गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By

चंदेरी साडीची 700 वर्षं जुनी पंरपरा मराठा साम्राज्यामुळे अशी टिकून आहे

- नीलेश धोत्रे
चंदेरी शहराच्या वेशीत प्रवेश करताच हे शहर किती जुनं आहे याची प्रचिती येते. अनेक मध्ययुगीन इमारती इथं तुमच्या स्वागतासाठी उभ्या असतात.
 
कुशक महल ते चंदेरीचा किल्ला आणि जामा मशि‍दीपासून जैन मंदिरापंर्यंत इथली प्रत्येक इमारत इथल्या समृद्ध इतिहासाची साक्ष देतेय. बरं हे सर्व पाहायचं बोललं तर 2 दिवसही पुरणार नाहीत.
 
चंदेरी शहराचा इतिहास महाभारतातल्या शिशुपालपासून सुरू होऊन खिलजी, बुंदेल, मुघल ते मराठा साम्राज्यापर्यंत येऊन थांबतो.
 
अनेक राजांनी इथं राज्य केलं, अनेकदा हे शहर लुटलं गेलं, पुन्हा वसवलं गेलं. प्रत्येक राजवटीनं त्यांच्या परीनं या शहराच्या सौंदर्यात भर टाकली. काळाच्या ओघात चंदेरी बदलत गेलं.
 
आजच्या घडीला चंदेरीला एक नवी ओळख मिळाली आहे ती म्हणजे बॉलिवूड चित्रपटांच्या शूटिंगसाठीचं सर्वांत पसंतीचं ठिकाण. 'स्त्री'सारख्या अनेक सिनेमांचं शूटिंग इथं होऊ लागलं आहे.
 
पण चंदेरीला हजारो वर्षांपासून एक अनोखी ओळख आहे. आणि ती आजची तिचं स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहे.
 
जगभरात चंदेरीची हीच ओळख स्वतःचा डंका वाजवून आहे. ही ओळख आहे म्हणजे इथली चंदेरी साडी.
 
जी भारत स्वतंत्र होईपर्यंत फक्त राजघराण्यातल्या स्त्रियांसाठीच तयार होत होती. त्यातही बोलबाला होता तो भोसले, पवार, शिंदे, गायकवाड, पेशवे आणि होळकर या मराठा साम्राज्यातल्या घराण्यांचा.
 
अस्सल सोन्याचांदीचं जरीकाम, चीनवरून आयात होणाऱ्या धाग्यापासून तयार होणाऱं नाजूक विणकाम आणि चमचमत्या उठावदार रंगांच्या या देखण्या साडीचा राजघराण्यांपासून सामान्यांपर्यंतचा प्रवास आपण उलगडणार आहोत.
 
चंदेरी साडीचा इतिहास
1304 मध्ये बंगाल आणि बिहारमधून काही कारागीर आणि विणकर चंदेरीमध्ये आले. त्यांनी चंदेरीमध्ये साडी विणायला सुरुवात केली. पण, त्यांची ही सुरुवातच मुळात आसपासच्या राजघराण्यातल्या लोकांचे कपडे तयार करण्यापासून झाली.
 
सोन्या-चांदीपासून तारा तयार करून त्या या कापडांमध्ये विणल्या जात होत्या. त्यामुळे सुरुवातीपासूनच इथं तयार होणारं कापड सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर होतं.
 
17 व्या शतकापर्यंत वेगवेगळ्या राजवटीत ही कला कमी-अधिक प्रमाणात उभारी घेत होती. पण, औरंगजेबाच्या काळात या साडीवर बंदी आली. त्यावेळी इतर राजांनी या साडीला राजाश्रय दिला.
 
पण चंदेरी साडीला सोनेरी दिवस आले ते मराठा साम्राज्याच्या विस्तारानंतर.
 
जपान, मेक्सिको, चीन आणि कोरियामधून येणाऱ्या धाग्यांपासून तयार होणारी, वजनाला हलकी, उठावदार रंगसंगती आणि अत्यंत राजेशाही थाट असलेली ही साडी मराठा राजघराण्यातल्या स्त्रियांची पहिली पसंत ठरली.
 
स्थानिक इतिहास अभ्यासक मुजफ्फर अन्सारी सांगतात, “मराठा साम्राज्याच्या काळात या साडीनं एक वेगळी उंची गाठली. शिंदे, गायकवाड, पवार, पेशवे, भोसले आणि इतर मराठा राजघराण्यांनी या साडीला फार बढावा दिला. माधवराव शिंदेंच्या घराण्यानं या साडीला सर्वांत जास्त प्रोत्साहन दिलं. तसं या साडीचं अस्तित्व मुघल, खिलजी, बुंदेल अशा सर्वंच राजवटीमध्ये होतं. पण देश स्वतंत्र झाल्यानंतर मात्र इथं बदल घडून आला. आता इथं तयार होणारा कपडा सामान्यांना परवडेल असादेखील आहे.”
 
मराठा साम्राज्याने त्याकाळी दिलेल्या राजाश्रयामुळेच हा साडी उद्योग अजूनही टिकून असल्याचं मत ते नोंदवतात.
 
आजही या घराण्यांमध्ये लग्न असेल तेव्ह त्यांच्याकडून खास चंदेरी साड्या इथून तयार करून घेतल्या जात असल्याचं अन्सारी सांगतात.
 
शिवाय महाराष्ट्रातली अनेक प्रतिष्ठित कुटंब त्यांच्याकडील लग्नांच्याआधी इथून शॉपिंग करत असल्याचं अन्सारी सांगतात.
 
नव्या पिढीच्या विणकरांचा आवडता रोजगार
भारतात वेगवेगळ्या भागात हातमागावर कापड विणलं जातं. बनारसी, कांजीवरम, पोचमपल्ली, संबळपूरी, माहेश्वरी अशा वेगवेगळ्या हातमागावर विणल्या जाणाऱ्या भारतीय साड्या जगभरात प्रसिद्ध आहे.
 
पण या सर्व साड्यांमध्ये एक गोष्ट सामायिक आहे ती म्हणजे ती विणणाऱ्या विणकरांची गरीब परिस्थिती. या साड्या विणणं परवडत नसल्यानं अनेक विणकर आता काम सोडत आहेत.
 
पण चंदेरी साडी मात्र त्याला अपवाद आहे. इथं जवळपास 5000 विणकर आहेत. आणि दररोज त्यांची संख्या वाढतच आहे. नवी पिढी देखील या साडी विणण्याच्या व्यावसायात येत आहे.
 
त्याचं कारण म्हणजे साडीला या मिळणारा भाव आणि मागणी तसंच विणकरांना मिळणारं योग्य मानधन आहे.
 
इथं एक साडी विण्यासाठी एका विणकराला कमीतकमी 1500 रुपये मिळतात. शिवाय जेवढं जरीचं काम जास्त तेवढं मानधन जास्त असा इथला नियम आहे. चांगली साडी विणण्याचे अनेकदा 5000 रुपये देखील दिले जातात.
 
आणखी एक गोष्ट या साडीला इतर साड्यांपासून वेगळं करते ते म्हणजे कुठल्याही सिंथेटिक धाग्याचा न होणारा वापर आणि संपूर्ण काम हातमागावरच काम.
आता नेमके कुठले धागे वापरले जातात?
अजूनही चीन, जपान आणि मेक्सिकोतून येणाऱ्या धाग्यांचा वापर इथं होतो. पण आता हळूहाळू भारतीय सिल्क धाग्यांचादेखील वापर सुरू झाला आहे.
 
आताच्या घडीला तान्यासाठी चीनी तर बान्यासाठी भारतीय धाग्यांचा वापर केला जातोय. जो कोयम्बतूरमध्ये तयार होते. तसंच सूरतमधून येणारी टेस्टेड जरी आता सोन्याचांदीच्या जरीऐवजी वापरली जाते. जी दिसायला एकदम खऱ्या सोन्याच्या जरी सारखीच असते.
 
नवीन डिझाईन तयार करण्यासाठी आजकाल लोकरीच्या धाग्याचासुद्धा वापर सुरू झाला आहे. तसंच भारतात तयार होणारं रेशमसुद्धा आता प्रोसेस करून चंदेरी साडीसाठी वापरलं जात आहे.
 
त्यामुळे ही साडी सामान्यांना परवडेल अशा किंमतीत तयार होतोय. पण तरीही एका साडीची कमीतकमी किंमत ही 3000 आहे. ज्यामध्ये जरी नसते. जरी असलेल्या साडीची कमीतकमी किंमत 3000 हजारांच्या पुढे सुरू होते. जेवढं जास्त जरीकाम तेवढी साडीची किंमत जास्त असते. अगदी 1 लाख रुपयांपर्यंतच्या साड्यादेखील इथं तयार होतात.
 
पण, आजही ऑर्डरनुसार सोनं आणि चांदीच्या जरीचा वापर करून साड्या इथं विणल्या जातात हे विशेष.
 
अनेक वर्षं टिकणारी साडी
धारच्या नंदिता पवार यांच्याकडे त्यांच्या कुटुंबातल्या काही जुन्या चंदेरी साड्या आहेत. ज्यांवर सोनं आणि चांदीच्या तारांचं जरीकाम करण्यात आलं आहे. त्यातल्या काही साड्या या पिढीजात वापरल्या जात आहेत. ज्यांचा वापर काही समारंभापुरता मर्यादित आहे.
 
पवारांकडील या 50 ते 70 वर्षं जुन्या साड्यांची चमक अजूनही जशीच्यातशी आहे. तर काही जुन्या साड्यांवरील जरीकाम मात्र त्यांनी आता नव्या साड्यांवर लावून घेतलं आहे.
 
यातूनच जुन्या काळात होणाऱ्या जरीकामाचा टिकाऊपणा ठळकपणे समोर येतो.
 
पण आता मात्र तसं जरीकाम होत नसल्याचं नंदिता पवार सांगतात. शिवाय आता तसा धागासुद्धा वापरला जात नसल्यामुळे नव्याने तयार होणाऱ्या साड्या नेसल्यावर फुलून येतात. आधी त्या व्यवस्थित बसायच्या पण आता मात्र तसं होत नाही, असं निरिक्षण त्या नोंदवतात.
 
अब्दुल अझीझ आता 85 वर्षांचे आहेत ते गेल्या 70 वर्षांपासून साडी विणत आहेत.
 
नंदिता पवार यांच्या मताशी ते सहमत आहेत. आधीसारखं काम आता होत नसल्याचं तेही सांगतात. आधी त्यांनीसुद्धा खऱ्या सोन्याचांदीच्या साड्या विणल्या आहेत.
 
ते सांगतात, “आधी खऱ्या चांदीचा वापर व्हायचा. प्रत्येक साडीत पक्की जरी वापरली जायची. पूर्वी सुती साड्या जास्त तयार व्हायच्या. त्या जास्त मजबूत नसायच्या. त्यांच्या फटण्याची शक्यता जास्त असायची. आता मिक्स धागा असतो. रेशम आणि सुती धाग्याचा वापर आता होतो. त्यामुळे साडी मजबूत बनते आणि तिची फाटण्याची शक्यता कमी होते.”
 
पण आता झालेला बदल चांगला आहे. आधी मजुरी कमी मिळायची. पण आता जास्त मिळते, असंही ते सांगतात.
 
शिवाय साडी तयार करण्याच्या पद्धतीत मात्र काहीच बदल झाला नसल्याचं निरिक्षण ते नोंदवतात.
 
साडी महाग असल्याची ओरड
चंदेरी साडी महाग असल्याची ओरड कायमच होत असते. पसंतीला पडणारी साडी चंदेरीतच साधारण सात हजारांच्या पुढे असते. म्हणजे बाहेर ती आणखी महाग असणार हे ओघानं आलंच.
 
साडी हाताने तयार होत असल्यामुळे ती महाग असल्याचं अन्सारी सांगतात.
 
“ही साडी मशिनवर विणली गेली असती तर स्वस्त झाली असती. हातमागावर एक साडी तयार व्हायला 5 दिवस लागतात. मशिनमध्ये एका दिवसात 5 साड्या तयार होतात. शिवाय सिल्क महाग आहे. ते 7 हजार रुपये किलो आहे. त्यामुळे साडी महाग आहे,” असं अन्सारी सांगतात.
 
चंदेरी साडी विणकरांना किती परवडते?
सुमित्राबाई कोळी गेल्या 40 वर्षांपासून चंदेरी साडी विणत आहेत. त्यांच्या कुटुंबात 10 सदस्य आहेत. संपूर्ण कुटुंब साडी विणण्याचंच काम करतं. त्यातूनच त्यांचं घर चालतं.
 
तुम्हाला कुठली साडी आवडते विचारलं तर सांगतात, “प्रत्येक महिलेला सर्व प्रकारच्या साड्या आवडतात. प्रत्येकीला वाटतं की महागडी साडी नेसावी. पण, प्रत्येक महिलेला ही साडी परवडत नाही.”
 
त्यांच्याकडे फक्त 2 चंदेरी साड्या आहेत. जास्त का नाही असं विचारलं तर, “जास्त साड्या मीच घालत बसले तर मग खाणार काय,” असा सवाल करतात.
 
पण मुलांच्या लग्नकार्यात मात्र सुना आणि मुलींना चंदेरी साड्या दिल्याचं त्या आवर्जून सांगतात.
 
या साडीमुळे चंदेरीतल्या विणकरांमध्ये आर्थिक सुबत्ता आल्याच मात्र नाकारता येणार नाही. त्याची अनेक कारणं आहेत.
 
फक्त साडीच नाही तयार होत
चंदेरीमध्ये आता मागणी तसा पुरवठा हे सूत्र विणकरांकडून राबवलं जात आहे. इथल्या अनेक घरांमध्ये आता विणकाम, थेट आणि ऑनलाईन विक्री केली जात आहे.
 
चंदेरीतल्या प्राणपूर भागाला आता एक क्लस्टर म्हणून विकसित केलं जात आहे. इथल्या 400 घरांमध्ये विणकाम, मार्केटींग आणि ऑनलाईन विक्री केली जात आहे.
 
प्राणपूरमध्ये घुसताच इथं आलेली आर्थिक सुबत्ता लक्षात येते.
 
इथं काही घरांमध्ये तर फक्त काही ठरलेल्या ब्रांडसाठीच काम सुरू असते. त्यात फॅबइंडिया, नल्लीज, मृगनैनी, आणि इतर मोठ्या ब्रांडचा समावेश आहे.
 
पण आता फक्त साडीच इथं तयार होत नाही तर ड्रेस मटेरियल, ओढण्या, स्टोल, पडदे, उशाचे आभ्रे,
 
शामलाल कोळी स्वतः विणकर आहेत. त्यांनी काळाची गरज ओळखत फक्त ड्रेस मटेरियल तयार करायला सुरुवात केली. ज्यामुळे त्यांच्या आर्थिकस्थितीत मोठी सुधारणा झाली आहे.
 
आता ते चंदेरीत त्यांच्या चंदेरी ड्रेस मटेरियलसाठी ओळखले जातात. ते ऑनलाईनच्या माध्यमातून थेट ग्राहकांना विक्री करतात.
 
शामलाल सांगतात, “ऑनलाईन विक्रीमुळे आता लोक एकमेकांच्या संपर्कातून जोडले जात आहेत. लोक त्यांना पाहिजे तसे डिझाईन आता तयार करून घेत आहेत. डिझाइनसुद्धा कंप्युटरवर तयार होतं. त्यामुळेसुद्धा काम सोपं झालं आहे. आधी मध्यस्था मार्फत विक्री करावी लागत होती. आता मात्र थेट विक्रीमुळे चांगला फायदा होत आहे. आधी फक्त 25 टक्के फायदा होत होता आता 75 टक्के फायदा होतोय. त्यामुळे आमची आर्थिक स्थिती सुधारली आहे. मुलांना आता आम्हाला चांगलं शिक्षण देता येत आहे.”
 
ऑनलाईनमुळे उद्योगाला नवी उभारी
कोव्हीडच्या काळात अनेक उद्योगांना झळ बसली. पण चंदेरी साडीनं मात्र त्यातून नवी उभारी घेतली.
 
वसिम अक्रम हे पिढीजात चंदेरी साडीच्या व्यापारात आहेत. ते सांगतात, केव्हडनंतर त्यांच्या धंद्यात भरभराट झाली आहे. कारण, इथल्या सर्व व्यापाऱ्यांनी ऑनलाईन विक्री सुरू केली. परिणामी त्यांच्या साड्यांची आता जगभरात विक्री होतेय.
 
ऑनलाईन विक्रीमुळे विणकरांचा जास्त फायदा होत आहे. त्यामुळे ते थेट ग्राहकांशी जोडले गेलेत. परिणामी ग्राहकांनादेखील साडी थोडी स्वस्त मिळत आहे.
 
बॉलिवूडमुळेही फायदा
2008 ते 2014 चा काळ इथल्या विणकरांसाठी कठीण होता. शहरात पाण्याची समस्या असल्यामुळे अनेक विणकरांनी पलायन सुरू केलं होतं.
 
पण, त्याच दरम्यान पाण्याची समस्या सुटली आणि बॉलिवूडला देखील चंदेरीची भूरळ पडली. परिणामी पलायन केलेले विणकर परत आले आणि या साडीला पुन्हा एकदा उभारी मिळाली.
 
ऐतिहासिक महत्त्व आणि इथं असलेल्या वेगवेगळ्या ऐतिहासिक इमारतींमुळे चंदेरीत आता अनेक बॉलिवूड सिनेमांचं शूटिंग होत आहे.
 
त्यामळे अनेक कलाकार चंदेरीत येऊन राहत आहेत. त्यातले काही कलाकार या साड्यांना पसंती देत आहेत. काही अभिनेत्रींनी चंदेरी साड्या घातल्यामुळेसुद्धा साडीला जास्त प्रसिद्धी मिळली असल्याचं वसिम अक्रम सांगतात.
 
प्रोजेक्ट चंदेरीयानमुळे देखील फायदा झाल्याचं अक्रम सांगतात. या प्रोजेक्ट अंतर्गत सर्व विणकरांना ऑनलाईन विक्री कशी करायची याचं ट्रेनिंग देण्यात आलं होतं.
 
खरी चंदेरी साडी कशी ओळखायची?
चंदेरीच्या नावाखाली आता बाजारात अनेक पॉवरलुमच्या साड्या विकल्या जात असल्याची खंत अनेक व्यापारी व्यक्त करतात.
 
पण खरी चंदेरी ओळखण्याच्या काही क्लुप्त्या आहेत. जसं की खऱ्या चंदेरी साडीच्या जरीकामात कुठेही कटिंग केलेलं नसतं. एक बुट्टी किंवा एक नक्षी एका अखंड धाग्यात विणलेली असते. तसंच ही साडी विणताना तिचं माप घेण्यासाठी धाग्यांवर कोळश्याने खूण केली जाते. त्यामुळे हातमागातून आलेल्या चंदेरी साडीवर कोळशाची खूण किंवा छोटा काळा डाग असतो. साडीच्या एका कडेला हा डाग प्रत्येक एका मीटरच्या अंतरावर असतो.