रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: सोमवार, 2 जानेवारी 2023 (19:15 IST)

भारतरत्न पुरस्कार कोणाला दिला जातो? पुरस्कारानंतर त्यांना काय सुविधा मिळतात?

bharat ratn
भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. एखाद्या क्षेत्रात असाधारण आणि सर्वोच्च कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो.राजकारण, कला, साहित्य आणि विज्ञान क्षेत्रातील विचारवंत, शास्त्रज्ञ, उद्योगपती, लेखक आणि समाजसेवक यांना या पुरस्काराने गौरवण्यात येते.
या पुरस्काराचे पाहिले मानकरी होते, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी, माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि शास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर व्यंकट रमण.
 
तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते 2 जानेवारी 1954 रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
 
तेव्हापासून आजअखेर आपापल्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी अनेकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
 
1954 पर्यंत केवळ जिवंत व्यक्तींनाच हा पुरस्कार प्रदान केला जात होता. मात्र 1955 मध्ये मरणोत्तर 'भारतरत्न' देण्याची तरतूद करण्यात आली.
 
ज्या व्यक्तींना 'भारतरत्न' प्रदान करण्यात येतो त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा भारताच्या राजपत्राद्वारे केली जाते. दरवर्षी 26 जानेवारीला हा पुरस्कार प्रदान केला जातो.
भारतरत्नसाठी निवड प्रक्रियाभारतरत्न पुरस्काराची निवड प्रक्रिया ही पद्म पुरस्कारांपेक्षा वेगळी आहे. यात भारताचे पंतप्रधान भारतरत्नसाठी राष्ट्रपतींकडे त्या व्यक्तीच्या नावाची शिफारस करतात.
 
भारतरत्नसाठी कोणत्याही औपचारिक शिफारशीची आवश्यकता नसते.
 
कोणत्याही व्यक्तीची जात, व्यवसाय, पद किंवा लिंग या आधारावर भेदभाव न करता त्यांचं योगदान पाहून हा पुरस्कार देण्यात येतो.
 
वर्षभरात फक्त तीनच भारतरत्न देता येता. त्याचबरोबर भारतरत्न दरवर्षी द्यायलाच हवा अशीही कोणती अट नसते.
 
आतापर्यंत एकूण 48 जणांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. शेवटचा पुरस्कार 2019 मध्ये देण्यात आला होता.
 
2019 मध्ये, समाजसेवेच्या क्षेत्रात नानाजी देशमुख (मरणोत्तर), कला क्षेत्रातील डॉ. भूपेन हजारिका (मरणोत्तर) आणि सार्वजनिक क्षेत्रात भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न देऊन गौरविण्यात आलं होतं.
 
भारतरत्न पुरस्काराचं स्वरूप कसं असतं?
'भारतरत्न' पुरस्कार देताना भारत सरकारकडून एक प्रमाणपत्र आणि पदक देण्यात येतं. या पुरस्कारात पैसे दिले जात नाहीत.
 
मात्र हा पुरस्कार मिळवणाऱ्या व्यक्तींना काही शासकीय सुविधांचा लाभ मिळतो. जसं की, भारतरत्न प्राप्तकर्त्यांना रेल्वेकडून मोफत प्रवासाची सुविधा मिळते.
 
'भारतरत्न' प्राप्तकर्त्यांना महत्त्वाच्या सरकारी कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाते.
 
त्यांना सरकारच्या वॉरंट ऑफ प्रेसिडन्सी स्थान मिळते. ज्यांना 'भारतरत्न' मिळतो त्यांना प्रोटोकॉलनुसार, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, माजी राष्ट्रपती, उपपंतप्रधान, सरन्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष, कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री, माजी पंतप्रधान आणि संसदेच्या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेत्यांनंतर स्थान मिळते.
 
सरकारी कार्यक्रमांमध्ये प्राधान्य देण्यासाठी 'वॉरंट ऑफ प्रेसिडेन्सी'चा वापर केला जातो.
 
तसेच राज्य सरकारही 'भारतरत्न' पुरस्कार विजेत्यांना त्यांच्या राज्यात सुविधा देते.
 
मात्र पुरस्कार प्राप्तकर्त्यांना त्यांच्या नावाआधी किंवा नावानंतर हा सन्मान लावता नाही. पण बायोडाटा, लेटरहेड किंवा व्हिजिटिंग कार्ड यांसारख्या ठिकाणी ते 'राष्ट्रपती द्वारा भारतरत्नने सम्मानित' किंवा 'भारतरत्न प्राप्तकर्ता' असं लिहू शकतात.
 
मेडलवर काय चिन्हांकित केलेलं असतं ?
या मेडलवर तांब्यापासून बनलेलं पिंपळाचं पान असतं. आणि या पानात प्लॅटिनम पासून बनलेला सूर्य असतो. पानाच्या शिराही प्लॅटिनमच्या असतात. या पानाखाली हिंदीमध्ये चांदीने भारतरत्न लिहिलेलं असतं.
 
मेडलच्या मागच्या बाजूस अशोक स्तंभ असून त्याच्या खाली 'सत्यमेव जयते' लिहिलेलं असतं.
 
भारतरत्नशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी
'भारतरत्न' हा जिवंतपणी किंवा मरणोत्तर दिला जातो.
 
2013 मध्ये पहिल्यांदाच क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च योगदान/कामगिरीसाठी भारतरत्न देण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
यानंतर 2014 मध्ये क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला या पुरस्काराने गौरविण्यात आलं.
 
हा पुरस्कार विदेशी लोकांनाही दिला जाऊ शकतो. 1980 मध्ये मदर तेरेसा यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात आलं होतं. स्वातंत्र्यसैनिक खान अब्दुल गफार खान (स्वातंत्र्यापूर्वी भारतात जन्मलेले आणि नंतर पाकिस्तानात गेलेले) आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
 
एका वर्षात जास्तीत जास्त तीन 'भारतरत्न' प्रदान करता येतात.
 
या पुरस्कारांतर्गत प्रमाणपत्र आणि मेडल देण्यात येतं. कोणताही निधी दिला जात नाही.
 
1956, 1959, 1960, 1964, 1965, 1967, 1968-70, 1972-74, 1977-79, 1981, 1982, 1984-86, 1993-96, 2000, 2002-08, 2010-13, 2020-22 या वर्षांमध्ये भारतरत्न दिला गेला नाही.
 
या पुरस्काराचं दोनदा निलंबन करण्यात आलं. त्यानंतर हे पुरस्कार पुन्हा सुरू झाले.
 
आजवर ज्या व्यक्तींना 'भारतरत्न'ने सन्मानित करण्यात आलं आहे, त्यांची यादी तुम्ही इथं पाहू शकता .
पद्म पुरस्काराचे तीन प्रकार आहेत पद्मविभूषण - असाधारण आणि विशेष सेवेसाठी पद्मभूषण - उच्च दर्जाच्या विशेष सेवेसाठी पद्मश्री - विशिष्ट सेवेसाठी
 
या पुरस्कारांची सुरुवातही 1954 साली करण्यात आली. त्यावेळी या पुरस्कारांना प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी आणि तृतीय श्रेणी असं संबोधलं जायचं. पण 1995 मध्ये या श्रेणी वगळून त्यांना पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशी नावे देण्यात आली.
 
गृह मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, 1978, 1979 आणि 1993 ते 1997 ही वर्ष वगळता, दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त हे पुरस्कार जाहीर केले जातात.
 
कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा, वैद्यक, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक बांधकाम, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग क्षेत्राशी निगडित 'विशिष्ट कार्य' केल्याबद्दल हे पुरस्कार प्रदान केले जातात.
 
कोणत्याही व्यक्तीची जात, व्यवसाय, पद किंवा लिंग या आधारावर भेदभाव न करता त्यांचं योगदान पाहून हा पुरस्कार प्रदान केला जातो.
 
दरवर्षी 1 मे ते 15 सप्टेंबर या कालावधीत पद्म पुरस्कारांसाठी नामांकने मागवली जातात.
 
सर्व नामांकन पद्म पुरस्कार समितीसमोर सादर करण्यात येतात. पंतप्रधान दरवर्षी या समितीची स्थापना करतात. समितीच्या शिफारशी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवल्या जातात.
 
राज्य आणि केंद्र सरकारची मंत्रालये, विभाग, मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल, संसद सदस्य, भारतरत्न आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते, प्रख्यात संस्था, गैर सरकारी व्यक्ती, संस्था आदी पद्म पुरस्कारांसाठी नावांची शिफारस करू शकतात.
 
मरणोत्तर आणि परदेशी लोकांना दिले जाणारे पुरस्कार वगळता, एका वर्षात एकूण 120 पेक्षा जास्त पद्म पुरस्कार देता येत नाहीत.
 
पद्म पुरस्कारात राष्ट्रपतींची स्वाक्षरी आणि शिक्का असलेलं प्रमाणपत्र आणि बॅज दिला जातो.
 
तसेच पुरस्कार विजेत्याची थोडक्यात माहिती देणार्‍या स्मरणिकेचं प्रकाशनही समारंभाच्या दिवशी केलं जातं.
 
पुरस्कार विजेत्यांना बॅजची एक प्रतिकृती देखील प्रदान केली जाते. कोणत्याही कार्यक्रमात किंवा राज्य समारंभात ते हा बॅज वापरू शकतात.
 
या पुरस्कारात कोणतीही रक्कम दिली जात नाही. तसेच रेल्वे प्रवास किंवा हवाई प्रवासाच्या सुविधाही दिल्या जात नाहीत.
 
भारत सरकारच्या पद्म पुरस्कार वेबसाइटनुसार, आजअखेर 325 पद्मविभूषण, 1294 पद्मभूषण आणि 3330 पद्मश्री पुरस्कार देण्यात आले आहेत.
 
Published By- Priya Dixit