1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शनिवार, 17 सप्टेंबर 2022 (08:53 IST)

मराठवाडा मुक्तिदिन: बाबासाहेब परांजपे कोण होते आणि त्यांचे सशस्त्र स्वातंत्र्य चळवळीत योगदान काय?

देशाचं भविष्य हे मुलंच घडवतात, त्यामुळे येणारी पिढी घडवण्यासाठी एक विज्ञानाचा पदवीधर असलेला तरुण शिक्षक बनतो. देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून शांततेच्या मार्गाने सत्याग्रह करू लागतो, पण जेव्हा परिस्थिती खडतर होते तेव्हा तोच शिक्षक सशस्त्र क्रांतिकारक बनतो. स्वतः बॉम्ब बनवायला शिकून नंतर त्याचे धडे इतर तरुणांना देतो आणि बघता-बघता पूर्ण एका आंदोलनाचाच प्रमुख शस्त्रपुरवठादार बनतो.
 
तुम्ही म्हणाल की एखाद्या चित्रपटाला शोभेल असं हे कथानक दिसतंय. पण असं प्रत्यक्षात थोडंच घडलं असणार? पण असं घडलंय.
 
अहो कुठे म्हणून काय विचारता? महाराष्ट्रातच. त्या क्रांतिकारकाचे नाव आहे बाबासाहेब परांजपे.
 
स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा लढा लढला गेला. हैदराबाद संस्थानात असलेला मराठवाडा 17 सप्टेंबर 1948 रोजी स्वतंत्र झाला.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला पण हैदराबाद संस्थानचे निजाम मीर उस्मान अली यांनी भारतात सामील होण्यास नकार दिला.
 
भारत स्वतंत्र्य होण्याआधी देशात पाचशेहून अधिक स्वतंत्र संस्थानं होती. काँग्रेस नेते आणि स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नांनी एक एक संस्थान देशात विलीन होऊ लागले होते.
 
स्वातंत्र्यानंतर जुनागढ, काश्मीर आणि हैदराबाद तीनच संस्थानं भारतात विलीन झाली नव्हती.
 
निजाम मीर उस्मान अलीचे हैदराबाद संस्थान हे देशातील सर्वांत मोठे संस्थान होते. निजाम हा जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक होता.
 
भारत स्वतंत्र झाल्यानंतर हैदराबाद संस्थान भारतात सामील न करता स्वतंत्र ठेवावे यासाठी त्यांनी खूप वर्षं आधीपासून खटपटी सुरू केल्या होत्या.
त्याचा प्रतिकार करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ आणि त्यांच्या असंख्य साथीदारांनी आपल्या प्राणांची बाजी लावली होती. या निजामशाहीचा विरोध सशस्त्र मार्गांनी तसेच अहिंसक मार्गाने करण्यात आला होता.
 
निजामाकडे सैन्य तर होतेच पण त्याचबरोबर त्याने रझाकारांच्या फौजेला पाठबळ दिले होते. हे रझाकार मराठवाड्यातील जनतेवर अनन्वित अत्याचार करत, त्यांचा सामना अहिंसेच्या मार्गाने होणार नाही तर त्यासाठी सशस्त्र प्रतिकारच करावा लागेल अशी स्वातंत्र्यसैनिकांनी भूमिका घेतली होती.
 
या सशस्त्र लढ्यात स्वामी रामानंदांचे सहकारी बाबासाहेब परांजपे अग्रगण्य होते. बाबासाहेब परांजपे हे मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या सशस्त्र लढ्याचे जणू सूत्रधारच होते.
 
बाबासाहेब परांजपे हे या मुक्तिलढ्याचे अनभिषिक्त शस्त्रागार प्रमुख किंवा तोफखाना प्रमुखच होते.
 
कारण पूर्वीच्या काळी जसे तोफखान्याचे प्रमुख हे संपूर्ण युद्ध पालटून टाकण्याची क्षमता बाळगत, शत्रूला हैराण करून सोडत त्याच प्रमाणे बाबासाहेब परांजपेंनी संघटित केलेल्या क्रांतिकारकांनी निजामाच्या सैन्याला सळो पळो की पळो करून सोडले होते.
 
जसे शस्त्रागार प्रमुख ठरवत असत की कोणती शस्त्रे कुणाकडे असावीत, कधी ती पोहोचावावीत. युद्धाच्या काळात शस्त्रसाठा कमी पडू नये म्हणून काय खबरदारी घ्यावी या सगळ्या गोष्टींची जबाबदारी बाबासाहेब परांजपेंनी आपल्या खांद्यावर घेतली होती.
 
कोण होते बाबासाहेब परांजपे?
लातूर येथील बाबासाहेब परांजपे फाउंडेशनचे सचिव भाऊसाहेब उमाटे यांनी आपल्या संकेतस्थळावर बाबासाहेब परांजपे यांची माहिती लिहिली आहे.
 
उमाटे यांनी 'शौर्यगाथा हैदराबादच्या मुक्तिसंग्राम'ची हे पुस्तक देखील लिहिले आहे. उमाटे आपल्या संकेतस्थळावर लिहितात, बाबासाहेब परांजपे यांचे नाव रामचंद्र गोविंद परांजपे असे होते. त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये बीएसस्सीचे शिक्षण घेतले होते.
त्यांचे मोठे भाऊ विनायक परांजपे हे स्वामी रामानंद तीर्थ यांचे परिचित होते. स्वामी रामानंदांनी सोलापूर सोडले आणि ते 1929 ला हिप्परग्याच्या (जिल्हा उस्मानाबाद) शाळेत आले. तेव्हा त्यांच्यासोबत बाबासाहेब परांजपे देखील हिप्परग्याला आले. तेव्हापासून लोक त्यांना बाबासाहेब याच नावाने ओळखू लागले.
 
1935 ला स्वामी रामानंदांनी हिप्परगा सोडले आणि बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे योगेश्वरी विद्यालयाची स्थापना केली. त्यावेळी बाबासाहेब परांजपे देखील स्वामीजींसोबत अंबाजोगाई येथे आले.
 
राष्ट्रीय शाळा हा स्वातंत्र्यसैनिकांचा अड्डा
त्या काळात सर्व शाळा या निजामाच्या आशिर्वादानेच चालत. त्यामुळे या ठिकाणी स्वातंत्र्य किंवा राष्ट्रभक्ती अशा गोष्टींचा उल्लेख करण्यास देखील बंदी होती.
 
त्यामुळे जर आपल्याला भावी पिढी घडवायची असेल तर राष्ट्रभक्तीचे संस्कार द्यावे लागतील असे हेरून मराठवाड्यात राष्ट्रीय शाळांची स्थापना होऊ लागली होती. राष्ट्रीय भावनेनं प्रेरित होऊन चालवल्या जाणाऱ्या शाळांना राष्ट्रीय शाळा म्हटले जात असे.
निजामाच्या लेखी या बागी मदरसा म्हणजेच बंडखोरांच्या शाळा होत्या. या बंडखोरांच्या शाळांनीच स्वातंत्र्य लढ्यासाठी अनेकांना प्रेरित केले. अनेक भूमिगत स्वातंत्र्य सैनिक लपण्यासाठी या ठिकाणी येत असत. तर आंदोलनाची दिशा काय असावी हे ठरवण्याचे, चिंतनाचे प्रमुख ठिकाण देखील या शाळा असत.
 
हिप्परग्याची शाळा ही या श्रृंखलेतील पहिली शाळा होती. पुढे स्वामीजींनी अंबाजोगाईमध्ये शाळा सुरू केली. सेलू या ठिकाणी देखील नूतन विद्यामंदिराची स्थापना याच विचारांनी झाली. हे समविचारी लोक पुढे 'महाराष्ट्र परिषदे'त एकत्र आले.
 
बाबासाहेब परांजपे यांचे वक्तृत्व अमोघ होते आणि त्यांच्या विचार, वाणी आणि वर्तणुकीची भुरळ विद्यार्थीच काय शिक्षकांना देखील पडत होती. मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी जे काही शक्य होईल ते करण्याच्या हेतूने परांजपे संघटनात्मक कामात रस घेत असत. विद्यार्थ्यांना प्रेरित करत असत. तिथे होणाऱ्या बैठकांमध्ये सक्रियपणे भाग असत.
 
निजामाविरोधात संघर्ष करण्यासाठी महाराष्ट्र परिषदेची स्थापना 1937 मध्ये झाली.
 
मराठवाड्यातील राजकारणाचा श्रीगणेशा महाराष्ट्र परिषदेपासून झाला असे म्हटले तर वावगं ठरणार नाही.
 
पुढे याच परिषदेतील नेते स्टेट काँग्रेसमध्ये गेले आणि लढ्याला व्यापक स्वरूप आले. स्टेट काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर लगेच त्यावर निजामाने बंदी आणली. त्यामुळे भूमिगत चळवळीला महत्त्व आले.
 
सत्याग्रहात सहभाग
1938 मध्ये महात्मा गांधींच्या नेतृत्वात संपूर्ण देशात ठिकठिकाणी सत्याग्रह होत होता. हैदराबाद संस्थान देखील याला अपवाद नव्हते. पण देशात कॉंग्रेसला बंदी नव्हती पण मराठवाड्यात काँग्रेसला बंदी होती.
 
आपण काँग्रेससोबत आहोत हे सांगणं किंवा काँग्रेसवरील बंदी उठवा हे म्हणणं, काँग्रेसचा ध्वज हाती घेणं या गोष्टींमुळे देखील निजामाचा रोष ओढवून घेण्याची शक्यता होती. पण या सत्याग्रहात हजारो जणांनी सहभाग घेतला होता आणि स्वखुशीने तुरुंगवास पत्करला.
मराठवाडा आणि हैदराबादचा मुक्तिसंग्राम या पुस्तकात अनंत भालेराव यांनी सांगितले आहे की 'निजामाच्या गुप्तहेर खात्याच्या अहवालानुसार हा आकडा 535 इतका आहे.'
 
मराठवाड्यातील विविध जिल्हातून सत्याग्रही सामील झाले होते. बाबासाहेब परांजपे यांचे वास्तव्य बीड जिल्ह्यात असल्यामुळे त्यांनी या आंदोलनाला अनेक सत्याग्रही पुरवले. ते ज्या शाळेतील शिक्षक होते त्या योगेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी सहभाग घेतला होता.
 
1942 पर्यंत सलग सहा वर्षं बाबासाहेब परांजपे हे सत्याग्रही आणि संघटक म्हणून काम करत होते. स्वामी रामानंद तीर्थ आणि त्यांच्या पुढाकाराने इतर ठिकाणी देखील राष्ट्रीय शाळा सुरू झाल्या होत्या त्या ठिकाणी आंदोलनाचे लोण पसरवण्याचे काम करत होते.
 
त्यांच्या या सक्रियतेची नोंद निजामाने घेतली आणि परांजपेंना स्थानबद्ध केले. योगेश्वरी विद्यालयाशी निगडित 11 शिक्षक आणि दोन विद्यार्थ्यांना नोटीस बजावण्यात आली. यामध्ये परांजपे देखील होते. त्यांना इतर कुठेही काम मिळणार नाही याची काळजी देखील निजामाने घेतली.
 
जर या लोकांना कामावर घेतले तर संस्थांची परवानगी रद्द करण्यात येईल असे देखील बजावण्यात आले. हाती असलेली शिक्षकाची नोकरी गेल्यानंतर परांजपेंनी पूर्णवेळ स्वातंत्र्यलढ्यालाच वाहून घेतले.
 
सशस्त्र लढ्याला सुरुवात
एकीकडे भारताचे स्वातंत्र्य जवळ येऊ लागले तेव्हा मराठवाडा हा निजामाच्या आदेशावरून चालत असलेल्या रझाकारांच्या अत्याचाराला बळी पडू लागला होता. या रझाकारांच्या सेनेचा प्रमुख कासिम रिझवी हा होता.
 
कासिम रिझवीच्या अत्याचाराला तोंड देण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी हैदराबादच्या सीमांवर कॅम्पस् उभे केले होते. या शिबिरांमध्ये स्वातंत्र्य सैनिक राहत. निजामाच्या सैन्याला हैदराबाद संस्थानची सीमा सोडता येत नव्हती.
 
तेव्हा हैदराबाद सीमांवर असलेल्या या कॅम्पस् मधील स्वातंत्र्य सैनिक वेळ पडेल तेव्हा संस्थानाच्या हद्दीत येऊन रझाकारांना चोख प्रत्युत्तर देत असत.
 
सरहद्दीवरील कॅम्पातील स्वातंत्र्य सैनिक निजामाच्या राज्यात जाऊन त्यांना नामोहरम करत असत. संस्थानाच्या मालकीची झाडं तोडणे, पोलीस ठाणी पेटवणे, रेल्वे रूळ उखडणे असे काम स्वातंत्र्य सैनिक करत असत. यातील सर्वांत कठीण काम होते ते म्हणजे रझाकारांच्या तळांवर हल्ले करणे. कारण रझाकार हे प्रशिक्षित होते आणि त्यांच्याकडे शस्त्रे देखील असायची.
 
बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण
1942 च्या आंदोलनानंतर हळुहळू चळवळीचे स्वरूप हे सत्याग्रहापासून सशस्त्र प्रतिकारापर्यंत पोहोचले होते.
 
सशस्त्र प्रतिकार कसा करावा यासाठी स्वातंत्र्य सैनिकांची एक बैठक मनमाड या ठिकाणी झाली. त्यात शिरूभाऊ लिमये आणि छोटूभाई पुराणिक हे दोन नेते सामील झाले होते. हे नेते भूमिगत चळवळ कशी करावी हे सांगण्यासाठीच आले होते. शिरूभाऊ हे बॉम्ब बनवण्याचे तज्ज्ञ होते. परांजपे यांनी त्यांच्याकडून ते कसब आत्मसात करुन घेतले. विज्ञान शाखेचे पदवीधर असल्याचा फायदा त्यांना निश्चितच या कामी झाला.
 
अनंत भालेराव लिहितात की 'बाबासाहेब परांजपे यांच्या शब्दांतून देशभक्तीचे स्फुल्लिंग बाहेर पडत असे पण ते जेव्हा एकदा सशस्त्र लढ्यात आले तेव्हा त्यांच्या तोंडातून रायफली, काडतुसे, जिलेटिन्स, डिटोनेटर्स इत्यादी शब्दच बाहेर पडत असत.'
 
त्यांनी सोलापूर आणि पुणे या दोन ठिकाणी बॉम्ब बनवण्याचा कारखाना सुरू केला. त्यांनी इतर तरुणांना देखील बॉम्ब बनवणं शिकवलं. फक्त हे लोक इतक्यावरच थांबले नाहीत तर वेगवेगळ्या क्लृप्त्या काढून ते बंदुकी -रायफल्स विकत घेत असत किंवा मिळवत असत.
 
एकदा मनमाडच्या स्टेशनवर हमालाकडून 303 रायफल्सच्या काडतुसांचा बॉक्स त्यांच्या सहकाऱ्यांनी पळवला होता.
 
बाबासाहेबांचे सहकारी शेषराव वाघमारे यांनी तर एका लष्करी अधिकाऱ्याशी मैत्री करून त्याचा विश्वास संपादित केला आणि त्यांची सहानुभूती मिळवून स्टेनगन्स घेतल्या.
 
शस्त्रास्त्रे मिळवण्यासाठी मुंबई, मनमाड अशी केंद्रं होती. बाबासाहेब परांजपे यांचे लहान भाऊ महादेवराव परांजपे बॅंकेचे मॅनेजर होते ते देखील शस्त्रं पुरवण्याच्या कामी त्यांची मदत करत असत.
 
परांजपेंनी सुरू केली बॉम्बची 'फॅक्ट्री'
बाबासाहेब परांजपेंनी बळवंत नागणे या तरुणाला बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण दिले होते. तसेच ते लष्करातील अधिकाऱ्यांना लाच देऊन, कधी सहानुभूती घेऊन हॅंडग्रॅनेड विकत घेत असत. त्याची किंमत जास्त असते म्हणून त्यांनी गावठी बॉम्ब घेण्यास सुरुवात केली होती.
 
त्या गावठी बॉम्बचा एकदा स्फोट झाला तर त्यांनंतर पुण्यात त्या ठिकाणी पोलिसांचे छापे पडले होते. पुण्यातील ही जागा बंद करावी लागली.
 
स्वस्त बॉम्ब बनवण्यासाठी नागणे यांनी अनेक युक्त्या शोधल्या होत्या. ते स्वतः ती पावडर तयार करत असत. पुण्यातील केंद्राचे काम बंद पडल्यावर नागणे आणि त्यांचे सहकारी सोलापूर केंद्रात बॉम्ब बनवत. ते रोज 50 बॉम्ब बनवत असत. सोलापूर केंद्राने नंतर त्यांची क्षमता वाढून दिवसाला 150-200 बॉम्ब इतकी झाली होती.
 
या केंद्राने स्वातंत्र्यलढ्याला 6,000 बॉम्ब पुरवल्याची नोंद अनंत भालेरावांनी केली आहे.
 
केवळ बॉम्ब तयार करणेच नव्हे तर नियोजनबद्ध पद्धतीने विविध केंद्रावर तो पोहोचवून क्रांतिकारकांच्या हाती ते पडतील याची जबाबदारी देखील परांजपे यांनी केली होती.
 
सरदार वल्लभभाईं पटेलांच्या आदेशानंतर 13 सप्टेंबरला पोलीस अॅक्शन सुरू झाली आणि भारताच्या लष्कराने निजामाच्या सैन्याला आणि रझाकारांना पाणी पाजले. ज्या-ज्या ठिकाणी हे भारताचे लष्कर पोहोचत होते त्या ठिकाणी मराठवाड्यातील सामान्य जनतेंकडून त्यांचे मनापासून स्वागत केले जात होते.
स्वामी रामानंद तीर्थांच्या नेतृत्वात चाललेल्या या लढ्यात गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे, अनंत भालेराव आणि त्यांच्यासह कित्येकांनी अक्षरशः आपल्या जीवाची बाजी लावली होती.
 
पण याहून अधिक मोठी कामगिरी या स्वातंत्र्यसैनिकांनी केली होती. ती म्हणजे मराठवाड्यातील जनतेचे स्फुल्लिंग त्यांनी चेतवले होते. त्यातून सामान्य लोकांमध्ये त्यांनी स्वातंत्र्याची आस सर्वांना निर्माण झाली होती. त्यामुळेच जागोजागी लष्कराचे स्वागत झाले. 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा स्वतंत्र झाला.
 
स्वातंत्र्यानंतर बाबासाहेब परांजपे बनले खासदार
1950 मधून बाबासाहेब परांजपे आणि गोविंदभाई श्रॉफ हे काँग्रेसमधून बाहेर पडले. स्वतंत्र भारताची पहिली सार्वत्रिक निवडणूक 1952 ला झाली.
 
बाबासाहेब परांजपे हे बीड मतदारसंघातून पीपल्स डेमोक्रेटिक फ्रंट या साम्यवादी विचारधारेच्या पार्टीकडून निवडणूक लढले. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला होता. स्वातंत्र्यानंतरचे उर्वरित आयुष्य त्यांनी जनसामान्याच्या सेवेसाठीच वेचले. 26 एप्रिल 1991 ला त्यांनी लातूर येथे अखेरचा श्वास घेतला.