शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. करिअर
  4. »
  5. गुरूमंत्र
Written By वेबदुनिया|

इतरांचेही दु:ख पहा

एकदा एका झाडाखाली सशांनी आपली एक तातडीची सभा बोलावली. सर्वच ससे दु:खी आणि घाबरलेले होते. एक ससा उभा राहून म्हणाला, ''मित्रहो, आपलं जीवन फारच दु:खी आहे आणि या दु:खातून आपली सुटका होणे कधीही शक्य नाही. आपल्याला मनुष्य, कुत्रा, गरूड आणि इतरही अनेक लहान मोठ्या प्राण्यांपासून धोका आहे. तेव्हा आपण सर्वचजण एखाद्या तलावात जाऊन जीवन देऊया.

जिवंतपणी या अनंत यातना भोगण्यापेक्षा मरण परवडले. शिवाय आपण एकत्र मरू. म्हणजे दुसर्‍याच्या मरणाचे दु:खही करायला नको.'' त्या सशाचे बोलणे सर्व सशांना पटले. त्या सर्वांनी एकाच वेळी प्राणत्याग करण्याचे ठरवले. प्राणत्याग करण्याचा दिवसही ठरविला गेला.

ठरलेल्या दिवशी सर्व ससे आपल्या कुटंबातील लहानथोरांसह एकत्र जमले. थोड्याच वेळात सशांचा एक मोठा समूह तळ्याकाठी आला. त्या तळ्याकाठच्या चिखलात बरेच लहानमोठे बेडूक खेळत होते. सशांना पाहून ते घाबरले आणि त्यांनी भराभर तळ्यात उड्या टाकल्या. ते पाहून एक हुशार ससा म्हणाला,

''मित्रांनो, थांबा. घाई करू नका. आता तुम्ही पाहिलंत ना. आपल्याला घाबरणारे प्राणीही या जगात आहेत. त्यांचं दु:ख आपल्यापेक्षाही मोठं आहे. तरीही ते हिंमत बाळगून जगताहेत ना मग आपण कशाला दु:खी आणि निराश व्हायचं! या प्राण्यांपेक्षा आपण सुखी आहोत.

तेव्हा आपल्यापेक्षा सुखी प्राण्यांकडे न पहाता दु:खी प्राण्यांकडे पाहून आपण जगायला हवे. म्हणजे आपले दु:ख आपल्याला जाणवणार नाही. तेव्हा चला आता आपआपल्या घरी आणि आनंदाने जगा.'' त्या सशाचे बोलणे सर्वांनाच पटले. आनंदाने उड्या मारीत ते आपापल्या घरी परतले.