शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 07
  4. »
  5. नवरात्रौत्सव
Written By वेबदुनिया|

शक्ती उपासनेचे नवरात्र

पूज्य पांडूरंगशास्त्री आठवले

WDWD
नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना करण्याचे दिवस होय. जगात कोणतेही नैतिक मूल्य केवळ चांगले असल्यामुळे टिकत नाही, तर त्याचे अस्तित्व टिकविण्यासाठी त्याच्या मागे संत-महंतांची तपस्या असणे आवश्यक आहे. तपश्चर्येला यश मिळते ही गोष्ट सत्याच्या उपासकांना विसरून चालणार नाही.

अश्विन महिन्यात येणार्‍या या नवरात्रोत्सवाची एक प्रसिद्ध कथा आहे. महिषासुर नावाचा एक अत्यंत क्रूर राक्षस होता. त्याने आपल्या सामर्थ्याच्या जोरावर त्रिलोकात अत्याचाराचे थैमान घातले होते. त्याच्या अत्याचारामुळे सर्वजण दु:खी झाले होते. या अत्याचारापासून मुक्ती मिळविण्यासाठी सर्व देवांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेशाची आराधना केली.

देवांची प्रार्थना ऐकून आद्यदेव महिषासुरावर अत्यंत क्रोधीत झाले आणि त्यांच्या पुण्य प्रकोपाने एक दैवी शक्ती प्रकट झाली. सर्व देवांनी त्या शक्तीचा जय-जयकार करून तिचे पूजन केले. तिला आपल्या दिव्य शस्त्रांनी सजविले. या देवीने सलग नऊ दिवस युद्ध करून महिषासुराचा वध केला. नंतर दैवी शक्तीची पुनर्स्थापना करून देवांना अभय दिले. ती दैवी शक्ती म्हणजे दुसरे कुणीही नसून आपली जगदंबा माता आहे.

नवरात्रीच्या दिवसात वाईट विचारांवर विजय मिळविला पाहिजे. महिषासुराचे मायाजाळ ओळखून त्याच्या राक्षसी कृत्यापासून मुक्त होण्यासाठी दैवी शक्तीची आराधना करणे आवश्यक आहे. संपूर्ण नऊ दिवस अखंड दीपज्योती लावून देवी जगदंबेची पूजा करून तिची शक्ती प्राप्त करण्याचे दिवस म्हणजे नवरात्र होय.

WDWD
राक्षस हा मोठमोठे दात, नख, लांबलचक केस, मोठे डोळे असलेला भयानक प्राणी असतो अशी आपली कल्पना आहे. वास्तविक राक्षस म्हणजे 'असुषु रमन्तेइति असुरा:' प्राण्यांत रमणारा, सुखात राहणारा आणि महिष म्हणजे रेडा. रेड्यासारखी वृत्ती असणारा राक्षस म्हणजे महिषासुर होय. रेडा नेहमी आपले सुख पाहत असतो. समाजात आजही रेड्यासारखी प्रवृत्ती वाढताना दिसून येते. त्याचा परिणाम म्हणजे समाज स्वार्थी आणि भावनाशून्य बनला आहे. समाजात व्यक्तीवाद आणि स्वार्थीपणाची अमर्याद‍ीत वाढ झाली असून तो महिषासुराच्या रूपाने नांदत आहे. या मह‍िषासुराला बांधून ठेवण्यासाठी देवीकडे शक्ती मागण्यासाठी नवरात्र उत्सव साजरा केला जातो.

वेदांत शक्तीच्या उपासनेला विशेष महत्त्व दिले आहे. महाभारताचे प्रत्येक पान बलोपासना आणि शौर्यपूजेने भरलेले आहे. महाभारतात पांडवांना धार्मिक मूल्य टिकवून ठेवायचे असेल तर केवळ हात जोडून बसून चालणार नाही तर शक्तीची उपासना करावी लागेल असा सल्ला महर्षी व्यासाने दिला होता. अर्जुनाला दिव्य अस्त्र प्राप्त करण्यासाठी त्यांनीच स्वर्गात जाण्याचे मार्गदर्शन केले होते.

अनंत काळापासून दैवी विचारांवर राक्षसी विचार आक्रमण करत आले आहेत. या विचारावर संकट आले तेव्हा तेव्हा देवांनी भगवंताकडे शक्ती मागून राक्षसी प्रवृत्तीचा सर्वनाश केला. केवळ चांगले विचार असून चालत नाही तर त्या विचारांचे रक्षण करणे गरजेचे असल्यामुळे शक्ती उपासना करणे आवश्यक आहे. म्हणून आपण आळस झटकून शक्तीच्या उपासनेला सुरवात केली पाहिजे. 'संघे शक्ती: कलै युगे' हे लक्षात ठेवून नवरात्रीच्या दिवसात दैवी विचारांच्या लोकांचे संघटन करणे आवश्यक आहे.

या संघटनेच्या मुख्य स्थानी जगदंबा असेल आणि तिच्या भक्तीने आपल्याला शक्ती प्राप्त होईल, हे सुचित करण्यासाठी नवरात्रीच्या दिवसात गरबा आणि रासलीलेच्या रूपात देवी भोवताली फेर धरला जातो. देवीजवळ फिरता-फिरता आपण हे मागितले पाहिजे की, 'हे देवी! आम्हाला सदसदवि‍वेक बुद्धी दे. आमच्या संघटनेत अहंकार, द्वेष येत आहे. त्याला तू नष्ट कर.' देवी जगदंबेची ही उपासना नवरात्रीत सुरू होते. परंतु केवळ नऊ दिवसासाठी मर्यादीत न ठेवता कायम ध्यानात ठेवणे आवश्यक आहे.