1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. मराठी कलावंत
Written By
Last Modified: बुधवार, 9 जुलै 2025 (17:16 IST)

‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ या नव्या मालिकेत स्नेहलता वसईकर ‘माईसाहेब’ या दमदार भूमिकेत दिसणार

Snehlata Vasaikar
'सन मराठी' वाहिनीवर १४ जुलैपासून 'तुझ्यासाठी तुझ्यासंगं' या नव्या मालिकेतून पहिल्या नजरेतल्या प्रेमाची गोष्ट सुरू होत आहे.  मालिकेच्या प्रत्येक प्रोमोला  प्रेक्षकांनी भरभरून, उत्स्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मालिकेत तेजा-वैदही यांच्यासह  आणखी एक दमदार भूमिका पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री स्नेहलता वसईकर माईसाहेब या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. 
 
या नव्या भूमिकेबद्दल स्नेहलता म्हणाल्या की, "'तुझ्यासाठी तुझ्यासंगं या नव्या मालिकेत मी माईसाहेब ही खलनायिकेची भूमिका साकारतेय. माईसाहेब ही मुलावर नितांत प्रेम करणारी, राजकारणातील डावपेच खेळणारी, कर्तबगार, गावाची तारणहार आहे. या भूमिकेमध्ये अश्या बऱ्याच  छटा आहेत. माझ्या वयापेक्षा जास्त वय असलेली ही भूमिका आहे. यापूर्वी मी स्वतःशी ठरवलं होतं की, आपल्या वयापेक्षा मोठी व्यक्तिरेखा आपण साकारायची नाही. वयापेक्षा मोठं पात्र साकारताना तारेवरची कसरत असते. कायम अलर्ट राहावं लागत. पण मी माईसाहेब या पात्राच्या प्रेमात पडले आणि मला नेहमीच चॅलेंजिंग भूमिका साकारायला आवडतात. मालिकेचे दिग्दर्शक विनोद लवेकर यांनी जेव्हा मला या भूमिकेबद्दल सांगितलं त्या क्षणी मी भूमिकेसाठी तयार झाले."
 
यापुढे स्नेहलता म्हणाल्या की, "मुख्यतः या भूमिकेचा लूक खूप खास आहे. मला या नव्या लूकमध्ये प्रेक्षक ओळखूच शकत नाही. नाशिकमध्ये या मालिकेचं शूटिंग सुरू आहे. याआधी मुंबईत शूटिंग करत असताना घराकडे लक्ष देता यायचं, पण आता मुंबई-नाशिक असा प्रवास सुरु झाला आहे. माझी मुलगी शौर्या आता १२ वर्षांची आहे. जेव्हा मी या नव्या भूमिकेविषयी तिच्याशी बोलले, तेव्हा तिने मला खूपच सकारात्मक ऊर्जा दिली. ती म्हणाली, "मम्मा तुला खतरनाक रोल करायला मिळतोय, तू नक्की कर. मला माईसाहेब या भूमिकेत तुला बघायचंय." तिच्या आणि माझ्या नवऱ्याच्या पाठिंब्यामुळेच मी ही भूमिका आनंदाने आणि मनापासून करत आहे."
Edited By- Dhanashri Naik