मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र-समीक्षा
Written By

चित्रपट परीक्षण: बकेट लिस्ट

मधुरा साने ही घरात आणि घरातल्या माणसांमध्ये गुरफटलेली एक गृहिणी. स्वत:च्या इच्छा आकांक्षा, आवड-निवड बाजूला टाकून घरातल्या लोकांच्या सुखात सुख मानणारी अगदी साधारण बायको, सून, आई अश्या भूमिकेत माधुरी दीक्षित मोहक दिसते. सुमित राघवन सोबत आपल्या संसाराची गाडी सुरळीत चालवत असताना अचानक एक ब्रेक लागतो आणि तिचं आयुष्यच बदलतं.
 
हृदय प्रत्यरोपणामुळे ती स्वत: डोनर सई सारखी होते आणि दंगा मस्ती सुरू करते. हे परिवर्तन घडतं सईच्या बकेट लिस्टमुळे... सईच्या डायरीतील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या नादात ती बाइक चालवते, पबमध्ये जाऊन फुल टू टल्ली होते, रणबीरसोबत सेल्फी घेते, शार्ट्स ड्रेसेस घालते आणि आजच्या पिढीप्रमाणे धमाल करते. सईची बकेट लिस्ट भरता-भरता ती स्वत:ला नव्याने सापडते.
 
सिनेमात माधुरी असल्यावर पूर्ण सिनेमा तिच्यावर केंद्रित असणे तर साहजिक आहे पण तिचे कुटुंब ज्यात नवरा म्हणून सुमित राघवन, सासू-सासरे म्हणून वंदना गुप्ते आणि प्रदीप वेलणकर, आई-बाबा म्हणून इला भाटे आणि दिलीप प्रभावळकर, मिलिंद फाटक, रेशम टिपणीस, सुमेध मुद्गलकर या सर्वांच्या भूमिका लहान असल्या तरी त्यांनी छान निभावल्या आहेत. सईची आई म्हणून रेणुका शहाणे पुन्हा एकदा माधुरीसोबत दिसून आली आहे आणि तिनेही आपली भूमिका ठोक बजावली आहे. परंतू शुभा खोटे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. माधुरीच्या आजेसासूची भूमिकेत त्यांनी कंटाळवाणी वाटायला जागी सोडली नाही.
 
माधुरीचा पहिला मराठी चित्रपट म्हणून लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे तरी यात माधुरी आपल्या सर्वात दमदार भूमिकेत आहे असे म्हणता येणार नाही. दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर त्यांचा भरपूर उपयोग करू शकत होते. यात दर्शवण्यात आली त्यापासून कितीतरी तिचा अभिनयात दम आहे हे आपण अनेक हिंदी सिनेमात बघितलेले आहेत. तरी धर्मा प्रॉडक्शनचे नाव आल्याने अर्थातच करण जोहरची निर्मिती असल्यामुळे सिनेमात मसाला आणि भव्यतेचा थाट दिसून येतो. टेक्निकल, अभिनय, कहाणी हे सिनेमाचे मजबूत पक्ष आहे तरी खूप काही वेगळं नाही.
 
इमोशनल असला तरी हसवणारा, करमणूक करणारा, रंगवणारा एकूण मसालेदार असा हा सिनेमा आहे. आणि न बघण्यासारखे यात काही नाही..तर बकेट लिस्ट मध्ये माधुरीला भेटण्याची इच्छा असणार्‍या प्रेक्षकांनी नक्कीच हा सिनेमा बघावा.