चित्रपट परीक्षण : नकळत शिकवण देणारी सायकल
प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी तरी वस्तू खूप खास असते. त्या वस्तूशिवाय ते स्वतःच्या आयुष्याचा विचारदेखील करू शकत नाहीत, ती वस्तू हरवली किंवा त्या वस्तूला काय झाले तर ते प्रचंड दुःखी होतात. खरंच एखाद्यावस्तूला आपल्या आयुष्यात इतके महत्त्व देणे गरजेचे आहे का या विषयावर हलक्याफुलक्या भाषेत सायकल या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे. सायकल या चित्रपटाची कथा केशव आणि त्याच्या आजोबांनी त्याला भेट म्हणून दिलेल्या सायकल भोवती फिरते. केशवच्या आजोबांना एका इंग्रजाने एक सुंदर सायकल भेट म्हणून दिलेली असते. ही सायकल ते आपल्या मुलाला न देता आपला नातू केशव (हृषीकेश जोशी)ला देतात. केशवसोबत या सायकलचे अतूट नाते निर्माण झालेले असते. केशव सगळीकडे त्याच्या सयाकलवरूनच फिरत असतो. त्यामुळे पंचक्रोशीतील गावांमध्ये त्याची सायकल प्रसिद्ध असते. त्याच्या सायकलला कोणी हात लावलेले देखील त्याला आवडत नसते. एक दिवशी केशवच्या गावात एक चोरी होते. गजा (प्रियदर्शन जाधव) आणि मंग्या (भाऊ कदम) गावातील एका घरातून सोने घेऊन पळतात. पळताना त्यांना केशवच्या घरासोर त्याची सायकल दिसते. आपल्याला गावाच्या बाहेर या सायकलमुळे लवकर जाता येईल असा विचार करून ते ही सायकलदेखील चोरतात. सायकल चोरल्यानंतर केशवची अवस्था काय होते, केशवची सायकल पंचक्रोशीतील सगळीच लोकं ओळखत असल्याने ही सायकल चोरल्यानंतर मंग्या आणि गजा यांना लोकांच्या प्रश्र्नांना कशाप्रकारे उत्तरे द्यावी लागतात, केशवला त्याची सायकल मिळते की नाही ही उत्तरे हा चित्रपट पाहिल्यावर लोकांना मिळतील. सायकल या चित्रपटात एक खूपच छान संदेश हलक्या फुलक्या पद्धतीने देण्यात आला आहे. सायकल या चित्रपटाची कथा ही अतिशय साधी, सोपी आहे. त्यामुळे सामाान्य लोकांच्या मनाला ही कथा नक्कीच भिडते.