, युद्धानंतर लालबहादूर शास्त्री यांची प्रतिमा बरीच चांगली झाली. विशेषतः त्या परिस्थितीत जेव्हा देश नेहरूंच्या निधनानंतर सावरण्याचा प्रयत्न करत होता आणि शास्त्रींना भारत आणि त्यांच्याच पक्षात तात्पुरती व्यवस्था म्हणून पाहिलं जात होतं.
 
शास्त्रींचा मोठा निर्णय
वेस्टर्न कमांडचे प्रमुख जनरल हरबक्ष सिंह यांनी लिहिलं, "युद्धाचा सर्वांत मोठा निर्णय (लाहोरच्या दिशेने पुढे जाणे) सर्वांत छोट्या उंचीच्या व्यक्तीने घेतला."
 
या पूर्ण युद्धात शास्त्री विरोधी पक्षाच्या नेत्यांना आणि भारतातील सर्व जनतेला विश्वासात घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते.
 
त्यांचे पुत्र अनिल शास्त्री सांगतात, "युद्धादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी शास्त्रींना धमकी दिली होती की, जर तुम्ही पाकिस्तानविरुद्धची युद्ध थांबवलं नाही तर आम्ही तुम्हाला पीएल 480 अंतर्गत लाल गहू पाठवणे बंद करू. त्यावेळी आपल्या देशात फारसा गहू पीकत नव्हता. शास्त्रीजी अतिशय चिडलेले होते कारण ते स्वाभिमानी होते."
 
आम्ही आठवड्यातून एक वेळचं जेवण करणार नाही असं आवाहन त्याचवेळी शास्त्रींनी देशातील जनतेला केलं. यामुळे अमेरिकेतून येणाऱ्या गव्हाची कमतरता भरून काढण्याचा मार्ग शोधला.
 
अनिल शास्त्री सांगतात, "त्या आवाहनापूर्वी त्यांनी माझी आई ललिता शास्त्री यांना सांगितलं की, आज संध्याकाळी जेवण बनवण्याची गरज नाही. तू असं करू शकतेस का? मी उद्या देशातील जनतेला एका वेळचं जेवण करू नका असं आवाहन करणार आहे. माझी मुलं उपाशी राहू शकतात की नाही हे मला पाहायचं आहे. आपण एक वेळच्या अन्नाशिवाय राहू शकतो हे त्यांनी आपल्या घरात पाहिलं आणि नंतर त्यांनी देशातील जनतेला आवाहन केलं."
 
पाकिस्तानसोबत युद्ध करण्यासाठी भारताने किती हत्यारं वापरली?
कच्छ ते ताश्कंद पुस्तक लिहिणारे फारूख बाजवा यांच्यानुसार, भारत सरकारच्या काही विभागांनी चांगलं काम केलं तर काहींनी ठिकठाक. संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय चांगल्या पद्धतीने चालवलं गेलं, पण दोन्ही विभागांनी असामान्य काम केलं असं म्हटलं तर चुकीचं ठरेल.
 
भारतीय परराष्ट्र मंत्रालयावर टीका करण्यात आली. या युद्धादरम्यान जगातील फार कमी देशांनी उघडपणे भारताला पाठिंबा दिला. यामुळे परराष्ट्र मंत्रालयावर प्रामुख्याने टीका झाली.
 
लष्करावर भाष्य करणाऱ्या अभ्यासकांनीही भारताच्या धोरणांवर टीका केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, पूर्व पाकिस्तानवर हल्ला करून भारत पाकिस्तानवर अधिक दबाव टाकू शकत होता, पण कदाचित त्या भागात दबाव टाकला तर चीन सहभाही होईल या भीतीने भारतानं असं केलं नाही.
 
युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात युद्ध थांबवण्याचा दबाव होता. त्यावेळी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी लष्करप्रमुख जनरल चौधरी यांना विचारलं की युद्ध चालू ठेवण्यात भारताचा फायदा आहे का? त्यांनी युद्ध थांबवण्याचा सल्ला दिला. पण तोपर्यंत भारताने केवळ 14 ट्क्केच शस्त्रास्त्र वापरली होती.

Published By - Priya Dixit