बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 07
  4. »
  5. मैत्री दिन
Written By अभिनय कुलकर्णी|

मैत्र जीवांचे

ही कहाणी आहे अजय आणि विजय या दोन मित्रांची. दोघेही अगदी जीवलग मित्र. कुठेही जातील, काहीही करतील तर बरोबरच. एकाला झाका, दुसऱ्याला काढा, असं लोक त्यांच्याविषयी म्हणत. एकदा दोघेही आपल्या गाडीतून नाशिकहून पुण्याला निघालेले. वाटेत त्यांची गाडी एका ट्रकला जाऊन धडकते. दोघेही जबर जखमी होतात. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातं.

डॉक्टर पटवर्धन त्यांच्यावर उपचार करत असतात. डॉक्टरांच्या उपचारांना यश येतंय असं दिसतं. अजय वाचतो, पण त्याला डोळे गमावावे लागतात. विजय अद्याप अत्यवस्थच असतो. दुसऱ्या दिवशी डॉक्टर त्याला भेटायला जातात. तेव्हा विजयची हालचाल दिसायला लागते.
डॉक्टर पटवर्धन त्याची चौकशी करतात.
``कसाहेस बाळा. ``
आतून आलेली कळ दाबत प्रयत्नपूर्वक चेहरा हसरा ठेवत विजय उत्तरतो, ``छानेय डॉक्टर``.
``विजय, तू खूप सहनशील आहेस. तुझ्यात धैर्यही आहे. म्हणूनच हे सारं तू सहन करू शकलास.``
विजय क्षीणसं हसतो.
डॉक्टर जायला निघतात, थोडं पुढे जाताच, विजयने कष्टाने मारलेली हाक ऐकून ते मागे येतात.
``काय रे बाळा``
``डॉक्टर मी तुम्हाला काल जे सांगितलं ते तुमच्याजवळच ठेवा. कुणालाच सांगू नका. प्लीज.``
डॉक्टर म्हणतात, ``नाही रे बाळा.``

पुढे आजारातून अजय पुष्कळसा बरा होतो. आलेले अंधत्वही स्वीकारतो. काठी घेऊन बाहेर हिंडू फिरू लागतो. विजयला मात्र हॉस्पिटलमध्येच बराच काळ काढावा लागतो. चालणं त्याला जमत नाही. सुरवातीला अजय त्याला रोज भेटायला येत असे.

हॉस्पिटल्या पायऱ्यांवरून येणारा अजयच्या काठीचा टॉक टॉक आवाज विजयला एकेक दिवस प्रेरणा देणारा ठरत होता. विशिष्ठ वेळेला कान गोळा करून तो त्या आवाजाची वाट पहात बसे. अजय आला की त्याला हायसं वाटायचं. पण पुढे अजयला हे येणं त्रासदायक वाटायला लागलं. सतत येणं आणि आजारी मित्रासोबत बसणं नको वाटायला लागलं. त्याने येणं कमी केलं. आधी एक दिवसाआड मग दोन मग तीन असं करत करत शेवटी त्याने येणंच थांबवलं.

पुढे विजयची प्रकृती बिघडत गेली. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले. पण एके दिवशी बातमी आली. विजय गेला. त्याच्या अंत्यसंस्कारासाठी काठीची मदत घेत अजय स्मशानात पोहोचला. डॉक्टर पटवर्धन तिथं होते. अंत्यसंस्कार झाल्यानंतर ते अजयजवळ आले. त्याच्या हातात एक पत्र देऊन म्हणाले.
``विजयनी लिहिलंय. तुझ्यासाठी. वाच.``
अजयने पत्र उघडलं, त्यात लिहिलं होतं, ``प्रिय अजय, अखेर मी तुला सोडून चाललोय. पण मी डॉक्टरांना दिलेलं वचन पाळतोय. माझे डोळे मी तुला दान करतोय. एवढ्या दिवस तू काहीच पाहू शकला नाहीस. आता माझ्या डोळ्यांनी हे जग बघ.``

वाचता वाचताच अजयच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले.